कोविडसह संगमनेरकरांच्या पाठीमागे आता अशुद्ध पाण्याचे संकट! शिवसेनेचे निवेदन; आजाराच्या तक्रारी वाढल्याने बाह्यरुग्ण विभागांमध्ये गर्दी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही दिवसांपासून संगमनेरकरांना मातीमिश्रीत पाण्याचा पुरवठा होत असल्याने संगमनेरकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे दशकभरापूर्वी सुमारे सव्वाकोटी रुपये खर्च करुन पालिकेने जलशुद्धीकरण प्रकल्पही उभारला, मात्र सध्या त्याचा कोणताही फायदा संगमनेरकरांना मिळत नसल्याने पोटाच्या विकाराने नागरिक त्रस्त झाले आहेत. एकीकडे दररोज वाढणार्‍या कोविड रुग्णसंख्येने संगमनेरकर आधीच धास्तावलेले असतांना आता त्यात अशुद्ध पाण्यातून आजारांची साखळी निर्माण होवून अनेकांना त्रास होवून लागल्याने पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाबाबत नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर संगमनेर शिवसेनेने पालिकेला निवेदन दिले असून दोन दिवसांत शुद्ध पाण्याचा पुरवठा न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.


गेल्या काही दिवसांपासून पालिकेकडून अतिशय गढूळ आणि दुषीत पाण्याचा पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे संगमनेरकरांचे आरोग्य कोविड आणि दुषीत पाणी अशा दुहेरी संकटात सापडले असून रुग्णालयांमध्ये गर्दी वाढत आहे. याबाबत पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधला असता महिन्याभरापूर्वी धरणाची खालावलेली पातळी आणि आता धरणात भात खाचरातील पाणी जमा होत असल्याने पाईपलाईनमधून गढूळ पाणी उपलब्ध होत असल्याचे उत्तर मिळाले. निळवंडे धरणातून मिळणारे पाणी थेट नागरिकांना पुरविण्यात येते का? या प्रश्‍नाच्या उत्तरातही गोलमाल असून पंपींग स्टेशनवरील विहिरींमध्ये पाणी साठवून त्यात केवळ जंतूनाशक पावडर मिसळली जात असल्याचेही समोर आले आहे.


सुमारे दशकभरापूर्वी जवळपास सव्वा कोटी रुपये खर्च करुन पालिकेने जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला होता. तसाच प्रकल्प निळवंडे धरणाच्या उद्भवापाशीही उभारण्याच्या घोषणा झाल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र शुद्धीकरण हा प्रकारच संगमनेरात अस्तित्वात नसल्यासारखे चित्र असून निळवंडे धरणात जसे पाणी जमा होते, तसेच ते संगमनेरकरांना मिळत असल्याने कोविडच्या रुग्णांसोबतच आता संगमनेरात पोटाच्या आजाराने त्रस्त झालेल्यांची संख्याही वाढत असून शहरातील सर्व डॉक्टरांचे बाह्यरुग्ण विभाग रुग्णांच्या गर्दीने व्यापले आहेत. शहराला होणारा पाणी पुरवठा अतिशय अशुद्ध असून त्यातून अबालवृद्धांना अतिसार, उलट्या व जुलाबासारख्या आजारांचा सामना करण्याची वेळ आली आहे. 160 वर्षांचा इतिहास लाभलेली नगरपालिका असूनही संगमनेरकरांना आजही अशुद्ध पाणी प्यावे लागत असल्याने मोठे आश्‍चर्यही व्यक्त होत आहे.


याबाबत संगमनेरच्या शिवसेनेने आज पालिकेला निवेदन देत पाणी पुरवठ्याची वस्तुस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठीही पालिकेच्या कार्यालयात कोणीही वरीष्ठ अधिकारी उपलब्ध नसल्याने कार्यालयीन प्रमुख राजेश गुंजाळ यांच्याकडे निवेदनाची प्रत सोपवून मोठ्या संख्येने पालिकेत दाखल झालेल्या शिवसैनिकांनी थेट पंपींग स्टेशनवर धडक देवून तेथील पाणी पुरवठ्याच्या विहिरींमध्ये निळवंड्याच्या पाईपमधून आलेले मातीमिश्रीत पाणी आणि बाह्य बाजूला बंद अवस्थेत असलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे चित्रण करुन ते सोशल माध्यमात टाकण्यात आले आहे. पालिकेला दिलेल्या निवेदनात शिवसेनेने संगमनेरकरांच्या भावना व्यक्त केल्या असून यावेळी शिवसेनेचे शहर कार्याध्यक्ष दीपक साळुंके यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


निळवंडे धरणाची पाणी पातळी खालावणे, नंतर भातखाचरातील पाणी निळवंडे धरणात जमा होणे या कारणांनी पाईपलाईनमधून होणारा पाणीपुरवठा गढूळ स्वरुपाचा असून पंपींग स्टेशन येथे त्यावर प्रक्रीया करुन त्याचे निर्जतुंकीकरण करण्यात येवून त्याचा पुरवठा संगमनेरकरांना केला जात आहे. पालिकेचा जलशुद्धीकरण प्रकल्पही सुरु असून लवकरात लवकर संगमनेरकरांना शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी आम्ही युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहोत. तोपर्यंत नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे असे आवाहन आहे.
जयश्री मोरे
अभियंता : पाणी पुरवठा

Visits: 6 Today: 2 Total: 27391

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *