पठारभागातील बंद घरे होताहेत चोरट्यांचे ‘लक्ष्य’! पोलिसांपुढे ठाकले आव्हान तर नागरिकांत भीतीचे वातावरण
नायक वृत्तसेवा, घारगाव
गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुक्याच्या पठारभागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बंद घरे फोडून मोठ्या प्रमाणात ऐवज चोरण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे एकीकडे चोरट्यांचा बंदोबस्त करणे तर दुसरीकडे घडलेल्या चोर्यांचा तपास लावणे घारगाव पोलिसांपुढे मोठे आव्हान ठाकले आहे.
पठारभागात अज्ञात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यामुळे नागरिक प्रचंड भयभीत झाले आहेत. खंदरमाळ येथील शिवाजी मनाजी फणसे हे कामानिमित्त मुंबई येथे गेले होते. बुधवारी (ता.12) पहाटे अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील 93 हजार 800 रुपये रोख व एक तोळ्याची सोन्याची अंगठी असा एकूण 1 लाख 38 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरुन पोबारा केला. त्यानंतर चोरट्यांनी नांदूर येथीलही चार घरे फोडली. दोन घरांमधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. तसेच घरातील सामानाची उचकापाचक केली.
याचबरोबर घारगाव येथील उपडाकघराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी लोखंडी तिजोरीच चोरून नेली. यामध्ये रोख रक्कम, रेव्हेन्यू स्टँप, पोस्टल ऑर्डरसह, स्टँप पेपर असा एकूण 38 हजार 68 रुपयांचा चोरून नेला आहे. या पार्श्वभूमीवर घारगाव पोलिसांनी समाज माध्यमांद्वारे नागरिकांना आवाहन केले आहे. बंद घरे ही चोरट्यांची लक्ष्ये ठरत आहेत. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मौल्यवान वस्तू सुरक्षितरित्या ठेवाव्यात. तसेच परिसरात कोणीही अनोळखी दिसले तर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, सध्या सुरू असलेले चोर्यांचे सत्र रोखणे आणि पूर्वी घडलेल्या चोर्यांचा तपास लावणे पोलिसांपुढे मोठे आव्हान ठाकले आहे.