साडेतिनशे गुन्ह्यांची फाईल पोलीस महासंचालकांकडे! घटनेला आठ दिवस उलटूनही अधिकार्‍यावर कारवाई नाही; मंगळवारपासून पुन्हा आंदोलन..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गोवंश कत्तलखान्यांच्या इतिहासात राज्यातील सर्वात मोठी कारवाई होवून आठ दिवस उलटत आले तरीही प्रभारी अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई झालेली नाही. थातुरमातूर कारणांनी यापूर्वी जिल्ह्यातील काही निरीक्षक ‘कक्ष जमा’ झाल्याची उदाहरणे ताजी असतांना संगमनेरच्या बाबतीत मात्र त्याला फाटा दिला जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. काही महिन्यांपूर्वी नेवाशाच्या निरीक्षकांना वाळू तस्कराशी कथीत संबंधावरुन तातडीने कक्ष जमा करण्यात आले, श्रीरामपूरच्या निरीक्षकांना गुटखा प्रकरणात तर अकोल्याच्या निरीक्षकांना कर्मचार्‍याच्या लाचखोरीत अशाच कारवाईचा सामना करावा लागला. संगमनेरचे पोलीस निरीक्षक मात्र या सर्वांना वरचढ ठरले असून कारवाई होवून आठवडा उलटत आला तरीही त्यांच्यावरील कारवाईच्या हालचाली दिसत नसल्याने संगमनेरातील हिंदुत्त्ववादी संघटनांनी ‘स्थगीत’ केलेले आंदोलन मंगळवारपासून पुन्हा सुरु करण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात नवीन नगर रस्त्यावर पुन्हा एकदा आंदोलकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यातच आता गेल्या आठ-दहा वर्षात झालेल्या सुमारे साडेतिनशे गुन्ह्यांचा तपशिल असलेली फाईल थेट राज्याच्या पोलिस मंहासंचालकांना सोपविण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे प्रांताध्यक्ष शंकरराव गायकर यांनी त्यांची वेळ मागीतली आहे. येत्या 11 ऑक्टोबररोजी त्यांची भेटही ठरली आहे.


गेल्या शनिवारी (ता.2) संगमनेरातील जमजम कॉलनी भागातील पाच साखळी कत्तलखान्यांवर अहमदनगर पोलिसांनी छापा घालून कारवाई केली होती. गोवंश कत्तलखान्यांच्या इतिहासात सर्वात मोठी कारवाई ठरलेल्या या छाप्याने संपूर्ण राज्याचे लक्ष्य संगमनेरच्या कत्तलखान्यांवर खिळले. या कारवाईची दखल अगदी राष्ट्रीय पातळीवरील माध्यमांनीही घेतली. मात्र त्याचा कोणताही परिणाम येथील पोलिस यंत्रणेवर झाल्याचे दिसून येत नाही. या कारवाईनंतर शहरातील हिंदुत्त्ववादी संघटनांनी गेल्या सोमवारी (ता.4) प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलनही केलं. त्याची फलनिष्पत्ती तहसीलदारांनी सदर कत्तलखाने 48 तासांत ‘जमिनदोस्त’ करण्याचे मुख्याधिकार्‍यांना आदेश बजावले व श्रीरामपूरच्या अप्पर अधीक्षकांनी सात दिवसांत चौकशी करुन दोषींवर कारवाई करणार असल्याचे आदोलकांना लेखी आश्वासन दिले. मात्र अद्याप पोलीस निरीक्षकांवरील कारवाईबाबत हालचाली दिसत नसल्याने या संघटनांनी दिलेल्या मुदतीनंतर दुसर्‍या दिवसापासून म्हणजे येत्या मंगळवारपासून पुन्हा आंदोलन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.


दुसरीकडे विश्व हिंदू परिषदेचे प्रांताध्यक्ष शंकरराव गायकर दोन दिवसांपूर्वी संगमनेरात आले होते. यावेळी बजरंग दलाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांना साडेतिनशेहून अधिक गुन्ह्यांचा कच्चाचिठ्ठा असलेली फाईल त्यांच्याकडे सोपविली. या फाईलमधून गेल्या दहा वर्षातील या कारवायांतून पोलिसांचे कसायांशी असलेले आर्थिक संबंध स्पष्ट होणार आहेत. त्यांच्या माध्यमातून हा विषय केंद्रीय पातळीवरही पोहोचवण्यात आला असून संगमनेरच्या कत्तलखान्यांचा विषय राज्याच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न सुरु असल्याची मााहिती दैनिक नायकला मिळाली आहे. त्यामुळे नवरात्रीचा यापुढील काळ आंदोलनांसह राजकीय आरोप व प्रत्यारोपाचा ठरणार आहे हे मात्र निश्चित आहे.


शुक्रवारच्या अंकात दैनिक नायकने कत्तलखान्यांवरील कारवाईत सापडलेल्या ‘डायरी’वरील पडदा बाजूला सारण्याचा प्रयत्न केला होता. सदरची डायरी महत्त्वाचा पुरावा म्हणून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेली आहे. या डायरीत पोलीस अधिकार्‍यांचीही नावे असल्याने ‘ती’ सीलबंद अवस्थेत आहे, न्यायालयासमोरच त्याचे सील उघडण्यात येणार आहे. या डायरीत दैनिक नायकने शुक्रवारी नमूद केलेल्या नावांसह आणखी काही धक्कादायक नावेही समोर आली आहे. सदरची डायरी पोलिसांच्या ताब्यात देण्यापूर्वी प्राणीकल्याण अधिकारी यतीन जैन यांनी त्याचे संपूर्ण छायाचित्रण करुन घेतले आहे. प्रत्यक्ष डायरी हस्तगत करण्यापासून ती पोलिसांच्या ताब्यात देईपर्यंतच्या घटनेचे चित्रण असल्याने ‘ती’ डायरी न्यायालयात निर्णायक ठरणार आहे. गायीच्या रक्ताने हात माखलेल्या ज्यांची नावे त्यात आहेत, त्यांची दैनिक नायकच्या शुक्रवारच्या वृत्तानंतर झोपच उडाली आहे. या धाडशी वृत्ताचे अनेकांनी प्रत्यक्ष भेटून, फोन करुन व संदेशाद्वारे कौतुकही केले आहे.

Visits: 102 Today: 1 Total: 1110472

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *