तिसर्या लाटेच्या सावटातही संगमनेरची रुग्णसंख्या नियंत्रित! तालुकास्तरावर उच्चांकी लसीकरण; नियमांची अंमलबजावणीही कारणीभूत..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
नववर्षाच्या सुरुवातीपासूनच राज्यासह जिल्ह्यातील कोविड बाधितांची संख्या पुन्हा एकदा जोर धरु लागली असून जिल्हा तिसर्या लाटेच्या सावटाखाली आला आहे. मात्र त्याचवेळी दुसर्या लाटेत रुग्णसंख्येच्या बाबतीत महापालिका क्षेत्राशी स्पर्धा करणार्या संगमनेर तालुक्याची स्थिती मात्र अद्यापही साधारण असून लोकसंख्येच्या तुलनेत समोर येणारी रुग्णसंख्या अगदीच नगण्य ठरली आहे. स्थानिक प्रशासनाने ‘मिशन’ समजून राबविलेली लसीकरण मोहीम आणि कोविड नियमांची अंमलीबजावणी करण्याबाबत सातत्याने घेतलेली भूमिका यासाठी कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात दररोज वाढती रुग्णसंख्या दिसत असली तरीही संगमनेर तालुका मात्र रुग्णसंख्येच्या बाबतीत आजतरी समाधानकारक अवस्थेत आहे.
ओमिक्रॉनची दहशत घेवून देशभरात सुरु झालेल्या कोविड संक्रमणाच्या तिसर्या लाटेचे परिणाम दिसू लागले आहेत. देशभरातील अनेक महानगरांमध्ये ‘लॉकडाऊन’ सारखी स्थिती निर्माण झाली असून महाराष्ट्रात नव्याने निर्बंध लागू झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणांना सज्ज करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु झाले असून दहा महिन्यांपूर्वी दुसर्या लोटच्या अनुषंगाने सुरु झालेली लगबग पुन्हा एकदा दृष्टीस पडू लागली आहे. सध्याच्या स्थितीत रुग्ण समोर येण्याची गती मोठी असून वेगाने संसर्ग पसरत असल्याने रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत केंद्र व राज्य सरकारने लसीकरणाचा वेग वाढवण्यासह ‘बुस्टर डोस’ देण्यासाठीही विशेष मोहिमा सुरु केल्याने तिसर्या लाटेतून कोविड मृत्यूचा दर कमीत कमी करण्यावर भर दिला जात आहे. ज्या तालुक्यात लसीकरण मोहिमा राबविण्यात यश मिळाले, अशा तालुक्यातील संसर्गाचा वेग आणि रुग्णांची संख्याही अद्याप नियंत्रणात असल्याचे समोर येणार्या आकडेवारीतून दिसत आहे.
1 मे, 2021 रोजी 18 वर्षांवरील सर्वासाठी लसीकरणाचा मार्ग खुला करण्यात आला होता. सुरुवातीच्या कालावधीत अपूर्या लस पुरवठ्यामुळे व्यापक प्रमाणात लसीकरणाला मर्यादा होत्या. त्यातच दुसर्या लाटेने मानवी जीवाचे प्रचंड नुकसान केल्याने त्यानंतर लसीकरणासाठी रांगा लागल्या, मात्र अनेक ठिकाणी नियोजनाचा अभाव दिसून आल्याने तेथील लसीकरणाचे स्वरुप व्यापक होण्यात अडथळे निर्माण झाले. संगमनेरचे नेतृत्व बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासनाने मात्र लसीकरणाला ‘मिशन’ मानून तालुक्याच्या सर्वदूर लसीकरण मोहीमा राबविल्याने त्याचे परिणाम आता समोर येवू लागले आहेत. संगमनेर नगर पालिकेने शहरी भागातील नागरिकांसाठी विशेष मोहिमा राबवून यात आपला सहभाग नोंदविला. अर्थात सुरुवातीच्या काळात लसीकरणाचे राजकारण झाल्याचेही आरोप करण्यात आले, मात्र लसीकरण सर्वांसाठीच असल्याने त्याचे सकारात्मक फायदे आता दिसू लागले आहे.
