अकोल्याच्या आदिवासी शेतकर्याची संगमनेरात आर्थिक फसवणूक! शेततळ्याच्या कामाचे पैसे हडपले; फसवणुकीसह अट्रोसीटीतंर्गत गुन्हा दाखल..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अकोले तालुक्यातील गरीब आदिवासी शेतकर्याच्या शेतात शेततळ्याचे अस्तरीकरण करुन देण्यासाठी लाखावर रक्कम घेवूनही गेल्या चार वर्षात काम केले नाही, त्याबाबत वारंवार विचारणा करता उडवाउडवीसह शिवीगाळ व दमदाटी करण्याचा प्रकार आणि अखेर जातीवाचक शिवीगाळ करुन पुन्हा संगमनेरात पाय ठेवल्यास जीवे मारण्याची धमकी देणार्या संगमनेरातील सर्वज्ञ एंटरप्रायजेसच्या अजीत काशिनाथ गायकवाड या इसमाविरोधात फसवणूकीसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अट्रोसीटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन 2017 ते 2021 या चार वर्षांच्या कालावधीत सदरचा प्रकार घडला आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अकोले तालुक्यातील आंबीवंगण येथील एका साठ वर्षीय आदिवासी शेतकर्याने आपल्या शेतातील शेततळ्यासाठी अकोले कृषी विभागात अर्ज केला होता. सन 2016 साली तो मंजूर करण्यात आला व त्यानुसार संबंधित शेतकर्यास त्यांच्या शेतात 70 बाय शंभर फूट आकाराचा खड्डा खणून देण्यात आला. यानंतर सदरच्या खड्ड्यात पाणी साठवण्यासाठी त्याचे अस्तरीकरण होण्याची गरज असल्याने संबंधित शेतकर्याने अस्तरीकरणाचे काम करणार्याचा शोध सुरु केला असता त्यांना संगमनेरातील सह्याद्री विद्यालयासमोरील सर्वज्ञ एंटरप्रायजसेचा संचालक अजीत काशिनाथ गायकवाड हा अस्तरीकरणाचे काम करीत असल्याची माहिती मिळाली.

शेततळ्याच्या कामाबाबत दूरध्वनीवरुन प्राथमिक चर्चा झाल्यानंतर गायकवाड याने 17 मार्च 2017 रोजी त्या शेतकर्याला संगमनेरात बोलावले. त्यानुसार संबंधित शेतकरी संगमनेरात गायकवाड याच्या कार्यालयात आले. तेथे झालेल्या चर्चेनुसार सदरचा काम 1 लाख 10 हजार रुपयांमध्ये करण्याचे ठरले व त्यापोटी 60 हजार रुपयांची आगाऊ रक्कमही धनादेशाद्वारे गायकवाड यांना देण्यात आली. त्यावर एका महिन्यात काम करुन देण्याचे आश्वासन त्याने दिले. मात्र त्यानंतर महिना उलटूनही प्रत्यक्ष काम सुरु होत नसल्याने अस्वस्थ झालेल्या त्या शेतकर्याने दूरध्वनीवरुन विचारणा सुरु केली. मात्र त्यातून कोणताही मार्ग निघत नसल्याने शेवटी तो शेतकरी संगमनेरात आला व कामाबाबत गायकवाडकडे विचारणा करु लागला. त्यावेळीही त्याने खोटे आश्वासन देत त्यांची बोळवण केली.

दोन महिन्यांनी मे 2017 मध्ये गायकवाड याने संबंधित शेतकर्याला संगमनेरात बोलावले व राहीलेले 50 हजार द्या लगेचच काम सुरु करतो असे सांगितल्याने संबंधिताने 15 मे 2017 रोजी गायकवाड याला 50 हजार रुपये रोख दिले व त्यापोटी सर्वज्ञ एंटरप्रायजेसची जमा पावतीही घेतली. मात्र त्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही, त्यामुळे आपली फसवणूक तर झाली नाही ना? अशी शंका त्या शेतकर्याच्या मनात निर्माण झाल्याने त्यांनी गायकवाड याला फोन करुन ‘मी गरीब आदिवासी शेतकरी आहे, माझी फसवणूक करु नका.’ अशी विनवणी त्यांनी केली. मात्र त्यामुळे गायकवाडच्या मनाला कोणताही पाझर फुटला नाही. या सर्व घडामोडीत दिड वर्षांचा कालावधी गेला. 1 ऑक्टोबर 2018 रोजी संबंधित शेतकरी काही कामानिमित्त आपल्या सूनेसह संगमनेरात आले होते, तेव्हा गायकवाडची आणि त्यांची बसस्थानकावरच भेट झाली. त्यावेळीही संबंधित शेतकर्याने शेततळ्याच्या कामाबाबत विचारणा केली असता त्याने त्या शेतकर्याच्या सूनेसमोरच त्यांचा पानउतारा करीत अर्व्वाच्च शब्दात जातीवाचक शिवीगाळ करीत पुन्हा संगमनेरात पाय ठेवला तर हातपाय तोडण्याची धमकी दिली.

त्यामुळे संबंधित शेतकरी घाबरला व पुढील दोन वर्ष त्यांनी गायकवाडशी कोणताही संपर्क केला नाही. मात्र 2021 मध्ये त्यांनी फोन करुन पुन्हा गायकवाडला विनंती केली असता त्याने 18 फेब्रुवारी रोजी त्यांना संगमनेरला बोलावले व न्यायालय परिसरात नेवून घेतलेल्या कामाबाबत व
रकमेबाबत त्याने त्या शेतकर्याला प्रतिज्ञापत्र (नोटरी) करुन दिले व सोबतच काम करुन देण्याचेही आश्वासन दिले. मात्र त्यानंतरही आठ महिने तो केवळ उडवाउडवी करीत राहील्याने त्या शेतकर्याने अखेर संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांची भेट घेतली व त्यांच्यासमोर आपली कैफियत मांडली. त्यानुसार त्यांनी शहर पोलिसांना तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्या प्रमाणे पोलिसांनी संबंधित शेतकर्याच्या तक्रारीवरुन संगमनेरातील सर्वज्ञ एंटरप्रायजेसचा संचालक अजीत काशिनाथ गायकवाड याच्याविरोधात भा.द.वी.कलम 420 सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3 (1) (आर) (एस), 3 (2) (5ए) नुसार गुन्हा केला आहे.

