संगमनेरात अंत्ययात्रेवर दगडफेक करण्याचा संतापजनक प्रकार! अमरधामजवळ शनिवारी झाली दगडफेक; पोलिसांनी दखल घेण्याची गरज..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या कित्येक वर्षांपासून हिंदू धर्मियातील मृतकांवर पुणे नाक्याजवळील प्रवरानदी पात्रालगत अंत्यसंस्कार केले जातात. चार दशकांपूर्वी त्याच ठिकाणी पालिकेने ‘अमरधाम’ बांधले होते, सध्या त्या वास्तुच्या सुशोभिकरणाचेही काम सुरु आहे. वर्षोनुवर्षे येथे अंत्यसंस्काराचे विधी पार पडत असतांना आता तेथील काही हुल्लडबाजांकडून त्यात विघ्न आणण्याचे कारस्थान रचले जातअसल्याचा संशय असून शनिवारी (ता.7) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास शहरातील एका मृतकाच्या अंत्ययात्रेवरच दगड फेकण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. यापूर्वी अशी कोणतीही घटना या परिसरात घडली नव्हती, त्यामुळे हा प्रकार नेमका कोणत्या हेतूने घडला असेल याबाबत नेमकी निश्‍चिती नसली तरीही काळ सोकावण्याच्या आंतच पोलिसांनी या प्रकाराची गांभिर्याने दखल घेवून त्याच्या मूळाशी जाण्याची गरज आहे. या धक्कादायक घटनेची चर्चा शहरात पसरली असून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.


याबाबत विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी (ता.7) संगमनेरातील एका महाविद्यालयाच्या निवृत्त कर्मचार्‍याचे निधन झाले होते. त्यांची अंत्ययात्रा त्याच दिवशी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास शहरातील त्यांच्या घरापासून निघून साडेपाच वाजण्याच्या दरम्यान पुणे नाक्याजवळील हिंदू स्मशानाजवळ पोहोचली. अंत्ययात्रेचा प्रवास अमरधामच्या प्रवेशद्वारापर्यंत झाल्यानंतर बाह्य बाजूस बांधण्यात आलेल्या चौथर्‍यावर पार्थिव ठेवून काही विधी केले जातात व त्यानंतर खांदे बदलण्याचाही संस्कार होतो. नेमक्या याचवेळी विरुद्ध बाजूने अंत्यविधीत जमलेल्यांवर किरकोळ प्रमाणात दगड फेकण्यात येवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला.


अनपेक्षितपणे घडलेला हा प्रकार पाहून उपस्थितातील काहींनी मोठ्याने ओरडा केल्याने दगडफेक थांबली. सुदैवाने त्यातून कोणालाही इजा झाली नाही. कोविड नियमांच्या अनुषंगाने या अंत्यविधीला मर्यादीत नातेवाईकांची उपस्थिती होती. मृत्यू झालेली व्यक्ति त्यातील बहुतेकांच्या नात्यातीलच होती त्यामूळेे अंत्ययात्रेतील सर्वचजण शोकाकूल असल्याने अंत्यविधीच्या वेळी दगडफेक करण्याचा संतापजनक प्रकार घडूनही त्यातील कोणीही कोठून व का दगडफेक केली जात आहे हे शोधण्याचा अथवा त्याबाबत तक्रार करण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र अचानक घडलेला हा प्रकार त्यातील सर्वांच्याच मनाला धक्का देवून गेल्याने शहरात त्याची चर्चा सुरु झाली आणि मोठ्या प्रमाणात पसरलीही. त्यातून हिंदू धर्मियांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप निर्माण झाला असून अंत्यविधीसारख्या दुखःद प्रसंगात असे प्रकार करणार्‍यांवर कठोर कारवाई होण्याची गरज व्यक्त होत आहे.


पूर्वीपासूनच संगमनेरातील हिंदू धर्मिय नागरिक समाजातील मृत पावलेल्या व्यक्तिवर पुणे नाक्याजवळील प्रवरा नदीपात्रालगत उघड्यावर दाहसंस्कार करीत असत. 1980 साली संगमनेर नगरपालिकेने या ठिकाणी ‘अमरधाम’ नावाची इमारत बांधून तेथे दाहसंस्कारासाठी चौथरा व पाण्यासाठी हौद बांधला. हिंदू शास्त्रानुसार वैकुंठाच्या प्रवासाला निघालेल्या व्यक्तिची घरापासून निघणारी अंत्ययात्रा स्मशानभूमीजवळ आल्यानंतर प्रवेशद्वारासमोर बांधलेल्या चौथर्‍यावर पार्थिवाला काही क्षणांचा विसावा दिला जातो. यावेळी प्रत्येक समाजातील धारणेनुसार काही विधीही केले जातात. तसाच संस्कार सुरु असतांना शनिवारी दगडफेकीचा प्रकार घडला.


2005 साली संगमनेरच्या अमरधामचे नूतनीकरण करण्यात आले होते. त्यावेळी अमरधामच्या अंतर्गत भागात मृतकावर प्रत्यक्ष दाहसंस्कार करण्यापूर्वी मृत्यू पावलेल्या व्यक्तिंची मुले अथवा दाहसंस्कार करणार्‍या व्यक्तिला आंघोळ करावी लागते. त्यासाठी पालिकेने पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र न्हानीगृह उभारले होते व त्यात शॉवर, नळाच्या आकर्षक तोट्याही बसविल्या होत्या. मात्र काही महिन्यातच यासर्व गोष्टी येथून चोरीस गेल्या. त्याचवेळी पालिकेने घडल्या प्रकाराची गांभिर्याने दखल घेतली असती तर शनिवारचा प्रकार कदाचित घडलाच नसता अशीही चर्चा समोर आली आहे. हिंदू धर्मियांसाठी अत्यंत पवित्र ठिकाण असलेल्या अमरधामच्या आवारातच नशाबाजी करणार्‍यांसह जुगारही खेळला जात असल्याचे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. सध्या त्याला पूर्णतः आळा बसलेला असतांना आता चक्क दगडफेकीसारखा धक्कादायक प्रकार घडल्याने शहरात संताप निर्माण झाला आहे. पोलिसांनी या घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून वेळीच अशा प्रकारांना पायबंद घालण्याची गरज आहे. अन्यथा काळ सोकावतोय असे म्हणण्याची वेळ संगमनेरकरांवर आल्याशिवाय राहणार नाही.


शनिवारी अंत्ययात्रेवर दगडफेक करण्याचा प्रकार काही हुल्लडबाजांची कृती असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. या दगडफेकीत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही, यावरुन दगडफेक करणार्‍यांचा हेतू फेक्त दहशत निर्माण करण्याचा असू शकतो. संगमनेरात सर्वच जातीधर्माची मंडळी गुण्यागोविंदाने राहत असतांना अंत्यविधीसारख्या प्रसंगात अशाप्रकारच्या कृत्याचे कोणीही समर्थन करणार नाही. मात्र असले प्रकार पुन्हा घडू नये व त्यातून शहराच्या सामाजिक सौहार्दाला धक्का लागू नये यासाठी पोलिसांनी स्वतःहून या घटनेची गांभिर्याने दखल घेवून या घटनेच्या मूळाशी जाण्याची गरज आहे.

Visits: 5 Today: 1 Total: 23100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *