निळवंडे धरणातून सोडले पाच हजार क्युसेक्स पाणी! पाणलोटासह जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; पुढील चार तासात जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
चार दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाचे दमदार पुनरागमन झाले असून पाणलोटातील पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने भरलेल्या भंडारदरा व निळवंडे धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडला जात असल्याने प्रवरा नदीला पुन्हा एकदा पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाणलोटासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने हातातोंडाशी आलेल्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामान खात्याने पुढील चार तासात जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे मोठ्या नद्यांच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.
यंदा पावसाच्या लहरी स्वभावामुळे एकवेळ जिल्ह्यात दुष्काळ पडतो की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. लाभक्षेत्रासह पाणलोटातूनही मान्सूनने काढता पाय घेतल्याने यावर्षी धरणे भरतात की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र रडतखडत सप्टेंबरच्या सुरुवातीला परतलेल्या मान्सूनने जिल्ह्यात सर्वदूर बरसताना लाभक्षेत्रातील खरीप पिकांना जीवदान देण्यासह मुळा, भंडारदरा व निळवंडे या जिल्ह्यातील तीनही धरणांचा पाणीसाठा जलदगतीने फुगवून तो पूर्णत्वाकडे नेला. त्यामुळे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने पूर्णता उघडीप दिल्याने सर्वत्र समाधान निर्माण झालेले असताना गुलाब या गोंडस नावाच्या चक्रीवादळाने वातावरण बदलून टाकले. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळू लागल्याने परिस्थिती बिघडली आहे. अनेक भागातील ओढ्या-नाल्यांना अचानक पूर आल्याने अनेक भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नगर जिल्ह्यातील परिस्थितीही यापेक्षा वेगळी नाही.
गेल्या चोवीस तासांपासून लाभक्षेत्रात कोसळणारा पाऊस धरणाच्या पाणलोटातून मात्र गायब असल्याने परिस्थिती आटोक्यात होती. मात्र आज दुपारनंतर पाणलोट क्षेत्रातही सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने भंडारदरा व निळवंडे धरणात मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. ही दोन्ही धरणे यापूर्वीच काठोकाठ भरलेली असल्याने धरणात ज्या प्रमाणात पाणी दाखल होत आहे, त्याच प्रमाणात विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे पंधरवड्याच्या विश्रांतीनंतर प्रवरानदी पुन्हा एकदा दुथडी भरुन वाहू लागली आहे. आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास भंडारदरा धरणाच्या सांडव्याचे दार पुन्हा एकदा वरती उचलण्यात आले असून त्याद्वारे 1 हजार 218 क्युसेक्स तर विद्युतगृहाच्या मोरीद्वारे 816 क्युसेक्स असा एकूण 2 हजार 34 क्युसेक्सचा प्रवाह नदीपात्रात सोडला जात आहे. भंडारदरा पाठोपाठ निळवंडे धरणाच्या पाणलोटातही पावसाला जोर चढल्याने निळवंडे धरणाच्या सांडव्याद्वारे 4 हजार 103 क्युसेक्स व विद्युतगृहा द्वारे 650 क्ययुसेक्स असा एकूण 4 हजार 753 विसर्ग सोडला जात आहे. त्यामुळे हंगामात सलग दुसऱ्यांदा प्रवरा नदीला पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Visits: 183 Today: 1 Total: 1426228

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *