विवाह सोहळ्यात वधू-वरासह वर्‍हाडींनी भरले अवयव दानाचे अर्ज पद्मश्री डॉ. तात्याराव लहानेंची उपस्थित; अनोख्या उपक्रमाचे होतेय सर्वत्र कौतुक

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहराजवळ असलेल्या वसंत लॉन्समध्ये अगदी आगळ्यावेगळ्या पद्धतीने अनोखा विवाह सोहळा पार पडला आहे. ‘आहेर आणू नका मात्र अवयव दानाचा संकल्प करा’ असा नाविन्यपूर्ण संदेश देत वधू-वरासह वर्‍हाडी मंडळींनी अवयव दानाचे अर्ज भरून घेत नवा आदर्श निर्माण केला आहे.

शहरातील वसंत लॉन्स येथे आव्हाड आणि नागरे या कुटुंबियांचा विवाह सोहळा होता. विवाह सोहळा म्हटला की, पाहुणे मंडळींचा मानपान, फेटे, टॉवेल-टोपी, गंध, अक्षदा, घोडा, वरात, बॅण्ड, आहेर, भेटवस्तू, जेवणाची पंगत आदी गोष्टींचा थाटबाट असतो. येथे देखील प्रशस्त हॉल, आकर्षक सजावट, बँडबाजा, वर्‍हाडींची लगबग, मिष्टान्न भोजन यांसह लग्नाला लागणारी प्रत्तेक गोष्ट उपलब्ध होतीच. परंतु, यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते अवयव दानाचा संकल्प करणार्‍या संदेश फलकांनी. दोन्हीकडच्या वर्‍हाडी मंडळींना आहेर नको मात्र अवयव दान करा म्हणत हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी वर-वधूसह उपस्थित एकशे एक वर्‍हाडी मंडळींनी अवयवदानाचा संकल्प करत अर्ज भरले. या सोहळ्यात राबविलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनीही ही चळवळ नेटाने पुढे न्यावे असे आवाहन केले. विवाह सोहळ्यात अवयवदानाचे अर्ज भरण्याची संकल्पना अत्यंत चांगली आहे. देशात अनेक लोकांना अवयवांची गरज आहे. विवाह सोहळ्याच्या माध्यमातून ही संकल्पना रूजली असता अंधश्रद्धेला मूठमाती मिळेल. अवयवांची गरज असलेल्या अनेकांना जीवदान मिळेल अस मत डॉक्टर लहाने यांनी व्यक्त केले.

सिन्नर (जि.नाशिक) तालुक्यातील दापूरचे रहिवासी सुभाष आव्हाड यांचे चिरंजीव नरेंद्र आणि संगमनेर (जि.अहमदनगर) तालुक्यातील शेडगावचे रहिवासी बाळासाहेब नागरे यांची कन्या दीपाली यांचा विवाह सोहळा पार पडला. नरेंद्र त्यांचे लहान बंधू दिनेश आव्हाड हे अवयवदान चळवळीत काम करतात. पत्रकार संतोष आंधळे, डॉ. अमोल वाघ, डॉ. स्वप्नील कुलकर्णी, डॉ. ऋषीकेश आंधळकर यांच्याकडे आव्हाड कुटुंबियांनी विवाह सोहळ्यावेळी वर्‍हाडी मंडळींचे अवयवदानाबाबत प्रबोधन करत त्यांच्याकडून अर्ज भरून घेण्याची संकल्पना मांडली. त्यानुसार विवाह पत्रिका छापण्यात आली. भारतीय संस्कृतीत दानाला फार महत्व आहे. याच दानात आपले शरीर, शरीरातील इतर अवयव दान करणे हे आता सर्वश्रेष्ठ आहे, हे अनेकांना यातून पटले.

Visits: 115 Today: 1 Total: 1108346

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *