‘संगमनेर-शिर्डी’च्या लढतींकडे राज्याचे लक्ष! आजी-माजी महसूलमंत्र्यांची लढाई; एकमेकांच्या मतदारसंघात शड्डू ठोकले..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अपवाद वगळता एकमेकांचे अभेद्य बालेकिल्ले राहिलेल्या माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘संगमनेर’ आणि विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण-विखे पाटील यांच्या ‘शिर्डी’ मतदारसंघात यावेळी मात्र मोठी चुरस निर्माण झाल्याचे बघायला मिळत आहे. राज्याच्या राजकारणात मोठा वारसा बाळगणार्‍या या दोघाही दिग्गज नेत्यांमधील राजकीय वैर कधीही लपून राहिलेले नाही. मात्र लोकसभा निवडणुकीत दक्षिणेत झालेल्या पराभवाची सल म्हणून डॉ.सुजय विखे-पाटील यांनी महिन्याभरापूर्वीच तालुक्यात प्रचाराचा धुरळा उडवल्याने आणि थोरात यांच्या कन्या डॉ.जयश्री यांनीही त्याला तितक्याच जोरकसपणे प्रत्त्यूत्तर दिल्याने संगमनेरची निवडणूक रंगात आलेली असतानाच माजी महसूलंमंत्र्यांनी थेट शिर्डी मतदारसंघात तर, विद्यमान महसूलमंत्र्यांनी संगमनेर मतदारसंघात जावून एकमेकांवर तोफा डागण्यास सुरुवात केल्याने या दोन्ही ठिकाणच्या लढती राज्याच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.


राजकीय विस्तारवादाच्या लढाईत एकमेकांच्या राजकारणात अलिखित लक्ष्मणरेषा पाळणार्‍या विखे-पाटील आणि थोरात या दोन्ही राजकीय घराण्यांमध्ये अधुूनमधून एकमेकांवर राजकीय कुरघोड्या करण्याचे प्रकार सुरुच असतात. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर मात्र त्याला अधिक धार आली. त्यातच बाळासाहेब थोरात यांनी कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या गेल्यावेळच्या पराभव प्रकरणाला पुन्हा हवा देत त्यांचे सुपूत्र विवेक कोल्हे यांना सोबत घेवून गणेश कारखाना आणि नंतर संस्थानच्या कामगार सोसायटीवर वर्चस्व प्रस्थापित केले. लोकसभा निवडणुकीत विखे-पाटलांच्या निवडणूक यंत्रणेसमोर अगदीच तोकड्या ठरणार्‍या नीलेश लंके यांच्या हाताला बळ देत थोरात यांनी आपली संपूर्ण यंत्रणा दक्षिणेत उतरवली. त्यामुळे विखे-पाटलांची अक्षरशः दमछाक होवून अखेर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.


दक्षिणेत झालेल्या पराभवाला माजीमंत्री बाळासाहेब थोरात कारणीभूत असल्याची सल डॉ.सुजय विखे-पाटलांच्या मुखातून अनेकदा बाहेर पडली. त्याचवेळी विधानसभा निवडणुकीत त्याची परतफेड करण्याचा चंग बांधला जात असल्याचा अंदाज आला होता. विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा होताच त्याचा प्रत्ययही यायला सुरुवात झाली आहे. विखे-पाटीलांनी संगमनेरमध्ये लक्ष घातल्यानंतर गप्प बसतील ते थोरात कसे! त्यामुळे दक्षिणस्वारीनंतर त्यांनी आपला मोर्चा थेट शिर्डीकडे वळवून 1978 साली शिर्डीचे नेतृत्त्व करणार्‍या घराण्यातील प्रभावती घोगरे यांच्या पंखात बळ भरण्यास सुरुवात केली. त्यातच राहात्याचे माजी नगराध्यक्ष, भाजपनेते राजेंद्र पिपाडा यांनी पुन्हा एकदा बंडखोरी करीत उमेदवारी दाखल केल्याने शिर्डीत तिरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे.


संगमनेर विधानसभा मतदारसंघात 1985 पासून माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. 1978 साली इंदिरा काँग्रेसकडून उमेदवारी करणार्‍या भाऊसाहेब थोरात यांनी जनता पक्षाच्या बी.जे.खताळ-पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर 1980 साली पक्षाने पुन्हा खताळ यांना उमेदवारी दिली. 1985 साली भाऊसाहेब थोरात यांनी त्यांचे सुपूत्र बाळासाहेब यांच्यासाठी उमेदवारीची मागणी केली. मात्र पक्षाने त्यांना डावलून शंकुतला थोरात यांना उमेदवारी जाहीर केल्याने थोरात यांनी बंडखोरी करीत काँग्रेसच्या उमेदवाराचा दहा हजारांहून अधिक मतांनी पराभव करीत विधानसभा गाठली. तेव्हापासून या मतदारसंघावर त्यांचे एकहाती वर्चस्व आहे. महाराष्ट्र विधानसभेत गणपतराव देशमुख यांच्यानंतर सर्वाधीक ज्येष्ठ सदस्य म्हणूनही थोरात यांना ओळखले जाते. यावेळी ते नवव्यांदा निवडणूक लढवणार आहेत.


