हातात हात घालून जगण्यातच मजा आहे ः देशमुख महाराज आंबीदुमाला येथे ग्राममंदिराचे शानदार कार्यक्रमात लोकार्पण

नायक वृत्तसेवा, घारगाव
आपन नशीबवान आहोत कारण कोरोनातून वाचलो आहोत. त्यामुळे आता भांडणे करण्यात मजा नाही, आता हातात हात घालून जगण्यात मजा आहे. कारण जीवन हे क्षणभंगूर आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख यांनी केले.
![]()
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील आंबीदुमाला येथील ग्राममंदिर कार्यालयाचा लोकार्पण सोहळा सोमवारी (ता.20) आयोजित केला होता त्यानिमित्ताने देशमुख महाराज कीर्तनात बोलत होते. यावेळी सरपंच जालिंदर गागरे, पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे, ज्येष्ठ नेते अशोक भांगरे आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले.

कीर्तनात पुढे प्रबोधन करताना देशमुख महाराज म्हणाले, परमार्थ करायचा असेल तर त्यासाठी त्याग करावाच लागतो; त्याशिवाय परमार्थ होत नाही. धर्म अद्यापही आपल्या लोकांना समजला नाही असेच राहिले तर धर्म संपल्याशिवाय राहणार नाही. आई वडीलांची सेवा करा. गिगर खुर्चीची ग्रामपंचायत पहिल्यांदाच पाहिली. पन्नास वर्षे एवढी दुःख भोगली नाही ते एवढ्या तीन महिन्यांत पाहिली आहेत अशी भयानक अवस्था कोरोनामुळे झाली होती. मात्र, आदर्श ग्रामपंचायत बनवली त्याचे कौतुकच झाले पाहिजे. गावात एवढे चांगले काम करणे सोपी गोष्ट नाही. परंतु, सरपंच जालिंदर गागरे यांनी करून दाखवले आहे. त्यांना खर्या अर्थाने मानायला पाहिजे. गावच्या विकासाचे मंदिर म्हणजे ग्रामपंचायत असून हे ग्राममंदिर आहे. राजकारण हे निवडणुकीपुरतेच करावे, निकाल लागला की सर्वांनी एकत्रित यावे. तेव्हाच खर्या अर्थाने गावांचा विकास होईल. गावातील भांडणे गावातच मिटली पाहिजे तरच एकोपा टिकेल. आता गावागावांनी प्लास्टिक मुक्तीचा निर्णय घेतला पाहिजे, गटारी स्वच्छ ठेवल्या पाहिजे असे आवाहन केले. शेवटी सरपंच गागरे यांनी कामांचा लेखाजोखा मांडत सहकार्याबद्दल ग्रामस्थांचे आभार मानले. यापुढे देखील गावाला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा मनोदय व्यक्त केला.
