‘अगस्ति’ कारखान्याला इथेनॉल उत्पादन घेण्यास मंजुरी
‘अगस्ति’ कारखान्याला इथेनॉल उत्पादन घेण्यास मंजुरी
नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले तालुक्याची भाग्यलक्ष्मी असणार्या अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल (आसवनी) प्रकल्पाला उत्पादन घेण्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या गळीत हंगामापासून इथेनॉल उत्पन्न घेऊ शकू, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी मंत्री मधुकर पिचड आणि कारखान्याचे उपाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी दिली.

अगस्ति कारखान्याच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कारखान्याने इथेनॉल प्रकल्प हाती घेतला होता. त्याची बांधणी पूर्ण झाली असून उत्पादन घेण्यास इथेनॉल प्रकल्प सज्ज झाला आहे. कारखाना स्थापन होऊन पंचवीस वर्षे झाली आहेत. स्पर्धेच्या काळामध्ये शेजारील कारखान्यांच्या भावाशी स्पर्धा कायम ठेवत कारखान्याने ऊस उत्पादकांचे हित सतत साधले आहे आणि त्यातून या कारखान्याच्या बरोबर जे कारखाने उभे राहिले होते, ते जवळपास आजारी किंवा बंद स्थितीत आहेत. मात्र अगस्ति सहकारी साखर कारखाना आता वेगाने घोडदौड करत असून इथेनॉल उत्पादन घेतल्यानंतर शेतकर्यांच्या पदरामध्ये अधिकचा भाव टाकता येईल अशी भावनाही पिचड यांनी व्यक्त केली. पर्यावरण विभागाने ‘ना हरकत दाखला’ दिल्यावर आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने उत्पादन घेण्याच्या दृष्टीने हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये गळीत हंगाम सुरू होत असून या गळीत हंगामात हा प्रकल्प लागलीच उत्पादन घेण्यास सुरुवात करेल असा दृढ विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या प्रकल्पास ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे, त्याचबरोबर साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शिवाजी देशमुख, संचालक विकास देशमुख यांनी वेळोवेळी या प्रकल्पासाठी बहुमोल मार्गदर्शन केले. त्यामुळेच हा प्रकल्प उभा राहू शकला असल्याबद्दल त्यांनी जाहीर आभारही व्यक्त केले.
![]()