लसीकरणाच्या गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील 36 लाख 3 हजार 602 लाभार्थ्यांपैकी 29 लाख 41 हजार 645 जणांना (81.63 टक्के) लशीचा पहिला डोस देण्यात आला. त्यात लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक 3 लाख 10 हजार 639 (86.23 टक्के) डोस एक या संगमनेर तालुक्यात देण्यात आले. तर अहमदनगर महापालिका क्षेत्रात 2 लाख 92 हजार 403 जणांचे लसीकरण झाले. कोपरगाव तालुक्यात 1 लाख 98 हजार 827 (85.28), पारनेर 1 लाख 84 हजार 967 (84.65 टक्के), कर्जत 1 लाख 56 हजार 38 (84.03 टक्के), अकोले 1 लाख 93 हजार 192 (83 टक्के), राहाता 2 लाख 8 हजार 47 (82.88 टक्के), राहुरी 1 लाख 96 हजार 255 (79.42 टक्के), जामखेड 1 लाख 5 हजार 552 (78.97 टक्के), नगर तालुका 1 लाख 84 हजार 450 (78.59 टक्के), नेवासा 2 लाख 21 हजार 174 (78.31 टक्के), श्रीरामपूर 1 लाख 79 हजार 554 (75.24 टक्के), शेवगाव 1 लाख 56 हजार 671 (74.43 टक्के), श्रीगोंदा 1 लाख 92 हजार 884 (74.36 टक्के) व पाथर्डी तालुक्यात 1 लाख 50 हजार 992 (68.28 टक्के) जणांना लशीचा पहिला डोस देण्यात आला.
दुसर्या डोसच्या बाबतीतही टक्केवारीच्या तुलनेत सर्वाधिक डोस अहमदनगर महापालिका क्षेत्रातील 2 लाख 16 हजार 22 (76.63 टक्के) जणांना देण्यात आला. त्या खालोखाल पारनेर 1 लाख 22 हजार 545 (56.08 टक्के), संगमनेर 1 लाख 97 हजार 374 (54.79 टक्के), राहाता 1 लाख 37 हजार 327 (54.71 टक्के), जामखेड 71 हजार 892 (53.79 टक्के), राहुरी 1 लाख 29 हजार 542 (52.42 टक्के), कर्जत 94 हजार 458 (50.87 टक्के), श्रीरामपूर 1 लाख 19 हजार 277 (49.98 टक्के), नगर तालुका 1 लाख 22 हजार 563 (49.54 टक्के), नेवासा 1 लाख 29 हजार 282 (45.77 टक्के), अकोले 1 लाख 12 हजार 245 (48.22 टक्के), शेवगाव 98 हजार 329 (46.71 टक्के), श्रीगोंदा 1 लाख 15 हजार 364 (44.47 टक्के) व पाथर्डी 93 हजार 183 (42.14 टक्के) या प्रमाणे जिल्ह्यातील एकूण 18 लाख 74 हजार 334 (52.01 टक्के) लाभार्थ्यांनी लशीचे दोन्ही डोस घेतले आहे.
वरील आकडेवारीतून जिल्ह्यातील चौदा तालुक्यांत झालेल्या लसीकरणाची माहिती समोर येते. गेल्या आठ दिवसांत वाढत असलेल्या रुग्णसंख्येशी त्याची तुलना करता कोविड संक्रमणाच्या दुसर्या लाटेत जिल्ह्यात दररोज उच्चांकी रुग्ण समोर येणार्या संगमनेर तालुक्यात आजच्या स्थितीत रुग्ण समोर येण्याची गती अतिशय कमी असून तालुक्यात आत्तापर्यंतच्या अकरा दिवसांत सरासरी सात रुग्ण या गतीने 81 जणांची भर पडली आहे. अहमदनगर शहर व तालुका, राहाता, श्रीगोंदा, कोपरगाव, श्रीरामपूर या तालुक्यात होणारी रुग्णवाढ चिंताजनक असून या सर्व तालुक्यांचा मुख्यालयासोबतच अन्य तालुक्यांशी व्यवहार असल्याने यापुढील काळात संक्रमणाची गती अधिक वाढण्याची शक्यता आहे. लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना कोविडची बाधा झाल्यानंतरही प्राणांतीक धोका नसल्याचे निष्कर्ष समोर आलेले असल्याने ज्या नागरिकांनी अद्याप लस घेतलेली नाही त्यांनी त्वरीत नजीकच्या लसीकरण केंद्रात जावून लस टोचून ध्यावी असे आवाहन प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजकुमार जर्हाड व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश घोलप यांनी केले आहे.
लसीकरण लाभार्थ्यांच्या बाबतीत संपूर्ण जिल्ह्यात संगमनेर तालुका अव्वल आहे. संपूर्ण जिल्ह्यात 18 वर्षांवरील नागरिकांची संख्या 36 लाख 3 हजार 602 असून त्यातील 3 लाख 10 हजार 639 नागरिक एक या संगमनेर तालुक्यात आहेत. ही संख्या जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या 10 टक्के इतकी आहे. विशेष म्हणजे कोविड लसीकरणात 3 लाखांपेक्षा अधिक लाभार्थी असलेला संगमनेर हा एकमेव तालुका आहे. अहमदनगर महापालिका क्षेत्रात 18 ते 45 या वयोगटातील नागरिकांची संख्या 2 लाख 92 हजार 403 इतकी आहे. तर नगर तालुक्यातील याच वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या 2 लाख 47 हजार 408 इतकी आहे.