मतदारसंघाची रचना झाल्यापासूनच्या चारपैकी तीन निवडणुकांमध्ये अपक्षांचा वरचष्मा राहिलेल्या शिर्डी मतदारसंघात 1978 साली चंद्रभान घोगरे यांच्या रुपाने काँग्रेसला स्थीर सत्ता मिळाली. त्यानंतर 1980 साली झालेल्या मूदतपूर्व निवडणुकीत काँग्रेसचे दोन गट पडले आणि इंदिरा काँग्रेसच्या चिन्हावर शिर्डीत अण्णासाहेब म्हस्के यांच्यारुपाने नवा लोकप्रतिनिधी मिळाला. त्यानंतर तिनही निवडणुकांमध्ये ते काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले. 1995 साली शिर्डी मतदारसंघातून राधाकृष्ण विखे यांच्या रुपाने विखे-पाटलांच्या तिसर्‍या पिढीचा राज्याच्या राजकारणात प्रवेश झाला. त्यांनी त्यावेळी शिवसेनेच्या धनंजय गाडेकर यांचा 17 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. तेव्हापासून या मतदारसंघातून ते निर्विवादपणे निवडून येतात. यावेळी त्यांची ही सातवी निवडणूक आहे.


गणेश कारखाना, दक्षिणेतील पराभव यामुळे डॉ.सुजय विखे-पाटील यांनी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गटनिहाय सभा घेवून निवडणुकीचे वातावरण तापवले. शिवसेनेच्या अमोल खताळ यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरीही त्यांची संपूर्ण प्रचार यंत्रणा विखे-पाटलांकडून राबवली जात आहे. विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही सभांचा धडाका लावला आहे. त्यामुळे एकहाती सत्ता असली तरीही वाढता जनाधार कायम राखण्यासाठी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना व त्यांच्या यंत्रणेला मोठी कसरत करावी लागत आहे. तर, दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांनीही शिर्डी मतदारसंघावर आपले लक्ष केंद्रीत करताना प्रभावती घोगरे यांच्या प्रचाराची जबाबदारी घेत त्यांच्या प्रचारार्थ एकामागून एक सभांचा धडाका लावून ‘दहशत मुक्त शिर्डी’चा नारा दिल्याने संगमनेरसह शिर्डीतील निवडणुकही प्रचंड तापली आहे.


त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांवर राज्यातील सर्वच माध्यमांचे लक्ष खिळले असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपासह विकास आणि दहशत हे दोन मुद्दे आत्तापर्यंत चांगलेच चर्चेत आले आहेत. बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ.जयश्री यांनी त्यांच्या प्रचाराची संपूर्ण धुरा खांद्यावर घेतली असून तुम्ही पक्षासाठी राज्यात काम करा, आम्ही मतदार संघात आहोत असे सांगत त्यांनीही प्रचाराची अक्षरशः राळ उठवली आहे. महिला व तरुणींमधून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्रही बघयला मिळत आहे. अशा विविध कारणांनी या दोन्ही मतदारसंघांकडे राज्याचे लक्ष केंद्रीत झाले असून जिल्ह्यातील या दोन्ही लढती लक्षवेधी ठरणार आहेत.


दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांनी 1962 पासून अपवाद वगळता 54 वर्ष सांगोला मतदारसंघाचे नेतृत्त्व केले होते. ते 11 वेळा मोठ्या मताधिक्क्याने विधानसभेत निवडून गेले. देशात त्यांच्यानंतर 10 वेळा निवडून येण्याचा मान तामीळनाडूचे दिवंगत नेते एकरुणानिधी यांना होता. राज्य विधानसभेत देशमुख यांच्यानंतर बाळासाहेब थोरात यांना ज्येष्ठनेते म्हणून ओळखले जाते. ते यावेळी 1985 पासून सलग नवव्यांदा निवडणूकीत उतरले आहेत. तर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील 1995 पासून सलग सातव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या मतदारसंघात लक्ष घातल्याने संगमनेर आणि शिर्डी मतदारसंघाची निवडणूक लक्षवेधी ठरत आहे.

Visits: 45 Today: 3 Total: 113511

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *