संगमनेर शहराच्या एकाच भागातील नागरिक कायदा पाळतात? पथक जाताच ‘लजीज’ पुन्हा जोमात सुरु; कायदा प्रिय नागरिकांची दुकाने मात्र अद्यापही ‘सील’च..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सुसंस्कृतपणाचा बडेजाव मिरवणार्‍या संगमनेरातील विशिष्ट प्रवृत्तींच्या प्रकरणातील वाढत्या राजकीय हस्तक्षेपाने असमानतेची दरी निर्माण झाली असून त्याचे ठळक चित्र सोमवारी रात्री समोर आले आहे. बंदोबस्तावरील पोलिसांना पळवून पळवून मारल्याच्या प्रकरणात याच हस्तक्षेपाने पोलिसांना तपास सोडून द्यावा लागल्याची घटना ताजी असतांनाच आता कोविड नियमांची पायमल्ली केल्याने नायब तहसीलदारांनी ‘सील’ ठोकल्यानंतरही अवघ्या अर्धा तासातच पुन्हा त्याच जागी आणि तितक्याच गर्दीत ‘लजीज’ची ग्राहक सेवा सुरु झाली आहे. त्याचवेळी शहरातील दुसर्‍या भागात ‘सील’ झालेली अन्य दोन दुकाने मात्र कायदा आणि अधिकार्‍यांचा सन्मान करीत ‘सीलबंद’च असल्याचे विरोधाभासी चित्र आज संगमनेरात दिसून आले. यावरुन शहराच्या एकाच भागातील नागरिक कायदा पाळत असून दुसर्‍या भागाला कोणताही कायदा अथवा नियम लागू होत नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. या प्रकाराने संगमनेरातील व्यापारी वर्गात संताप निर्माण झाला असून अधिकार्‍यांनी कारवाई करताना एकतर समानता बाळगावी अथवा कारवाईच करु नये असा मतप्रवाह समोर येवू लागला आहे.

सोमवारी सायंकाळच्या सुमारास नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांनी आपल्या पथकासह कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नवीन नगर रस्त्यावरील एका स्टील भांड्याच्या दुकानासह केवळ पार्सल घेण्यासाठी दुकानाच्या आत जाण्याची मुभा दिल्याच्या कारणावरुन एका मिठाईच्या दुकानाला ‘सील’ ठोकण्याची कारवाई केली. या कारवाईच्या वेळीच कडनोर यांना तीनबत्ती चौकाकडून सय्यदबाबा चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावरील ‘लजीज चिकन सेंटर’ या दुकानात तोबा गर्दी असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी नायब तहसीलदार आपल्या पथकासह ‘लजीज’वर आले असता समोरील गर्दी पाहून त्यांचेही डोळे फाटले. त्यामुळे या हॉटेलवरही त्यांनी रात्री आठच्या सुमारास ‘सील’ ठोकण्याची कारवाई केली. रात्री साडेआठच्या सुमारास कारवाई करुन सदरच्या पथकाची पाठ फिरताच लजीजच्या चालकाने कायद्याची ऐशीतैशी करीत पुन्हा आपला व्यवसाय अगदी जोमाने सुरु करुन पुन्हा तितकीच गर्दी गोळा केली. हेच चित्र आज सकाळपासूनही स्पष्टपणे दिसत आहे. मात्र त्याचवेळी कारवाई झालेली शहरातील संवेदनशील व्यापार्‍यांची ‘ती’ दोन दुकाने मात्र कायदा आणि अधिकार्‍यांचा सन्मान करीत अजूनही सीलबंदच आहेत.

रमजानच्या महिन्यात गर्दी हटवण्याचे काम करणार्‍या नगरच्या पोलिसांवर हल्ला करण्याचा धक्कादायक प्रकारही याच परिसरात घडला होता. त्यावेळी सुरुवातीच्या मूगगिळी भूमिकेनंतर शहर पोलिसांनी विविध व्हिडिओ व सीसीटीव्ही फुटेज मिळवित जवळपास 35 पेक्षा अधिक आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचे सत्र अवलंबले होते. या दरम्यान या परिसरातील राजकीय धुरिणांनी पोलीस ‘निष्पाप’ तरुणांना गुन्ह्यात अडकवीत असल्याची आवई उठविली, मात्र त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. त्यामुळे त्यांनी नंतर निवेदन देवून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यातूनही काही साध्य होत नाही असे दिसताच प्रत्येकवेळी एका विशिष्ट समूहाची दुष्कृत्ये पाठिशी घालण्यासाठी धावाधाव करणार्‍यांनी ‘ब्रह्मास्त्र’ वापरले आणि ‘त्या’ दबावापुढे पोलिसांना तपास गुंडाळण्याची वेळ आली. त्यातून शहरात कायद्याची अंमलबजावणी करण्यातली असमानता निर्माण होवून एका भागातील नागरिकांच्या मनातील कायद्याचा आणि नियमांचा ‘धाक’ संपण्यात झाली. अर्थात हे उदाहरण केवळ वाणगी दाखलच आहे, अशी कितीतरी उदाहरणे दररोज समोर येत असतात हा भाग वेगळा.

