संगमनेर शहर पोलिसांकडूनच सिग्नल व्यवस्थेचा ‘खेळ’! पूर्तता होवूनही कर्मचारी ‘गायब’; पोलीस अधिक्षकांचा आदेशही टोपलीतच..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरच्या गचाळ वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानंतर बंद असलेली सिग्नल व्यवस्था पुन्हा सुरु करण्यात आली. अधिक्षकांच्या आदेशाचा सन्मान करताना पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या दोघांनीही आपापल्या जबाबदार्‍या पूर्ण करीत नादुरुस्त दिवे सुरु करण्यासह वाहनांसाठी थांबारेषाही आखून दिली. मात्र प्रत्यक्षात त्यावरुन वाहतुकीचे नियमन करण्याची जबाबदारी असलेले पोलीस अद्यापही सिग्नलवरुन गायबच आहेत. वास्तविक पोलीस अधिक्षकांनी 15 जूनपासूनच सिग्नलद्वारा वाहतूक नियमनाचे आदेशाचे दिले होते. मात्र त्यालाही आता दीड महिन्याचा काळ लोटल्याने शहर पोलिसांच्या निष्क्रिय मानसिकतेचे दर्शन घडू लागले असून त्यांच्याकडूनच सिग्नल व्यवस्थेचा खेळ सुरु असल्याचे दुर्दैवी चित्र सध्या संगमनेरात दिसत आहे.


पाच वर्षांपूर्वी पालिकेने परस्पर खरेदी करुन पाच ठिकाणी बसवलेली सिग्नल व्यवस्था पोलिसांशी समन्वयाच्या अभावातून धूळखात पडून होती. त्यामुळे शहरातील गचाळ वाहतुकीत दिवसोंदिवस भर पडून आजच्या स्थितीत बेशिस्त आणि मनमौजी वाहनधारकांच्या कारणाने शहरातंर्गत वाहतुकीचा बोजवारा उडून हा विषय स्थानिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरु लागला होता. याबाबत माध्यमांनी वारंवार आवाज उठवून शहराच्या गचाळ वाहतुकीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचाही प्रयत्न केला. मात्र निष्क्रियतेची श्रृंखला जोपासणार्‍या पोलिसांवर त्याचा कोणताच परिणाम झाला नाही.


जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच संगमनेरात आलेल्या पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासमोरही शहराच्या वाहतुकीचा मुद्दा उपस्थित झाला. त्यावर त्यांनी 15 जूनपर्यंत शहरातील तीनबत्ती चौक, हॉटेल काश्मिर व अकोले नाका या तीन ठिकाणचे सिग्नल तत्काळ दुरुस्ती करुन घेण्याचे व त्या दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वाहनांसाठी थांबारेषा आणि नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी झेब्राक्रॉसिंगचे पट्टे आखून घेत वाहतुकीचे सक्तिने नियमन करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे गेली काही वर्ष धूळखात पडून असलेल्या शहराच्या सिग्नल व्यवस्थेचे एकप्रकारे पुनःरुज्जीवन होवून शहराच्या गचाळ आणि अतिशय बेशिस्त वाहतुकीला शिस्त लागेल अशी आशा निर्माण झाली होती.


पालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी पोलीस अधिक्षकांच्या आदेशाचा सन्मान करताना तत्काळ वरील तीनही ठिकाणच्या सिग्नल व्यवस्थेची दुरुस्ती करुन पोलिसांच्या सूचनेनुसार त्यात वेळेचे गणितं जुळवले व थांबारेषा आखण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागातील अन्य एक निष्क्रिय उपअभियंता श्याम मिसाळ यांना कळवले. मात्र मलाई लाटण्याच्या नादात त्यांना कर्तव्याची पूर्तता करण्यास वेळच मिळत नसल्याने पालिका व पोलिसांकडून वारंवार आर्जवे करुनही त्यांच्या डोक्यातील ‘ऊ’ वळवळली नाही. त्यामुळे अखेर समाजाच्या बांधिलकीचे अखंड व्रत जोपासणार्‍या दैनिक नायकने आपली भूमिका वठवताना या निष्क्रिय अधिकार्‍याचे चिरहरण केले. त्यानंतरही त्याने अर्धवट स्वरुपात केवळ वाहनांसाठी आडव्या थांबारेषा मारुन हात झटकले.


यासर्व घडामोडी घडून आता जवळपास दोन आठवड्यांचा काळ लोटला आहे. शहरातील तीन ठिकाणी सिग्नल सुरु होण्यासह पोलिसांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकामने अर्धवट का होईना मात्र वाहनांसाठी थांबारेषा आखून दिल्याने पोलिसांनी अधिक्षकांच्या आदेशाचा सन्मान ठेवताना त्यावरुन सक्तिने नियमन सुरु करण्याची अपेक्षा होती. मात्र पूर्तता होवूनही उलटलेला कालावधी बघता स्थानिक पोलिसांनी पोलीस अधिक्षकांचा आदेश टोपलीत टाकल्याचे दिसून येत आहे.


शहरातील सिग्नल व्यवस्था सुरु झाल्यापासून बहुतांश वाहनधारक त्याचे स्वयंस्फूर्तीने पालनही करीत आहेत. मात्र नियम असूनही ते पाळण्याबाबतची सक्ती करणारेच अद्याप आसपास दिसत नसल्याने काही टवाळखोर आणि जन्मतःच बेशिस्त असलेल्यांकडून नियम पाळणार्‍यांचे हसे उडवून सिग्नल व्यवस्थेचे नियम सर्रास तोडले जात असल्याचेही दुर्दैवी चित्र दिसत आहे. त्यातून पोलिसांना शहरातील वाहतुकीचा खेळ करायचाय की काय? अशीही शंका निर्माण झाली असून पोलीस अधिक्षकांच्या आदेशाला चक्क पोलिसांकडूनच टोपली दाखवली जात असल्याने आश्‍चर्यही निर्माण झाले आहे.


तब्बल पाच वर्षानंतर सुरु झालेल्या संगमनेरच्या सिग्नल व्यवस्थेवरुन वाहतुकीचे नियमन व्हावे व वैभवशाली शहराचे बिरुद मिरवणार्‍या संगमनेर शहराच्या गचाळ वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागावी अशी सर्वसामान्य संगमनेरकराला अपेक्षा आहे. त्यामुळे पोलीस अधिक्षकांच्या आदेशाचे शहरात उत्स्फूर्त स्वागत होण्यासह कोणत्याही पोलीस कर्मचार्‍याच्या उपस्थितीशिवायही सुरु करण्यात आलेल्या हॉटेल काश्मिरसमोरील सिग्नलचे बहुतेक वाहनचालक पालन करताना दिसत आहेत. मात्र त्याचवेळी तीनबत्ती चौक आणि अकोले नाका येथील वाहतुकीच्या गचाळपणात मात्र कोणताही बदल नसून कार्यान्वीत असूनही सिग्नलचे नियमन होत नसल्याने लाखों रुपये खर्च करुन उभारलेल्या या यंत्रणेचा पोलिसांकडूनच खेळ सुरु असल्याचे दुर्दैवी चित्र सध्या संगमनेरात दिसत आहे.

Visits: 332 Today: 4 Total: 1108906

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *