संगमनेरातील रुग्णांना दिलासा देण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात ‘ऑडिटर’ची नेमणूक! इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदारांचे आदेश; कर्तव्यात कसूर केल्यास होणार कठोर कारवाई..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील जवळपास सर्व रुग्णालये कोविड बाधितांनी तुडूंब भरली आहेत. त्यातच रुग्णगती वाढती असल्याने रोज नव्या बाधितांची भरही पडत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळही वाढली आहे, काही गंभिर रुग्णांना तर ऑक्सिजनची खाट मिळवण्यासाठी मोठी धडपड करावी लागत असल्याचेही चित्र दिसत आहे. अशा स्थितीत रुग्णांची अथवा त्याच्या नातेवाईकांची आर्थिक फसवणूक होण्याची अथवा रुग्णालयांकडून अवास्तव बिलांची वसुली होण्याची शक्यता गृहीत धरुन संगमनेरचे इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम यांनी दोन नियंत्रक, दोन पर्यवेक्षक आणि 26 कर्मचार्यांचा समावेश असलेल्या ‘भरारी पथका’ची नेमणूक केली असून त्यांच्यावर कोविड उपचार करणार्या तालुक्यातील 35 रुग्णालयांची जबाबदारी देण्यात आली आहे. सोपविलेल्या कर्तव्यात कसूर केल्यास साथरोग प्रतिबंधक कायद्यातील तरतूदीन्वये कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला आहे. या निर्णयाने रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सध्या राज्यासह कोविडने संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातही अक्षरशः उच्छाद मांडला आहे. रोज उच्चांकी रुग्णसंख्या समोर येत असल्याने उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांमध्येही मोठी वाढ होत आहे. अशा स्थितीत गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांना अतिदक्षता, ऑक्सिजन अथवा व्हेंटीलेटरची आवश्यकता असल्यास अशा सुविधा असलेल्या खाटाच उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मोठी धावपळ करावी लागते. अनेक प्रयत्नांनंतर कोणत्यातरी एखाद्या रुग्णालयात ती उपलब्ध होते, मात्र रुग्णाला दाखल करतांना काही रुग्णालये ‘त्या’ रुग्णावर उपकार केल्याप्रमाणे त्याची परतफेड म्हणून शासनाने ठरवून दिलेल्या उपचारांच्या बिलापेक्षा अधिक वसुली करीत असल्याचेही काही दाखले समोर आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर रुग्णांना दिलासा मिळणं अत्यंत आवश्यक होते.
या सर्व गोष्टींचा विचार करुन संगमनेरचे इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम यांनी त्यांना प्राप्त असलेल्या साथरोग प्रतिबंधक व आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये अधिकारांचा वापर करुन संगमनेर तालुक्यातील कोविडवर उपचार करणार्या 35 रुग्णालयांसाठी भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकांकडून रुग्णाला उपचारानंतर घरी सोडण्यापूर्वी त्याच्याकडून आकारण्यात आलेल्या बिलाचे ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय ज्या रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना कार्यान्वित आहेत अशा ठिकाणी या योजनेनुसार गरजू रुग्णांवर उपचार होत आहेत की नाही याची तपासणीही अचानक छापा घालून करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शासनाने कोविड उपचार देणार्या रुग्णालयांसाठी सामान्य, अतिदक्षता, ऑक्सिजन व व्हेंटीलेटर अशा सुविधांसह कोणत्या श्रेणीतील खाट रुग्णाला देण्यात आली आहे त्यानुसार कोणत्या सुविधेचे अधित्तम किती पैसे आकारावे याबाबत दर निश्चित केली आहे. त्यानुसार तालुक्यातील रुग्णालयांमध्ये कारवाई केली जाते का? रुग्णांना कॅशलेस सुविधा पुरविण्यात आली आहे का? शासकीय योजना कार्यान्वित असलेल्या रुग्णालयामध्ये गरजू रुग्णांना त्याचा लाभ मिळतोय का? या गोष्टींच्या तपासणीसह तालुक्यातील सर्व 35 कोविड रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांकडून अंतिम देयके (बिल) वसुल करण्यापूर्वी संबंधित पथकाकडून त्याचे ऑडिट होणे अनिवार्य करण्यात आले आहे. दर आठवड्याला याबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयासह इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार यांना देण्याचे बंधनही या पथकाला घालण्यात आले आहे.
यानुसार तयार करण्यात आलेल्या पहिल्या भरारी पथकाचे नियंत्रण अधिकारी म्हणून जबाबदारी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली असून लेखापाल प्रदीप वर्पे यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन्ही अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील सुनील खेमनर (9657142666) यांच्यावर ओम गगनगिरी रुग्णालय, मच्छिंद्र आव्हाड (9822520173) यांच्यावर साईसुमन हॉस्पिटल, राजेंद्र बिल्लाडे (9423161750) यांच्यावर इथापे हॉस्पिटल, धर्मेंद्र खंबैत (7350662876) यांच्यावर साई जनरल हॉस्पिटल, पिंपरणे व गायकवाड हॉस्पिटल, आश्वी बु., बी.टी.पुंड (9022944417) यांच्यावर सुयश हॉस्पिटल, एन.पी.गवारे (9326610109) यांच्यावर चैतन्य हॉस्पिटल, अनिल सौंदणकर (8237841273) मेडिकव्हर हॉस्पिटल (तांबे हॉस्पिटल), आर.यू.वाकचौरे (8421090988) यांच्यावर धन्वंतरी हॉस्पिटल,
बी.आर.गजे (9763184012) यांच्यावर पसायदान व सिद्धकला हॉस्पिटल, तृप्ती कराड (9922079516) यांच्यावर गुंजाळवाडीतील दत्तकृपा व माऊली हॉस्पिटल, ए.एस.शेख (9527238935) यांच्यावर साकूर येथील मातोश्री हॉस्पिटल व गुंजाळवाडी पठार येथील वृंदावन हॉस्पिटल, सुनील साळुंखे (9527525794) यांच्यावर सत्यम हॉस्पिटल व घुलेवाडीचे गुरुप्रसाद हॉस्पिटल, अरुण काकडे (820887488) यांच्यावर घारगाव येथील भंडारी हॉस्पिटल, संदीप मेखे (9421516924) व विलास देशमुख (7020187328) यांच्यावर संजीवनी हॉस्पिटल, धनंजय बोरकर (9960532219) यांच्यावर सिद्धी हॉस्पिटलची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यांच्याकडून समाधान न झाल्यास पर्यवेक्षक प्रदीप वर्पे (9421334589) यांच्याशी संपर्क साधता येवू शकेल.
दुसर्या भरारी पथकाची नियंत्रक अधिकारी म्हणून जबाबदारी संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर यांच्यावर सोपविण्यात आली असून उपकोषागार रुपेश भालेराव (7038559999) यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. या पथकात संजय आवारी (7798912855) यांच्यावर आरोटे हॉस्पिटल, सचिन लवलेकर (9881508780) यांच्यावर वाणी आणि शेळके हॉस्पिटल, विशाल परदेशी (9511737890) यांच्यावर साई आणि शेवाळे हॉस्पिटल, वाय.एन.कापसे (7756971386) यांच्यावर कुटे व सेवा हॉस्पिटल, डी.एन.चतुरे (9657626038) यांच्यावर कानवडे हॉस्पिटल, संतोष भोसले (9762646335) यांच्यावर मालपाणी हॉस्पिटल, क.च.कगुणे (9325151626) यांच्यावर रसाळ हॉस्पिटल, देशपांडे (8208874688) यांच्यावर यूनिटी हॉस्पिटल, पवन बहुरे (7218247453) यांच्यावर पाठक हॉस्पिटल,
राजेश शुक्ला (7088305286) यांच्यावर शिंदे हॉस्पिटल व ताम्हाणे हॉस्पिटल आणि रामदास गांगुर्डे (9822616221) यांच्यावर निघुते हॉस्पिटलची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या भरारी पथकांना वरील रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना मिळत असलेल्या सुविधा, सरकारी योजनांचे लाभ यासह नियमानुसार व ठरवून दिल्याप्रमाणे देयके दिली जात आहेत का याबाबतचे ऑडिट करुनच रुग्णांकडून देयके वसुल करण्यास सांगितले आहे. या निर्णयाने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून काही रुग्णालयांकडून सुरु असलेली लुट थांबवता येणे शक्य होणार आहे.
शासनाच्या नियमानुसार कोविडवरील उपचार सुरु असतांना रुग्णालयाने कोणतीही सुविधा पुरविली तरीही त्याचे देयक एक लाख रुपयांपेक्षा अधिक असता कामा नये. मात्र दुसर्या लाटेत रुग्णालयांसह पूर्वी स्थापन्यात आलेल्या भरारी पथकांना याचा विसर पडल्याने संगमनेरचे इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम यांनी त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करीत नव्याने ऑडिटर व भरारी पथकाची नेमणूक केली आहे. रुग्णांच्या नातेवाईकाने अवास्तव देयकं असल्याची शंका असल्यास वरीलप्रमाणे ज्या रुग्णालयासाठी अधिकार्याची नेमणूक केली गेली आहे त्यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.