या घटनेनंतरही आहे त्या परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे शहरात तिसर्‍या श्रेणीतील नियमांची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर सोमवार ते शुक्रवार एकाच भागातील दुकाने नियमाप्रमाणे सुरु आणि बंद होवू लागली. दुसर्‍या भागातील विरोधाभासी चित्र पाहून काहींनी ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा थोडा अधिक वेळ दुकाने सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला तर लागलीच पालिका अथवा पोलिसांकडून त्यांच्यावर कारवार्ई झाली. त्यातून एकाच शहरातील दोन भागात कायदे आणि नियमांची वेगवेगळी अंमलबजावणी होत असल्याचा विषय ऐरणीवर आला आणि त्यात संतापाची भर पडली. ती खद्खद् वाढत असतानाच सोमवारी (ता.02) नायब तहसीलदारांनी बसस्थानक परिसरातील ‘कायदाप्रिय’ व्यापार्‍यांवर नियम उल्लंघनाचा ठपका ठेवून त्यांच्या आस्थापना ‘सील’ केल्या. यावेळी समानतेचे सूत्र वापरण्यासाठी त्यांनी तीनबत्ती ते सय्यदबाबा चौकादरम्यानच्या ‘लजीज चिकन सेंटर’ या दुकानावरही छापा घातला आणि तेथील तौबा गर्दी पाहून ते हॉटेलही ‘सील’ करण्याची कारवाई केली, मात्र ती अर्धा तासापेक्षा अधिक वेळ टिकू शकली नाही.

रात्री साडेआठच्या सुमारास नायब तहसीलदार कडनोर यांच्या पथकाने कारवाई आटोपून सय्यदबाबा चौकातून पाय काढताच कायदा आणि नियमांच्या ‘आईचा घो’ म्हणत लजीजच्या चालकाने सील केलेल्या शटरच्या बाजूने ग्राहकांना दुकानात प्रवेश देवून व्यवसाय सुरु केल्याने त्याच ठिकाणी पुन्हा तेवढीच गर्दी उसळली. आज (ता.03) सकाळीही सदरचे हॉटेल अगदी कोणालाही न जुमानता ‘बिनधास्त’ सुरु करण्यात आले असून वृत्तलिहेपर्यंत ते सुरुच होते. यावरुन कोविड नियमांचे पालन करण्याची जबाबदारी संगमनेरातील केवळ एकाच भागातील सहनशील नागरिकांची असून दुसर्‍या भागातील नागरिकांना कोणतेही कायदे अथवा नियम लागू होत नसल्याचे धक्कादायक चित्र अगदी ठळकपणे समोर आले आहे. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी शहरातील सामाजिक स्वास्थ बिघडवणार्‍या अशा घटना पाठिशी घालण्याचा प्रकार आता संगमनेरकरांच्या मानगुटीवरच बसू पाहत असून प्रशासनाने या घटनेतून निर्माण होणारा सामाजिक असमतोल वेळीच ओळखण्याची गरज आहे, अन्यथा प्रागैतिहासापासून आपली ओळख सांगणार्‍या संगमनेर शहराचे कधीही भरुन न येणारे नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही अशी भिती आता सामान्य संगमनेरकर व्यक्त करु लागला आहे.


कोविडच्या गेल्या काही काळात पालिका व पोलीस प्रशासनाकडून संगमनेरातील एकाच भागातील व्यापारी व दुचाकीस्वारांवर कारवाईचा बडगा उगारला जात असल्याने संगमनेरात सामाजिक असमतोल निर्माण होवू लागला आहे. त्यातच सोमवारी तीन दुकानांना सील ठोकण्याची कारवाई झाल्यानंतर एका भागातील दुकान पुन्हा बेकायदेशीपणे तितक्याच गर्दीत सुरु करण्यात आले, तर दुसर्‍या भागातील दोन्ही दुकाने मात्र अनूजही ‘सीलबंद’च असल्याने संगमनेरातील असमानतेचे विरोधाभासी चित्र उभे राहिले आहे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी शहरातील सौहार्दाचा बळी देण्याच्या या प्रकाराने आता संताप निर्माण होवू लागला आहे.

Visits: 50 Today: 1 Total: 436393

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *