शिवजयंती उत्सव युवक समितीकडून तीनशे लिटर रक्ताचे संकलन! रक्तदानाचा नवा विक्रम; शिवजयंतीच्या निमित्ताने दरवर्षी नाविन्यपूर्ण उप्रकमांचे आयोजन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 392 व्या जयंतीनिमित्ताने (तिथीनुसार) येथील शिवजयंती उत्सव युवक समितीने शुक्रवारी महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. संगमनेर शहर व ग्रामीण भागातील एकूण 13 केंद्रांवर आयोजिलेल्या या शिबिराच्या माध्यमातून विक्रमी 1 हजार 37 रक्तपिशव्यांचे (311.1 लिटर) संकलन करण्यात आले. गेल्या वर्षीही समितीच्या या उपक्रमातून 812 रक्तपिशव्या संकलित झाल्या होत्या. याशिवाय उत्सवाच्या मुख्य दिवशीही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शिवप्रेमींनी त्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव विधायक उपक्रमाने साजरा व्हावा यासाठी संगमनेर शहरात 11 वर्षांपूर्वी शिवजयंती उत्सव युवक समितीची स्थापना झाली होती. गेल्या अकरा वर्षांच्या कालावधीत समितीने संगमनेर शहर व ग्रामीणभागातील तरुणांना संघटीत करुन त्याद्वारे सामाजिक कार्याचे विचार पेरण्यास सुरुवात केली. अगदी सुरुवातीच्या काळात केवळ मोटार सायकल रॅलीपर्यंत मर्यादित असणार्‍या उपक्रमांना समितीने व्यापक स्वरुप देताना नंतरच्या काळात समाजाभिमुख कार्यक्रमांच्या माध्यमातून ताथीनुसारची शिवजयंती आणि उत्सव समिती असं समिकरणं घट्ट रुजवलं.

कोविडच्या कालावधीत नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी शासन व प्रशासनाला सामाजिक संस्थांच्या मदतीची गरज असताना उत्सव समिती तेथेही धावून गेली. या कालावधीत शहरातील गरीब व गरजू नागरीकांना किराणा किटचे वाटप, अन्नछत्र, निराधारांना आवश्यक असलेली मदत करुन समिती सदस्यांनी आपले सामाजिक दायित्व पूर्ण केले. या कालावधीत राज्यात रक्ताचाही तुटवडा निर्माण झाल्याने 2021 साली समितीने पहिल्यांदाच आपल्या उपक्रमात रक्तदान शिबिराचाही समावेश केला आणि पहिल्याच वर्षी तब्बल 812 रक्तपिशव्यांचे (243.6 लिटर) संकलन केले. याही वर्षी हा उपक्रम मोठ्या उत्साहात आणि व्यापक प्रमाणात राबविला गेला आणि संगमनेरच्या रक्तदान चळवळीत नवा विक्रमही नोंदविला गेला.

या उपक्रमासाठी शिवजयंती उत्सव युवक समितीने सोमेश्वर मंदिर, मार्कंडेय मंदिर (रंगारगल्ली), दत्त मंदिर (बसस्थानक), मेडिकव्हर रुग्णालय, इंदिरानगर, चंदनापुरी, करुले, तळेगाव दिघे, आश्वी, डिग्रस, पिंपळगाव कोंझिरा, घुलेवाडी व कासारा दुमाला अशा तेरा ठिकाणी रक्तदान शिबिराची केंद्रे उभारली होती. सकाळी आठ वाजता सुरु झालेला हा उपक्रम रात्री साडेनऊ वाजेपर्यंत सुरु होता. या शिबिरात शहरी व ग्रामीण भागातील शिवप्रेमींनी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. त्यातून तब्बल 311.1 लिटर म्हणजेच 1 हजार 37 रक्तपिशव्यांचे संकलन झाले. या उपक्रमासाठी अर्पण व आधार रक्तपेढीचे सहकार्य मिळाले.

उत्सवाच्या मुख्य दिवशीही समितीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सोमवारी (ता.21) सकाळी 8 वाजता शहरातील प्रमुख मार्गावरुन मोटार सायकल रॅली काढण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता शिवनेरीहून प्रज्ज्वलित करुन आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत करण्यात येणार आहे. सायंकाळी 6 वाजता लाल बहादूर शास्त्री चौकातून शिवसनेच्यावतीने शाही मिरवणूकही काढण्यात येणार आहे. समितीच्यावतीने शुक्रवारी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, पतित पावन संघटनेचे प्रांताध्यक्ष प्रा.एस.झेड.देशमुख, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, नगरसेवक किशोर पवार, दिलीप पुंड, नितीन अभंग, गजानन अभंग, पुरोहित संघाचे अध्यक्ष भाऊ जाखडी आदिंनी भेट देत या उपक्रमाचे कौतुक केले.


राज्यात दरवर्षी आठ ते नऊ लाख रक्तपिशव्यांची गरज भासते. मात्र अपेक्षित रक्त उपलब्ध होत नसल्याने दरवर्षी सुमारे 20 टक्के रुग्णांचा रक्ताअभावी मृत्यू होतो. देशात रक्तदनाबाबत आजही अनास्था व गैरसमज असून देशातील सरासरी रक्तदानाचेे प्रमाण अवघे 0.8 टक्के आहे. माणसाच्या शरीरात साधारण साडेचार ते पाच लिटर रक्त असते. रक्तदानावेळी त्यातील केवळ तीनशे मिलीलिटर रक्त काढले जाते. रक्तदानानंतर कमी झालेल्या रक्ताची पातळीही अवघ्या 36 तासांत पूर्ववत होवून दोन ते आठवड्यात रक्तपेशींची संख्याही पूर्ववत होते. दर तीन महिन्यांनी माणसाला रक्तदान करता येते.

Visits: 100 Today: 1 Total: 1098676

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *