पैशांच्या वादातून खून करणार्यास जन्मठेपेची शिक्षा नगर येथील घटना; जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
नायक वृत्तसेवा, नगर
घर बांधण्यासाठी हातउसने दिलेले एक लाख रुपये मागितल्याचा राग आल्याने मित्राचा खून केल्याबद्दल कृष्णा रघुनाथ गायकवाड (वय 30, हल्ली रा. सावेडी) यास जन्मठेप आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी ठोठावली आहे.
बाळासाहेब अंबादास इथापे यांची नगर-मनमाड महामार्गावर पद्मावती इंधन पंपाशेजारी चहाची टपरी होती. ते कुटुंबियांसह याठिकाणी राहत होते. त्यांच्या शेजारी कृष्णा गायकवाड (हल्ली रा. सावेडी, मूळ रा. तेलकुडगाव, ता. नेवासा) हा राहत होता. बाळासाहेब इथापे यांचा मुलगा योगेशचा कृष्णा हा मित्र होता. कृष्णा यास घर बांधण्यासाठी योगेशने एक लाख रुपये हातउसने दिले होते. योगेश हा 20 जून, 2019 रोजी कृष्णा यांच्या पंक्चरच्या दुकानावर पैसे मागण्यासाठी गेला होता. त्यावेळेस कृष्णा याने टॉमीच्या सहाय्याने योगेशला बेदम मारहाण केली. त्यावेळेस बाळासाहेब इथापे हे त्याला सोडविण्यासाठी गेले होते. त्यांनाही ढकलून आरोपी कृष्णा हा टॉमी घेऊन इंधन पंपाच्या मागील बाजूस पळून गेला.
योगेशला उपचारांसाठी सावेडीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले. सरकारतर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, घटनास्थळाचे पंचनामे, वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. कृष्णा याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याने त्यास जन्मठेप आणि एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी सरकारतर्फे काम पाहिले.