कोविडने घेतला सप्टेंबर महिन्यातील पंधरावा बळी? संगमनेर शहरातील प्रथीतयश व्यापार्‍यासह गेल्या चार दिवसांत तिघांचा मृत्यु


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील कोविडचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचला असून दररोजच्या वाढत्या रुग्णसंख्येसोबतच एकामागून एक बळीही जात असल्याने तालुक्यात कोविडच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आजही संगमनेर शहरातील गांधी चौक परिसरात राहणार्‍या सत्तर वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. मात्र गेल्या बारा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याने त्यांचा मृत्यु कोविडमुळे झाला किंवा नाही याबाबत प्रशासकीय पातळीवरुन दुजोरा देण्यात आलेला नाही. सदर इसमाचा या महिन्यातील पंधरावा तर शहरातील तेरावा मृत्यु ठरणार आहे. त्यासोबतच गेल्या चार दिवसांत ग्रामीणभागातील दोघांचाही बळी गेला आहे. त्यामुळे अनधिकृत आकडेवारीनुसार तालुक्यातील मृतांचा आकडा चाळीसवर पोहोचला आहे.


गेल्या शुक्रवारी (ता.18) तालुक्यातील चंदनापूरी येथील रहिवासी असलेल्या 74 वर्षीय इसमाचा मृत्यु झाला होता. त्यांच्यावर अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. 17 सप्टेंबररोजी त्यांना तेथे दाखल करण्यात आले होते, मात्र अवघ्या 24 तासांतच कोविडने त्यांचा बळी घेतला. तर मनोलीतील 70 वर्षीय इसमावर 13 सप्टेंबरपासून संगमनेरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. सहा दिवस कोविडशी संघर्ष केल्यानंतर गेल्या शनिवारी (ता.19) त्यांना अखेर शरणांगती पत्करावी लागली.


आज सकाळी शहरातील गांधी चौक परिसरात राहणार्‍या 70 वर्षीय प्रतिथयश व्यापार्‍याचाही कोविडशी सुरु असलेला संघर्ष कमी पडला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. गेल्या 10 सप्टेंबररोजी त्यांचा स्त्राव चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. कोविडने त्यांच्या श्‍वसन यंत्रणेवर पूर्णतः ताबा घेतल्याने सुरुवातीपासूनच त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते, या दरम्यानच्या काळात त्यांनी उपचारांना साथ न दिल्याने त्या संघर्षातच तब्बल बारा दिवसांनंतर त्यांच्यावर काळाने झडप घातली. कोविड नियमावलीनुसार अहवाल प्राप्त झाल्याच्या दहा दिवसानंतर कोविडचा शरिरातील संसर्ग संपुष्टात आल्याचे गृहीत धरले जाते, त्यामुळे सदर व्यापार्‍याचा मृत्यु कोविडने झाला किंवा कसे याबाबत प्रशासनाने कोणताही दुजोरा दिलेला नाही.


या महिन्याच्या सुरुवातीपासूनच तालुक्यातील कोविडचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत कोविडने संगमनेर तालुक्यातील 170 गावांपैकी 134 गावांना पछाडले आहे. सोमवारच्या अहवालापर्यंत तालुक्यातील 2 हजार 710 जणांना कोविडचे संक्रमण झाले आहे. यातील 868 रुग्ण शहरातील तर 1 हजार 842 रुग्ण ग्रामीणभागातील आहेत. आजच्या स्थितीत तालुक्यातील केवळ 244 रुग्ण सक्रीय संक्रमित असून त्यांच्यावर शहरातील विविध कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. तर शासकीय नोंदीनुसार आत्तापर्यंत तालुक्यातील 34 जणांचा जीवही गेला आहे.


1 सप्टेंबररोजी माळीवाड्यातील 70 वर्षीय इसम, 2 स्पटेंबररोजी समनापूर येथील 62 वर्षीय इसम, 3 सप्टेंबररोजी मालदाड येथील 35 वर्षीय तरुण, 5 सप्टेंबररोजी चंदनापूरी येथील 39 वर्षीय तरुण, 6 सप्टेंबररोजी गिरीराजनगर येथील 59 वर्षीय इसम (हा मृत्यु बाह्य जिल्ह्यात गणला गेला आहे.), पंपींग स्टेशन येथील 73 वर्षीय महिला, चिखलीतील 76 वर्षीय महिला व घुलेवाडीतील 80 वर्षीय इसम, 11 सप्टेंबररोजी हिवरगाव पठार येथील 55 वर्षीय इसम, 14 सप्टेंबररोजी वेल्हाळे येथील 65 वर्षीय व मंगळापूर येथील 65 वर्षीय इसम, 15 सप्टेंबररोजी कौठे धांदरफळ येथील 55 वर्षीय इसम, 18 सप्टेंबररोजी चंदनापूरी येथील 74 वर्षीय इसम, 19 सप्टेंबररोजी मनोली येथील 70 वर्षीय इसम व आज गांधी चौक परिसरातील 70 वर्षीय इसमाच्या रुपाने या महिन्यातील पंधरावा कोविड बळी गेला आहे.

Visits: 10 Today: 1 Total: 118902

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *