बेलापूरकरांसारखा आदर्श उपक्रम इतरांनी राबवावा ः पाटील पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गणेश मंडळांना बक्षीस वितरण

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
माझ्या 25 वर्षांच्या नोकरीत पोलीस बंदोबस्त नको असे म्हणणारे बेलापूर हे पहिले गाव पाहिले आहे. सण, उत्सव, जयंत्या मोठ्या उत्साहात साजर्या करा त्याचा आनंद लुटा; असे सण उत्सव साजरेे करत असताना बेलापूरकरांसारखा समाजात आदर्श निर्माण होईल असा उपक्रम राबवा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, बेलापूर ग्रामपंचायतीचा शतक महोत्सव याचे औचित्य साधून बेलापूरकरांनी गणेशोत्सव काळात गावात शांतता राखून विना पोलीस बंदोबस्तात गणेश विसर्जन पार पाडले. गणोशोत्सव काळात जिवंत देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण तसेच गणेश मंडळांना सन्मानपत्र असा कार्यक्रम बेलापूर येथील जुने बालाजी मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले हे होते. यावेळी सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, बेलापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे, रणजीत श्रीगोड, कनजी टाक, एकनाथ नागले, साहेबराव वाबळे, सुधाकर खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख, रामेश्वर सोमाणी, बाळासाहेब दाणी, विष्णूपंत डावरे, रवींद्र कोळपकर, पोलीस पाटील अशोक प्रधान, अन्वर सय्यद, प्रभात कुर्हे, शफीक बागवान, जाकीर शेख आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

पोलीस अधीक्षक पाटील म्हणाले, आनंद लुटतानाही मनात काहीतरी भिती असते. त्यामुळे पोलीस बंदोबस्ताची मागणी केली जाते. बेलापुरगावाने विना पोलीस बंदोबस्तात गणेश विसर्जन मिरवणूक काढण्याचा दिलेला शब्द खरा करुन दाखविला. बेलापूरच्या नेतृत्वाचे हे यश आहे. बेलापूरकरांनी राबविलेला हा बेलापूर पॅटर्न जिल्ह्यात नव्हे तर राज्यात लागू व्हावा, अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली. याप्रसंगी देखावा स्पर्धेत प्रथम क्रमांक हिंदू संघटक वीर सावरकर मित्रमंडळ रुपये पाच हजार, द्वितीय क्रमांक छत्रपती तरुण मंडळ रुपये तीन हजार तृतीय क्रमांक, गौरी गणेश बाल मित्रमंडळ रुपये दोन हजार, सिध्दी विनायक युवामंच रुपये एक हजार, रामराज्य मित्रमंडळ रुपये एक हजार तसेच सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला. तसेच गणेश विसर्जन शांततेत पार पाडल्याबद्दल सर्व गणेश मंडळ पोलीस पाटील जामा मस्जिद ट्रस्ट महावितरणचे अधिकारी कर्मचारी, गणेश विसर्जन काळात मदत करणारे सफाई कर्मचारी, पोहणारे, बेलापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी आदिंचा सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला. प्रास्ताविक उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी केले. सूत्रसंचलन पत्रकार देविदास देसाई यांनी केले तर प्रफुल्ल डावरे यांनी आभार मानले.
