एसटी कर्मचार्‍यांवरील कारवाईत दिवसेंदिवस वाढ पालकांसह विद्यार्थ्यांची एसटी कर्मचार्‍यांवर नाराजी

नायक वृत्तसेवा, नगर
एसटी कर्मचार्‍यांच्या संपास सुमारे साडेतीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. कर्मचार्‍यांच्या अनेक मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी कामावर हजर होणे गरजेचे होते. मात्र ते संपावर ठाम असल्याने एसटी प्रशासनाकडूनही कारवाई सुरु करण्यात आली आहे. हा कारवाईचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्या रास्त असल्या, तरी संपामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याने तेही संपाला वैतागले आहेत. राज्य सरकारनेही संप मिटविण्याची घाई करू नये, तसेच कर्मचार्‍यांनीही मागणी मान्य होईपर्यंत कामावर येऊ नये, आम्ही आमची सोय करू, असा उपरोधिक सल्ला ते देत आहेत.

मागील साडेतीन महिन्यांपासून एसटी कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे एसटीची सेवा बर्‍याच ठिकाणी ठप्प झाली आहे. आज अखेरपर्यंत एसटीचे 1174 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. सध्या जिल्ह्यात खासगी वाहतूक जोमाने सुरू आहे. विशेष म्हणजे काही बसस्थानकांत खासगी वाहने प्रवासी घेत आहेत. आजअखेर जिल्ह्यात एकूण 1174 कर्मचारी विविध आगारांमध्ये कामावर हजर झाले. यामध्ये प्रशासकीय 342, यांत्रिकी 364, चालक 189, वाहक 266, चालक तथा वाहक 13, असे कामगार कामावर हजर झाले आहेत.

कर्मचार्‍यांच्या मागण्या जरी योग्य असल्या, तरी प्रवाशांचेही हितही त्यांनी पाहणे गरजेचे आहे. या संपामुळे खासगी वाहतुकदारांकडून प्रवाशांची लूट होत आहे. त्यामुळे एसटीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे. एसटी प्रशासनाने आज अखेर जिल्ह्यातील एकूण 354 जणांवर बडतर्फची कारवाई केलेली असून, 306 जणांचे निलंबन करण्यात आले आहे. हा संप सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मात्र परिणाम होत आहे. बस नसल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर शाळा, महाविद्यालयांत जाता येत नाही. त्यामुळे पालकांतूनही एसटी कर्मचार्‍यांवर नाराजी व्यक्त केली जात आहे.

एकूण कर्मचारी ः 3475
गैरहजर कर्मचारी ः 1940
हजर झालेले कर्मचारी ः 1174
आठवडा सुट्टीवर असलेले ः 129
रजा व पगारी सुट्टीवरील ः 186
इतर आगारांत कामगिरीवर असलेले ः 29

Visits: 124 Today: 2 Total: 1595310

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *