बेलापूर गॅस स्फोटातील मायलेकींचा धनाच्या लालसेपोटी घातपात नन्नवरे कुटुंबियांचा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून आरोप
नायक वृत्तसेवा, राहुरी
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे गेल्या महिन्यात गॅसच्या स्फोटात मायलेकींचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र, हा गॅसचा स्फोट नसून धनाच्या लालसेपोटी भोंदूबाबाला हाताशी धरून काही मंडळींनी केलेला पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप मयत ज्योती शेलार यांच्या राहुरी येथील माहेरच्या नन्नवरे कुटुंबियांनी केला आहे.
याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील व पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना दिलेल्या निवेदनात राहुरी येथील राजेंद्र नन्नवरे यांनी म्हटले आहे की, 2 जानेवारी रोजी अमावस्येच्या रात्री मयत नमोश्री शेलार या चिमुरडीला धनाच्या ठिकाणी दर्शनासाठी भोंदूबाबाच्या समवेत नेण्यात आले. येताना भोंदूबाबाने मयत ज्योती शेलार यांच्या घरच्यांना काहीतरी चॉकलेटी कापडात वस्तू बांधून दिली. बांधलेली वस्तू कपाटात तिजोरीच्या कप्प्यात ठेवून दिली. त्यानंतर एकजण दारुच्या नशेत घरी आला. त्याने बळजबरीने संपत आलेली गॅसटाकी बदलून नवीन गॅसटाकी शेगडीला जोडली. त्यानंतर 6 जानेवारीला सकाळी घरामध्ये मोठा स्फोट घडवून आला.
या घटनेत नन्नवरे यांची बहीण ज्योती व भाची नमोश्री शेलार या गंभीर जखमी झाल्या. दरम्यान, त्यांच्या उपचारासाठी भावनिक आवाहन करून सुमारे 4 लाख रुपये आर्थिक मदत गोळा करून ती स्वतःच्या खिशात घातल्याचा आरोप नन्नवरे कुटुंबियांनी केला आहे. दरम्यान, या घटनेतील जखमी जयश्री व नमोश्री यांचा मृत्यू झाला. मात्र, घटनेनंतर त्याठिकाणी गॅसटाकी त्याला जोडलेला पाईप व शेगडी सुस्थितीत असल्याचे दिसून आले. शेगडीवरील ठेवलेले भांडे ‘जैसे थे’ होते. यावरून हा स्फोट जाणूनबुजून धनाच्या लालसेपोटी भोंदूबाबाच्या नादी लागून सुनियोजित कट असल्याचा आरोप नन्नवरे कुटुंबियांनी केला आहे. याप्रकरणी भोंदूबाबासह काही जणांवर जादूटोणा कायदा अंतर्गत कारवाई व्हावी. अन्यथा आम्ही नन्नवरे कुटुंबीय आत्मदहन करू, असा इशारा राजेंद्र नन्नवरे यांनी दिला आहे. सदर निवेदनात नन्नवरे कुटुंबियांनी मांत्रिकासह संबंधितांची नावेही सादर केली आहेत.