राज्याच्या राजकारणात पुन्हा ‘रुट’ बदलण्याचे संकेत? पवार-थोरात-लंकेची धावती खलबते; राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला उधाण..

श्याम तिवारी, संगमनेर
राजकारणात कधी कधी एखादी सभा, भाषण किंवा पत्रकार परिषदही जेवढी चर्चा घडवू शकत नाही, तेवढी चर्चा एका गाडीतील काही किलोमीटरच्या प्रवासातूनही होवून जाते. बुधवारी प्रवरानगरकडे निघालेल्या एका वाहनाने नेमके हेच करुन दाखविले. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक तथा राज्याच्या राजकारणातील ‘ग्रँडमास्टर’ शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजीमंत्री बाळासाहेब थोरात आणि नगर दक्षिणेचे खासदार नीलेश लंके हे तिघेही एकाच वाहनातून प्रवरानगरला रवाना झाल्याचे दृश्य समोर आले आणि राज्यातील राजकीय विश्लेषकांपासून गावच्या कट्ट्यावरील राजकारणप्रेमींपर्यंत सर्वांच्या चर्चेला अक्षरशः उधाण आले.

प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमासाठी शरद पवार पुण्याहून निघाले होते. संगमनेर येथे त्यांनी बाळासाहेब थोरात यांना आपल्या वाहनात घेतले आणि पुढे प्रवरानगरकडे प्रस्थान केले. वरकरणी पाहता हा साधा प्रवास. पण, महाराष्ट्राच्या राजकारणात साधेपणातच सर्वात मोठे संकेत दडलेले असतात. त्यामुळे या गाडीतील संवादापेक्षा त्याच्या अर्थांवर अधिक चर्चा रंगू लागली आहे. शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांचे संबंध केवळ राजकीय नसून विश्वास, संवाद आणि परस्पर आदराच्या पायावर उभे असल्याचे गेल्या तीन दशकांतील घटनांनी अनेकदा सिद्ध केले आहे. काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर राज्यभर काँग्रेसची पडझड होत असतानाही थोरातांनी पक्षनिष्ठा कायम ठेवली. मात्र त्यामुळे पवार-थोरात समीकरणात कधीही कटुता निर्माण झाली नाही. उलट अनेक निर्णायक राजकीय घडामोडींमध्ये दोघांनी एकमेकांवरील विश्वास टिकवून ठेवला आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर तर या दोघांनी महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहास घडविला होता. भाजप आणि शिवसेना यांच्यातील मुख्यमंत्रीपदाच्या संघर्षातून निर्माण झालेल्या संधीचे सोनं करत महाविकास आघाडीची रचना करण्यात शरद पवार आणि तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा मोठा वाटा होता. राजकीय गणितातील अशक्यप्राय बेरीज शक्य करुन दाखविणार्या या दोन नेत्यांना त्या काळात महाविकास आघाडीचे ‘शिल्पकार’ म्हणून गौरवण्यात आले होते.

मात्र राजकारणात स्थैर्य हा शब्द फार काळ टिकत नाही. एकनाथ शिंदे यांच्या बंडाने शिवसेना दुभंगली आणि काही महिन्यांतच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उभी फूट पडली. विरोधकांच्या तंबूत निर्माण झालेल्या या धक्क्यांमुळे महाविकास आघाडीची मूळ रचना हादरली. त्यानंतरच्या बहुतांश निवडणुकांमध्ये महायुतीने आघाडी घेतल्याने विरोधकांच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. अशा पार्श्वभूमीवर पवार आणि थोरात यांची धावती भेट अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे.

विशेष म्हणजे या प्रवासात खासदार नीलेश लंके यांची उपस्थितीही राजकीय वर्तुळासाठी वेगळेच संकेत घेऊन आली. नगर जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये लंके हे शरद पवारांच्या गटातील आक्रमक चेहरा मानले जातात. त्यामुळे गाडीत बसलेले हे तिघे नेते नेमके कोणत्या विषयावर चर्चा करीत होते, याबाबत राजकीय पंडितांनी तर्कांच्या घोडदौडी सुरु केल्या आहेत. काहींना आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे गणित दिसत आहे, तर काहींना विरोधकांच्या नव्या रणनीतीची चाहूल लागत आहे. प्रवरानगरच्या कार्यक्रमाचे निमित्तही तितकेच महत्त्वाचे होते. ज्या महात्मा गांधी विद्यालयात शरद पवार यांनी नववीचे शिक्षण घेतले, त्या विद्यालयाचा अमृतमहोत्सव साजरा होत होता. त्यामुळे पवार यांची उपस्थिती स्वाभाविक होती. कार्यक्रमाच्या पत्रिकेत जिल्ह्यातील अनेक आजी-माजी आमदार, खासदार आणि मान्यवरांचा समावेश होता. मात्र कार्यक्रमातील भाषणांपेक्षा कार्यक्रमस्थळी पोहोचण्यापूर्वी झालेल्या या अर्ध्या तासाच्या प्रवासानेच अधिक प्रसिद्धी मिळवली.

राजकारणातील काही प्रवास केवळ अंतर पार करण्यासाठी नसतात, तर ते संकेत देण्यासाठीही असतात. काही गाड्या प्रवाशांना गंतव्यस्थानी पोहोचवतात, तर काही गाड्या चर्चांना नवे गंतव्य देतात. बुधवारी प्रवरानगरकडे धावलेली गाडी दुसर्या प्रकारातील ठरली आहे. त्या गाडीतून राज्याच्या राजकारणाचा नवा आराखडा तयार झाला की केवळ जुन्या मित्रांच्या गप्पा रंगल्या, याचे उत्तर भविष्यात मिळेल, मात्र या प्रवासाने राजकीय वर्तुळात उत्सुकतेचा मीटर मात्र कमाल मर्यादेपर्यंत पोहोचवला आहे हे निश्चित.

सध्याच्या महाराष्ट्रात सत्ताधारी महायुती मजबूत दिसत असली तरी विरोधी पक्षांचे अस्तित्व संपलेले नाही. उलट वारंवार होणार्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे विरोधकांना नव्याने एकत्र येण्याची गरज अधिक तीव्र झाली आहे. अशावेळी महाविकास आघाडीच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांचा एकत्र प्रवास केवळ योगायोग म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. ‘त्या’ धावत्या गाडीत नेमकी कोणती राजकीय दिशा आखली गेली हे आज गूढ असले, तरीही महाराष्ट्राच्या राजकारणात रस्ता बदलण्याआधी संकेत मिळतात हे दाखवणारे आहे. त्यामुळे प्रवरानगरचा हा प्रवास संपला असला, तरी त्यातून सुरु झालेला राजकीय प्रवास पुढील काही महिन्यांत कोणते वळण घेतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहणार आहे.

