दूध उत्पादकांनी रोखला कोल्हार-घोटी राज्यमार्ग! ‘शिवआर्मी’ संघटनेचे आंदोलन; शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त सहभाग..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
व्यावहारिकदृष्टीने अतिशय गरजेचे असल्याने दूधाला तातडीने 40 रुपये प्रति लिटर भाव, दूधाचे भाव पडल्यापासून आत्तापर्यंतची नुकसान भरपाई म्हणून दूध उत्पादकांना प्रति लिटर 15 रुपये नुकसान भरपाई, ऊसाप्रमाणेच दूधालाही हमीभाव, दूधव दूग्धजन्य पदार्थाची आयात थांबवून निर्यातीला प्रोत्साहन, शेती व जनावरांची औषधे करमुक्त करण्यासह दूधातील भेसळ रोखण्यासाठी कठोर कायदे करण्याच्या मागणीसाठी शिवआर्मी दूध उत्पादक शेतकरी संघटनेने आज चिखली गावातून जाणारा कोल्हार-घोटी राज्यमार्ग रोखून धरला होता. त्यामुळे या मार्गावरुन होणारी वाहतूक सुमारे दोनतासांहून अधिक वेळ खोळंबली होती. या आंदोलनात दूध उत्पादक व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दूधाच्या पडलेल्या भावामूळे दूध उत्पादकांना जनावरे सांभाळणे जिकरीचे झाले आहे. त्यामुळे अनेकांना नाईलाजाने आपली जनावरे विकावी लागत असून दूध उत्पादक हवालदील झाले आहेत. मात्र शासनाकडून कोणतीही शाश्‍वत कारवाई होत नसल्याने दूध व्यवसायावर संकट ओढावले आहे. या गंभीर मुद्द्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवआर्मी दूध उत्पादक व शेतकरी संघटनेच्या वतीने आज (ता.28) तालुक्यातील चिखली येथे रास्तारोको आंदोलनाची हाक देण्यात आली होती.


सकाळी साडेनऊच्या सुमारास शेकडोंच्या संख्येने जमलेल्या शेतकरी व दूध उत्पादकांनी कोल्हार-घोटी राज्यमार्गावर बसून रास्तारोको आंदोलन सुरु केले. यावेळी शेतकर्‍यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जोरदार घोषणाबाजीही केली. यावेळी विविध शेतकरी नेत्यांनी बोलताना व्यावहारिक दृष्टीने दूधाला तत्काळ 40 रुपये प्रति लिटरप्रमाणे भाव देण्याची मागणी करताना दूधाचे भाव कोसळल्याने दूध उत्पादकांचे अतोनात नुकसान झाल्याची बाब समोर आणून अशा दूध उत्पादकांना तत्काळ 15 रुपये प्रति लिटरप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.


तसेच, दूधाला ऊसाप्रमाणेच हमीभाव (एफआरपी) देण्यात यावा, दूध व त्यापासून तयार होणार्‍या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आयात होणार्‍या अशा पदार्थांवर बंदी घालून निर्यातीला अधिक प्रोत्साहन देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. शेती व जनावरांसाठी लागणार्‍या औषधांसी अवजारांवरील जीएटी काढून या गोष्टी करमुक्त कराव्यात व दूधात भेसळ करणार्‍यांना कायमचा धडा शिकवण्यासाठी स्वतंत्र कायदा करुन दोषींना कठोर शासन करावे अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या. जवळपास दोनतास चाललेल्या या आंदोलनामुळे संगमनेर-अकोल्याकडे होणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. महसूल विभागाला आपल्या मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

Visits: 13 Today: 1 Total: 79456

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *