संगमनेर महसुली उपविभागात तेवीस जणांना प्रवेश बंदी! पोलीस उपअधीक्षकांचे आदेश; सामाजिक शांतता भंग करणार्‍यांचा समावेश..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
लोकसभेच्या आचारसंहितेदरम्यान येणार्‍या सण-उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांनी सामाजिक शांततेला बाधा उत्पन्न करणार्‍यांविरोधात ठोस कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने संगमनेर महसुल उपविभागातील सहा पोलीस ठाण्यांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले होते. दाखल झालेल्या एकूण 46 प्रस्तावातील 23 जणांना बुधवारपासून पंधरा दिवस संगमनेर-अकोले तालुक्यात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. तर, उर्वरीत 23 जणांवरही लवकरच कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे संकेतही पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघात पुढील महिन्यात 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सध्या देशभरात आदर्श आचारसंहिता लागू असून पोलिसांकडून जागोजागी नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करण्यासह गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असलेल्यांची धरपकड सुरु करण्यात आली आहे. त्यातच या कालावधीत रमजान ईद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, श्रीराम नवमी व हनुमान जयंतीसारखे सणही येत असल्याने उपविभागातील सामाजिक शांततेला बाधा निर्माण होवू नये यासाठी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी उपविभागातील संगमनेर शहर, तालुका, घारगाव व आश्‍वी पोलीस ठाण्यांसह अकोले व राजूर पोलिसांना सामाजिक शांतता भंग करण्याच्या प्रकरणात सहभागी असलेल्या व त्यांच्याकडून शांततेचे उल्लंघन होण्याचा संशय असलेल्या गुन्हेगारांचे प्रवेश मनाईच्या कारवाईसाठी प्रस्ताव मागवले होते.


त्यानुसार या सर्व पोलीस ठाण्यांनी आपापल्या हद्दितील गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेले आरोपी व सामाजिक शांतता धोक्यात आणल्याप्रकरणी कारवाई झालेल्या एकूण 46 जणांचे प्रस्ताव सादर केले होते. त्यावर निर्णय घेताना पोलीस उपअधीक्षक वाघचौरे यांनी त्यातील निम्म्या जणांवर कारवाईचे आदेश दिले असून संगमनेर तालुक्यातील 17 जणांसह अकोले तालुक्यातील 6 जणांना 24 एप्रिलपर्यंत संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश करण्यास मनाई केली आहे. सीआरपीच्या कलम 144 अंतर्गत त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारांचा त्यासाठी वापर करण्यात आला असून उर्वरीत 23 जणांवरही लवकरच कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 (3) प्रमाणे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी बुधवारपासून (ता.23) संगमनेर व अकोले तालुक्याच्या हद्दितील संदीप उर्फ जब्या संजय वाल्हेकर (वेल्हाळेरोड), इस्माईल निसार पठाण व हुजेब शब्बीर शेख (दोघेही नाईकवाडपूरा), अरबाज करीम शेख (रहेमतनगर), नईम कादर शेख (उन्नतनगर), शुभम हिरामण शिंदे (शिवाजीनगर), कासिम असद कुरेशी (भारतनगर), धिरज राजेंद्र पावडे (इंदिरानगर), इम्रान उस्मान पठाण (अकोले नाका), मनोज शिवाजी काकड, मयूर राघु दिघे, प्रसाद दिलीप काकड, कृष्णा विलास सांगळे (चौघेही जोर्वे), दत्तात्रय संपत थोरात, सत्यम भाऊसाहेब थोरात (दोघेही वडगाव पान), अब्दूल गफार पठाण (बोटा) व मोईन हनिफ कुरेशी (माळवदवाडी),

अशा संगमनेर तालुक्यातील सतराजणांसह अकोले तालुक्यातील सुहास भाऊसाहेब पुंडे, खंडू दादाभाऊ करवर (दोघेही ढोकरी), विशाल लक्ष्मण डगळे, लक्ष्मण ज्ञानदेव डगळे (दोघेही खिरविरे), अण्णासाहेब सुधाकर वाकचौरे (कळस बु.), दौलत साहेबराव महाले (बेलापूर) या सहाजणांवर प्रवेश मनाईची कारवाई करण्यात आली असून या सर्वांना हनुमान जयंतीचा उत्सव पार पडेपर्यंत संगमनेर तालुक्यातील चार आणि अकोले तालुक्यातील दोनही पोलीस ठाण्यांच्या हद्दित येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. बुधवारीच त्यांच्यावर आदेशाची अंमल बजावणी करण्यात आली असून यासर्व 23 जणांना दोन्ही तालुक्याच्या हद्दिबाहेर सोडण्यात आले आहे. प्रलंबित असलेल्या 23 प्रस्तावांवरही लवकरच कारवाई होणार असल्याचेही पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले आहे.  या कारवाईने यादीवरील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *