शेतकरी सन्मान योजनेतील बनावट लाभार्थ्यांकडून वसुली सुरू

शेतकरी सन्मान योजनेतील बनावट लाभार्थ्यांकडून वसुली सुरू
नायक वृत्तसेवा, राहुरी
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या तालुक्यातील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू झाली आहे. या योजनेच्या निकषांनुसार करदात्या 1124 शेतकर्‍यांकडून 1 कोटी 4 लाख 16 हजार रुपये; तसेच अपात्र 403 शेतकर्‍यांकडून 28 लाख 18 हजार रुपये अशी एकूण 1 कोटी 32 लाख 34 हजार रुपये रक्कम वसूल करण्यात येत आहे.

छोट्या शेतकर्‍यांना आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे. त्याद्वारे लाभार्थी शेतकर्‍याला वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येतात. ही रक्कम तीन टप्प्यांत संबंधित शेतकर्‍याच्या बँक खात्यात जमा होते. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने शेतकर्‍यांची नोंदणी करण्यात आली आहे. ही योजना जाहीर होतानाच तिचे निकष जाहीर झाले. मात्र, योजनेस अपात्र असतानाही अनेकांनी नोंदणी केली. अशा लाभार्थ्यांच्या खात्यांवर शासनाकडून रक्कम जमा होण्यास सुरवात झाली. मात्र, योजनेत बोगस अनेक लाभार्थी घुसल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्यावर, संबंधितांचा शोध सुरू झाला. करदाते, शासकीय नोकरीत असणार्‍या कुटुंबातील सदस्य, शेती करण्यायोग्य असूनही शेतीचा वापर अन्य कारणांसाठी करणारे शेतकरी योजनेच्या निकषात बसत नाहीत. प्रशासनातर्फे विविध बँकांमधून लाभधारक शेतकर्‍यांची माहिती संकलित केली जात आहे. लाभार्थ्यांची पडताळणी करून, अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून हटविण्यात येत आहे. आत्तापर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यांवर वर्ग झालेले पैसेही परत घेतले जात आहेत. त्यासाठी विशेष वसुली पथके नियुक्त करून मोहीम हाती घेण्यात आली आहे. वसूल केलेली रक्कम भरण्यासाठी एक स्वतंत्र बँक खाते उघडले आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत वसुलीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

 

Visits: 192 Today: 1 Total: 2061404

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *