राज्यभरातील जनता मुख्यमंत्री शिंदेंसोबत ः देसाई अहमदनगरमध्ये मंत्री शंभूराज देसाईंचा माध्यमांशी संवाद


नायक वृत्तसेवा, नगर
नगरमध्ये बुधवारी (ता.21) मुख्यमंत्री शिंदे समर्थकांचा हिंदू गर्व गर्जना मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी मंत्री देसाई नगरला आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. अडीच वर्षांपूर्वीच आम्ही उद्धव ठाकरे यांना सर्वांना भेटण्यासाठी वेळ द्या म्हणून सांगत होतो. परंतु त्यावेळी त्यांनी ऐकले नाही. आता थेट गटप्रमुखांचे मेळावे घेतात याचा अर्थ आम्ही जसे जनतेत जात आहोत, त्याप्रमाणे ते वागू लागले आहेत. राज्यभरातील जनता मुख्यमंत्री शिंदेंसोबत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आमच्या कामास आशीर्वाद द्यावा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जसे सर्वांना बरोबर घेऊन जायचे त्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनीही आमच्या कामास आशीर्वाद द्यावा’, असे शंभूराज देसाई म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौर्‍यावरून होत असलेल्या टीकेवर देसाई यांनी प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री वारंवार दिल्लीला जात असेल तरी तेथे केंद्र सरकारकडून राज्याच्या विकासासाठी जास्त निधी आणण्याच्या प्रयत्नात आहेत. नीति आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्रासाठी 19 हजार कोटी रुपयांची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. पंतप्रधानांनीही महाराष्ट्रातील कोणताही प्रकल्प रखडू घेणार नाही व त्याला निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. मागील अडीच वर्षात मागचे मुख्यमंत्री दिल्ली तर सोडाच, पण मुंबईत असलेल्या मंत्रालयात जात नव्हते. त्याच्या आता आम्ही खोलात जाणार नाही. पण एकनाथ शिंदे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री असल्याने केंद्र सरकारचा त्यांना पाठिंबा आहे, असेही देसाई म्हणाले.

आत्तापर्यंतच्या शिवसेनेच्या दसरा मेळावा होण्यासाठी तयारीचा मेळावा घेण्याचा प्रकार पहिल्यांदाच होत आहे. मुंबईत आता पक्षप्रमुखांना गटप्रमुखांचे मेळावे घ्यावे लागतात, यातच सारे काही आले. आता यांना लोकांपर्यंत जावे लागत आहे. आधी पक्षातील मोठ्या मोठ्या लोकांना यांची भेट मिळत नव्हती. आता मातोश्रीचे दरवाजे 24 तास उघडे असल्याचे सांगतात. मेन दरवाजा-ड्रम दरवाजा असे आता काही राहिले नाही. परंतु हे करण्याचे आम्ही अडीच वर्षांपूर्वी सांगत होतो. आठवड्यातून एक दिवस आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख व कार्यकर्त्यांना देण्याचे सांगत होतो. पण ते तेव्हा केले नाही. आता त्यांनी ते सुरू केले आहे चांगले आहे, आम्ही कोणाशीही स्पर्धा करीत नाही, असे दसरा मेळाव्यासंबंधी देसाई म्हणाले.


राज्य उत्पादन शुल्क विभागातील रिक्त जागांसंबधी मंत्री देसाई यांनी माहिती दिली. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाकडे मनुष्यबळ कमी आहे. या विभागातील 30 ते 40 टक्के जागा रिक्त आहेत. याचा अहवाल आपण मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर पुढील आठवड्यात लेखी स्वरुपात मांडणार आहोत. उत्पादन शुल्क विभागातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल. पहिल्या टप्प्यात रिक्त पदातील 50 टक्के जागांची भरती प्रक्रिया होईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

Visits: 121 Today: 1 Total: 1110785

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *