आनंद वार्ता! भंडारदर्याच्या पाणलोटात मान्सूनचे आगमन! पहिल्याच पावसात पाणीसाठा वाढला; संगमनेर, कोपरगाव वगळता लाभक्षेत्र मात्र कोरडेच..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाने राज्यावर दुष्काळाचे संकट घोंगावत असतानाच सोमवारी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी आगमनासह मान्सूनने भंडारदरा धरणाच्या पाणलोटातही हजेरी लावली. त्यामुळे खपाटीला चाललेल्या या धरणाच्या साठ्यात वाढीचा शुभारंभ होण्यासह 19 दशलक्ष घनफूटाची भर पडली. धरणातून उन्हाळी आवर्तन सुरु असतानाच राज्यावरील दुष्काळाच्या संकटाची चाहूल लागल्याने तातडीने आवर्तन बंद करण्यात आले होते, मात्र तो पर्यंत भंडारदरा आणि निळवंडे धरणाच्या पाणीसाठ्यात कमालीची घट झाल्याने पाऊस लांबल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची भीती दाटली होती. सोमवारी कमी प्रमाणात का होईना, मात्र भंडारदर्याच्या पाणलोटात सर्वदूर मान्सूनने हजेरी लावल्याने डोंगरवाटांवरील प्रवाह सक्रिय झाले असून संपूर्ण पाणलोट क्षेत्राला मान्सूनच्या ढगांनी वेढा घातल्याने लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मान्सूनपूर्व स्थिती अनुकूल असतानाही अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाने त्याच्या प्रवासात अडथळे निर्माण केल्याने राज्याच्या वेशीवर येतायेता पाऊस थांबला, त्यामुळे राज्यातील जनतेच्या चिंता वाढल्या होत्या. राज्य शासनानेही वातावरणीय बदलांच्या अहवालानुसार यंदा मान्सूनच्या कालावधीत चक्रीवादळाचा प्रभाव दीर्घकाळ राहणार असल्याने राज्यातील बहुतेक भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यासर्व घडामोडी गेल्या महिनाभरात घडल्याने तो पर्यंत राज्यातील बहुतेक जलाशयांमधून मान्सूनचा कालावधी विचारात घेवून उन्हाळी आवर्तन सोडले गेले होते किंवा सुरु होते. मात्र हवामान खात्याचा अंदाज येताच शासनाने राज्यातील सर्व जलाशयांमधील जलसाठे आरक्षीत करण्याचा निर्णय घेत त्याचे सर्वाधीकार जिल्हाधिकार्यांना सोपवल्याने राज्याची चिंता वाढली होती.

अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यासाठी जीवनदायी असलेल्या मुळा, भंडारदरा व निळवंडे या सुमारे 45 हजार दशलक्ष घनफूट क्षमतेच्या धरणांच्या पाणलोटात मुंबई पाठोपाठ मान्सूनचे आगमन होते. त्या अंदाजानुसार भुतकाळातील काही अपवाद वगळता 12 जूनपर्यंत तिनही धरणांच्या पाणलोटात सर्वदूर मान्सूनच्या ढगांचा व्याप वाढलेला असतो. यंदा मात्र निम्मा जून सरल्यानंतरही चक्क पाणलोट क्षेत्रातच लख्ख सूर्यप्रकाश दिसू लागल्याने आणि त्यातच प्रचंड उष्णतेच्या कारणाने मोठ्या प्रमाणात बाष्पीभवनही सुरु असल्याने पिण्याच्या पाण्याबाबतचा प्रश्न बिकट होण्याची गंभीर शक्यता दाटू लागली होती. मात्र सोमवारी निसर्गाने आपण अगाध असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करताना चिंतामग्न चेहर्यांवर हास्य फुलवण्याची किमया साधली आहे.

सोमवारी माध्यान्नाचा सूर्य पश्चिमेच्या दिशेने कलत असतानाच भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील पांजर्यापासून रतनवाडीपर्यंतच्या संपूर्ण क्षेत्राला मान्सूनच्या काळ्याकूट्ट ढगांनी वेढा घालीत कोसळायला सुरुवात केली. सुमारे तासाभराच्या कोसळधारानंतर जलधारा थांबल्या खर्या, मात्र त्यानंतरही ढगाळ वातावरण आणि मान्सूनसाठी पोषक स्थिती कायम असल्याने पाणलोटासह लाभक्षेत्रातील आशा उंचावल्या आहेत. काही स्थानिक जाणकारांनी पुढील आठवडाभर पाणलोटातील पावसाचे प्रमाण कमी-अधिक प्रमाणात टीकून राहील असा अंदाज वर्तवल्याने कालपर्यंत कपाळावर चिंतेच्या रेषा घेवून वावरणार्या लाभक्षेत्रातील नागरिकांच्या चेहर्यावर समाधानाचे भाव दिसू लागले आहेत.

आज (ता.23) सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासांत अकोले तालुक्याच्या पश्चिम घाटमाथ्यावरील भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील पांजरे येथे 37 मि.मी., भंडारदरा 28 मि.मी., रतनवाडी 23 मि.मी. व घाटघर येथे 22 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने हंगामात पहिल्यांदाच सह्याद्रीच्या कडेकपारीतून पाण्याचे ओहळ वाहू लागले असून 24 तासांत भंडारदरा धरणात हंगामात पहिल्यांदाच 19 दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली आहे. सोमवारी पाणलोटात हजेरी लावणार्या मान्सनने जिल्ह्याच्या उर्वरीत भागाला मात्र ठेंगा दाखवल्याचे चित्र होते. आज सकाळी संपलेल्या 24 तासांत पाणलोट क्षेत्राशिवाय उत्तरेतील कोपरगाव 28 मि.मी., संगमनेर 11 मि.मी. व राहाता येथे दोन मि.मी. वगळता उर्वरीत जिल्ह्यात कोठेही पाऊस नोंदवण्यात आलेला नाही. मात्र भंडारदर्यात नवीन पाण्याची आवक सुरु झाल्याने समाधानासह आनंद व्यक्त केला जात आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रिवादळामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी होण्याची दाट शक्यता असून सरकारने राज्यातील सर्व धरणांचे पाणीसाठे नियंत्रित केले आहेत. त्या शिवाय यंदा पावसाचे घटणारे प्रमाण लक्षात घेवून बहुतेक जिल्ह्यांमध्ये पाणीकपातही सुरु करण्यात आली आहे. अशासर्व पार्श्वभूमीवर सोमवारी अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जीवनदायी मानल्या जाणार्या भंडारदरा धरणाच्या पाणलोटात मान्सूनचे आगमन झाल्याने आनंदाचे वातावरण आहे. कालच्या पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात किंचित वाढही झाली आहे. आज सकाळी आठ वाजता जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मुळा धरणाचा पाणीसाठा 6 हजार 546 दशलक्ष घनफूट (25.15 टक्के), भंडारदरा 2 हजार 378 दशलक्ष घनफूट (21.54 टक्के), निळवंडे एक हजार 560 दशलक्ष घनफूट (18.75 टक्के) व आढळा 366 दशलक्ष घनफूट (34.53 टक्के) इतका नोंदवला गेला आहे.

