संभाजीनगरनंतर आता अहमदनगरच्या नामांतरावरुनही खद्खद्! ईदच्या मिरवणुकीतील ‘क्लिप’ व्हायरल; अहिल्यानगर नव्हेतर फक्त अहमदनगर..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
मराठ्यांच्या पराक्रमाची आठवण म्हणून राज्य शासनाने औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जन्मभूमी असलेल्या अहमदनगरचे अहिल्यानगर नामकरण करण्याची घोषणा केली होती. मात्र शासनाच्या या दोन्ही निर्णयावरुन एका समुदायात खद्खद् असल्याचे वारंवार समोर येत असून त्यातून काहीजण दोन समाजात तेढही निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्या सोशल माध्यमात असाच एक व्हिडिओ धुमाकूळ घालीत असून मोहंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या जुलूसमध्ये ट्रॅक्टरवर उभे राहुन काहीजण ‘अहिल्यानगर नहीं सिर्फ अहमदनगर’ अशा आशयाचे बॅनर झळकावित असल्याचे दिसून येत आहे. त्यावरुन आजही काहीजण दोन समाजातील सौहार्द नष्ट करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत असून पोलिसांनी वेळीच त्याची दखल घेण्याची गरज आहे.
तत्कालीन महाविकास आघाडी सरकाकडून घोषणा झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली स्थापन झालेल्या महायुती सरकारने राज्यातील औरंगाबाद, उस्मानाबाद व अहमदनगर या तीन शहरांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला. त्यातील औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव असे करण्यात आले. त्याबाबत राज्यशासनाने अधिसूचनाही प्रसिद्ध केल्याने शासकीय दप्तरात या दोन्ही शहरांचे अधिकृत नामांतरण झाले आहे. मात्र त्यानंतरही काहीजणांना अजूनही शासनाचा हा निर्णय पचनी पडला नसल्याचे गेल्या आठवड्यात माजी खासदार इम्तियाज जलिल यांच्या नेतृत्त्वाखाली निघालेल्या तिरंगा रॅलीतून दिसून आले.
या रॅलीत सहभागी असलेल्यांमधील काही हुल्लडबाजांनी मुंबईपर्यंतच्या मार्गावर जागोजागी असलेल्या शासकीय दिशादर्शक फलकांवरील छ.संभाजीनगर या नावावर काळ्या रंगाचा फवारा मारुन ते पुसण्याचा खोडसाळपणा केला. यापूर्वी असेच प्रकार छ.संभाजीनगर शहराच्या काही भागात घडल्याचे व त्यावरुन दोन समुदायात तणाव निर्माण होण्याचेही प्रकार घडले होते. मात्र त्यातून काहीही साध्य झालेले नसताना ‘तिरंगा रॅली’च्या नावाने निघालेल्या टोळक्याने पुन्हा संभाजीनगर ते मुंबई महामार्गावरील अनेक ठिकाणच्या फलकांवर आपल्या मनातील आकसाचा रंग चोपडल्याने छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.
एकीकडे औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने झालेले अधिकृत नामांतर अद्यापही काहींच्या पचनी पडत नसताना आता राज्य सरकारने अहमदनगर शहराचे नामांतर करण्याबाबत केलेल्या घोषणेवरुनही काहींची पोटदुखी ठळकपणे समोर येवू लागली आहे. गणेश विसर्जनानंतर दोन दिवसांनी अहमदनगरमध्ये निघालेल्या मोहंमद पैगंबर जयंतीच्या जुलूसमध्ये याबाबत जळजळ व्यक्त करणारे फलकही झळकले असून त्यावर ‘अहिल्यानगर नहीं, सिर्फ अहमदनगर’ अशा प्रकारचा मजकूर लिहिण्यात आला होता. धक्कादायक म्हणजे ज्यावेळी औरंगाबाद शहराच्या नामांतराचा निर्णय झाला, त्यावेळी अहमदनगरमधील मुकूंदनगर परिसरातील काहींच्या मनात क्रूरकर्मा आणि परकीय आक्रमक असलेल्या औरंंगजेबा विषयी प्रेमाचा उमाळा फूटल्याचेही दिसून आले होते.
जिल्ह्यातील चौंडी म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जन्मभूमी आहे. त्यांच्या कर्तबगारीचा सन्मान म्हणून अहमनगरचे नामकरण त्यांच्या नावाने व्हावे ही मागणी मान्य करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्यावर्षी जिल्ह्याचे अहिल्यानगर असे नामकरण करण्याची घोषणा केली होती. याबाबत अद्यापही अधिसूचना प्रसिद्ध झालेली नाही. मात्र त्या उपरांतही काहींच्या मनातील पोटशूळ उठले असून मिळेल तेथे त्यांच्याकडून पोटातील आग ओठांवर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. असाच प्रकार अहमदनगरमधील पैगंबर जयंतीच्या दिनीही दिसून आला होता. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमात धुमाकूळ घालीत आहे.
इतिहासात डोकावले असता देवगिरीवर स्थापन झालेल्या बहामणी राज्यात निजाम-उल-मुल्क पदवी धारण करणारा मलिक अहमद हा मूळचा हिंदू असून परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील बहिरंमभट कुळकर्णी यांचा तो नातू होता. त्याच्या वडिलांनी, म्हणजे तिमाभटांनी मुस्लिम धर्म स्वीकारला होता. मलिक अहमदने बहामणी राज्यात आपल्या पराक्रमाच्या जोरावर सुभेदारपदापर्यंत मजल मारली होती. बहामणी राज्याचा दिवाण महंमद गवान याच्यामुळे एकीकडे राज्याचा विस्तार झाला तर, दुसरीकडे मात्र राजाची राज्य कारभारावरील पकड सैल होत गेली. त्यामुळे बहामणी राज्यातील प्रत्येक सुभेदाराने स्वतःचे स्वतंत्र राज्य घोषित केले.
त्यातील मलिक अहमदने जुन्नर राजधानीचे ठिकाण निवडून आपल्या स्वतंत्र निजामशाहीची स्थापना केली. तेव्हा बहामणी फौजांनी त्याच्यावर आक्रमण केले. अहमदनगर शहरालगतच्या भिंगारजवळील इमामघाटात दोन्ही फौजा एकमेकांना भिडल्या. मात्र मलिक अहमदच्या तलवारीपुढे बहामणी फौजा फारकाळ तग धरु शकल्या नाहीत आणि त्यांचा दारुण पराभव झाला. या भागाने आपल्याला विजय मिळवून दिला म्हणून मलिक अहमद निजामाने या परिसराचा विकास करुन 28 मे 1490 साली शहर स्थापन केले व त्याला आपले स्वतःचे म्हणजे अहमदनगर असे नाव दिले. तेव्हापासून हा परिसर अहमदनगर नावाने ओळखला जावू लागला. या घटनेच्या 534 वर्षांनंतर विद्यमान राज्य सरकारने परकिय आक्रमकांच्या पाऊलखुणा नष्ट करुन या शहराचे नामकरण ‘अहिल्यानगर’ असे करण्याची घोषणा केली. तेव्हापासून काहीजणांकडून शासनाच्या निर्णयाविरोधात आग लावण्याचे प्रयोग सुरु आहेत. पोलिसांनी वेळीच त्याची दखल घेवून संबंधितांना समज देण्याची गरज आहे.
अहमदनगर शहराची स्थापना 28 मे 1490 रोजी झाल्याचा इतिहास असला तरीही त्यापूर्वीही या भागातील मानवी वस्त्यांचा उल्लेख इस.पूर्व 240 पासून सुरु होतो. चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या कालखंडातही या परिसराचा उल्लेख आढळतो. उत्तर महाराष्ट्रातील सातवे मोठे शहर म्हणून ओळखल्या जाणार्या अहमदनगरमध्ये भारतीय लष्कराचे प्रमुख केंद्र असून रणगाडा निर्मितीचे ठिकाण म्हणूनही त्याची ओळख आहे. भारतात परकियांनी आक्रमणं करुन साम्राज्य विस्तार केल्यानंतर त्या ठिकाणांना अथवा तेथील वास्तूंना आपले स्वतःचे अथवा आपल्या परिवारातील लोकांची नावे दिली. त्यानुसार अहमदनगर हे मूळ शहर नसून प्रसंगानुसार त्याची रचना झाली आहे.