संगमनेरच्या प्रवरा नदीपात्रात मालवाहतूक वाहनाला जलसमाधी! स्वातंत्र्यदिनाला दुर्घटनेची किनार; चालकासह तिघे वाहून गेल्याची भिती..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यौत्सवाचा उत्साह मावळण्याच्या आंतच संगमनेर तालुक्यातून अत्यंत धक्कादायक वृत्त हाती आले आहे. सोमवारी (ता.15) अवघा देश स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात मश्गुल असतांना तालुक्यातील जोर्वे-पिंपरणे रस्त्यावरील प्रवरा नदीच्या पुलावरुन एक मालवाहतूक करणारे वाहन वाहून गेल्याचे वृत्त आहे. या भयानक दुर्घटनेत वाहनचालकासह अन्य दोन प्रवाशीही वाहून गेल्याची भिती व्यक्त केली जात आहे. याबाबतची माहिती प्राप्त झाल्यापासून संगमनेर तालुका पोलिसांनी नदीपात्रात बुडींताचा शोध घेण्यासह आसपासच्या गावांमधील बेपत्ता इसमांचाही शोध सुरु केला आहे, मात्र अद्यापपर्यंत बुडालेल्या व्यक्तिंची नेमकी संख्या व त्यांची माहिती मिळालेली नाही.


याबाबत आज मंगळवारी (ता.16) सकाळी पावणे नऊच्या सुमारास संगमनेर तालुका पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार यांनी तत्काळ आपल्या फौजफाट्यासह जोर्वे-पिंपरणे रस्त्यावरील पुलाकडे धाव घेत पाहणी केली. सदरील पुलाचे कठडे तुटलेल्या अवस्थेत असून निळवंडे धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सदरील पुलावरुन पाणी वाहत आहे. त्यामुळे अशा प्रकारची दुर्घटना घडण्याची दाट शक्यता असल्याने पोलिसांनी ‘कथीत’ असलेल्या या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी या मार्गावरुन प्रवास करणार्‍या आसपासच्या गावांमधील सरपंच व ग्रामसेवकांशी संपर्क साधून त्यांच्या गावातील कोणी व्यक्ति सोमवारपासून बेपत्ता आहे का याची चौकशी केली. मात्र त्यातून काहीच हाती लागले नाही.


या दरम्यान ओझर बु. येथील संदीप नागरे यांच्या घराचे काम सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांच्याकडे सोमवारी (ता.15) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास खिडक्यांच्या कांचा घेवून (एम.एच.15/एफ.व्ही.8943) हे पिकअप वाहन आले होते. त्यांच्या कांचा खाली करुन वाहनचालक कनोली मार्गे पिंपरणे रस्त्याने जोर्वेवरुन संगमनेरमध्ये जाणार असल्याची माहिती संबंधित वाहनचालकाने दिल्याची माहिती नागरे यांनी पोलिसांनी दिली. सदरील वाहनाच्या क्रमांकावरुन त्याच्या मालकाचा शोध घेतला असता सदरील वाहन नाशिकच्या सिडको परिसरात राहणार्‍या अस्लम अलिखान यांचे असल्याचे समजले. पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क करुन वाहनाचा ठावठिकाणा विचारला असता त्यांनी वरीलप्रमाणे उत्तर देत वाहनचालकाचे नाव प्रकाश (रा.जालना, पूर्ण नाव माहिती नाही) असल्याची माहिती दिली.


पोलिसांनी वाहनाच्या मालकाकडून चालकाचा मोबाईल क्रमांक घेत त्यांच्यावर संपर्क साधला असता तो संपर्क क्षेत्रात नसल्याचे उत्तर मिळाले. त्यामुळे पोलिसांनी अधिक तपास करतांना वाहनचालकाचा मोबाईल सुरु असतांना तो शेवटच्या क्षणी कोठे होता याची पडताळणी केली असता त्याचे शेवटचे लोकेशन कनोली असल्याचे समोर आले. त्यामुळे जोर्वे-पिंपरणे पुलावरुन वाहून गेलेले वाहन तेच असावे असा पोलिसांचा दाट संशय आहे. या वाहनात चालक प्रकाश याच्यासह अन्य दोन प्रवाशीही असल्याची माहिती काहींनी दिल्याने या दुर्घटनेत वाहनासह एकूण तिघे वाहून गेल्याची भिती वर्तविली जात आहे.


तालुका पोलिसांनी या घटनेचा गांभीर्याने तपास सुरु केला असून जोर्वे ते ओझर बंधार्‍यापर्यंतचा परिसर पिंजून काढला जात आहे. त्यासोबतच संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने व तहसीलदार अमोल निकम यांच्याशी संपर्क साधून सदर वाहन व बुडीतांचा शोध घेण्यासाठी पाणबुडे देण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यानुसार वरीष्ठ कार्यालयाला अहवाल पाठविण्यात आला असून लवकरच पाणबुड्यांच्या मदतीने शोधकार्य सुरु केले जाणार आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली असून देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनीच सदरची घटना समोर आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

यापूर्वी गेल्या बुधवारी (ता.10) प्रेमसंबंधातून आठ जणांनी एकाचा खून करुन त्याचा मृतदेह कासारवाडी शिवारातील पुलावरुन प्रवरा नदीपात्रात फेकून दिला होता. मात्र गेल्या पंधरवड्यापासून निळवंडे धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने प्रवरानदी सध्या दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने शोध घेवूनही ‘त्या’ इसमाचा शोध लागलेला नसतांना आता जोर्वे शिवारातील दुर्घटनेत वाहनासह तिघांना जलसमाधी मिळाल्याचे वृत्त येवून धडकले आहे. त्यातच आज भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने निळवंडे धरण्यातून सोडण्यात येणारा विसर्गही वाढवण्यात येवून दुपारी चार वाजता तो 13 हजार 426 क्यूसेकपर्यंत नेण्यात आल्याने प्रवरेतील पाणीपातळी आणखी वाढणार आहे. त्यामुळे या दोन्ही घटना तडीस नेण्याचे आव्हान शहर व तालुका पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

Visits: 129 Today: 2 Total: 1111250

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *