मालपाणी परिवाराने भरले तिच्या पंखात बळ! नासात निवड झालेल्या विद्यार्थीनीला तीन लाखांची आर्थिक मदत..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील खांडगावच्या श्रद्धा भगवान गुंजाळ या विद्यार्थीनीने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर उच्च माध्यमिक परीक्षेत उत्तम गुणांच्या बळावर एमआयटी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. आपल्या आवडीचा ‘एरोस्पेस इंजिनिअरिंग’ हा विषय निवडून तिने आपल्यातील प्रगल्भताही सिद्ध केली. त्यातून विविध पारितोषिकांसह पुढील शिक्षणासाठी तिची नासामध्ये निवड झाली, मात्र घरची परिस्थिती अतिशय बेताची असल्याने उंच भरारी घेण्याच्या तिच्या स्वप्नांना खिळ बसली. याबाबत डॉ.संजय मालपाणी यांना माहिती मिळताच त्यांनी सदर विद्यार्थीनीसह तिच्या पालकांची भेट घेत तिच्या पंखात बळ भरले. आपल्या कन्येचे स्वप्नं मालपाणी परिवाराच्या मदतीने पूर्ण होत असल्याचे पाहतांना ते संपूर्ण शेतकरी कुटुंब श्रावणमासात आंनदाश्रृंनी चिंब झाले होते.
संगमनेर शहरापासून अवघ्या काही अंतरावर खांडेश्वराच्या राऊळाभोवती वसलेल्या खांडगावात भगवान गुंजाळ हे अल्पभूधारक शेतकरी आपली पत्नी रोहिणी, मुलगी श्रद्धा व लहान मुलगा साई यांच्यासह राहतात. त्यांची मुलगी श्रद्धा ही लहानपणापासून अभ्यासात मोठी हुशार असल्याने अशिक्षित असूनही तिच्या आई-वडीलांनी सतत तिला प्रोत्साहन दिलं. त्या बळावर तिने उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत 75 टक्के गुण मिळवताना जेईईच्या स्पर्धा परीक्षेत 93 गुण पटकावित पुण्याच्या नामांकित एमआयटी कॉलेजमध्ये शिष्यवृत्तीवर प्रवेश मिळवला. आपल्या आवडीच्या ‘एरोस्पेस इंजिनिअरिंग’चे शिक्षण घेतांना तिने आपल्यातील गुणवत्ता पदोपदी सिद्ध करताना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, डॉॅक्टर अब्दुल कलाम वर्ल्ड रेकॉर्ड, रायझीग युथ सुपरस्टार ऑफ इंडिया यासारखे प्रतिष्ठेचे पुरस्कारही प्राप्त केले.
या सर्वांच्या जोरावर अमेरिका स्थित अलाबामा प्रांतात असलेल्या नासा संस्थेत पुढील शिक्षणासाठी तिची निवड झाली. नासामध्ये निवड होणे हा खुप मोठा बहुमान असल्याने श्रद्धाच्या आनंदाला पारावार राहीला नाही, मात्र त्याचवेळी तिला आपल्या घरच्या परिस्थितीचीही जाणीव झाली आणि ती हिरमुसली. आई-वडील अशिक्षित असल्याने त्यांना याविषयी फारशे काही समजले नाही, मात्र केवळ पैशांमुळे आपल्या हुशार मुलीला परदेशात शिक्षणाची संधी मिळूनही जाता येत नसल्याचे दुःख त्यांना सतावू लागले. अमेरिकेसारख्या ठिकाणी मुलीला पाठवायचे तर काही लाखांची रक्कम लागते हे ऐकूणच गुंजाळ कुटुंब हतबल झालं.
या दरम्यान श्रद्धाच्या हुशारीची आणि तिची नासामध्ये निवड झाल्याची माहिती शिक्षणतज्ज्ञ डॉ.संजय मालपाणी यांना समजली. त्यांनी श्रद्धाशी संपर्क साधून तिला तिच्या आई-वडील व भावासह आपल्या कार्यालयात बोलावले. सर्वांचे सन्मानाने आदरातीथ्य करीत त्यांनी श्रद्धाशी मनसोक्त गप्पा मारताना तिचे ध्येय जाणून घेतले. शिक्षणाविषयीची तिची ओढ पाहून डॉ. मालपाणी यांनी नासामध्ये जाण्यासाठी तिला आर्थिक मदत देण्याची तयारी दाखवली, त्यांचा हा निर्णय ऐकून श्रद्धाचे वडील भगवान आणि आई रोहिणी या दोघांनाही आनंदाश्रृंचा पाझर फुटला.
मालपाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेश मालपाणी, डॉ.संजय, मनीष, गिरीश व जय मालपाणी यांच्या उपस्थितीत विपरीत परिस्थितीतही उच्च शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या श्रद्धाचा आणि त्यासाठी तिला सतत प्रोत्साहन देणार्या तिच्या कुटुंबाचा विशेष सत्कार करुन तीन लाख रुपयांचा धनादेश तिच्या वडीलांकडे सुदूर्द करण्यात आला. मालपाणी परिवाराने दाखवलेल्या या दातृत्त्वाने अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील एका सामान्य विद्यार्थीनीला उंच भरारी घेण्यासाठी पंखांना बळ मिळाले. आपण दाखवलेला विश्वास सार्थ ठरवूनच परत येईल असा शब्द यावेळी श्रद्धाने सर्वांना दिला.