मालपाणी उद्योग समूह पतपेढी म्हणजे सांघिक कामगिरीचे उत्कृष्ट उदाहरण ः तिवारी संस्थेची चाळीसावी सर्वसाधारण सभा ‘ऑनलाईन’ पद्धतीने संपन्न

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सतत 40 वर्षे प्रगतीपथावर असलेली मालपाणी समूह सेवकांची सहकारी पतसंस्था म्हणजे सांघिक कामगिरीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. निकोप आणि समृध्द सहकारी चळवळीतून होत असलेल्या सर्वांगीण प्रगतीचे प्रतिबिंब या संस्थेत पहायला मिळते. उद्योग समूहाचे अध्वर्यू ओंकारनाथजी मालपाणी यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या या संस्थेने गेल्या चाळीस वर्षांत उद्योग समूहातील कर्मचारी आणि कामगारांची आर्थिक गरज भागवण्याचे आणि त्यांच्या जीवनाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन मालपाणी उद्योग समूहाचे जनरल मॅनेजर ओंकार तिवारी यांनी केले.

शेठ दोमादर मालपाणी उद्योग समूह सेवकांच्या पतसंस्थेची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोना विषयक नियमांमुळे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना तिवारी यांनी वरील गौरवोद्गार काढले. उद्योग समूहातील कर्मचारी व कामगार यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी स्वर्गीय ओंकारनाथजी व माधवलालजी मालपाणी यांच्या प्रेरणेतून चार दशकांपूर्वी संस्थेची स्थापना झाली. गेल्या संपूर्ण कालावधीत संस्थेने राबविलेल्या विविध योजनांमुळे उद्योग समूहातील अनेक कामगारांना प्रगतीचा मार्ग गवसला. संस्थेच्या घोडदौडीत सभासदांची साथ अत्यंत महत्त्वाची ठरल्याचेही ते यावेळी म्हणाले. संस्थेचे आर्थिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी पारदर्शक आणि प्रामाणिक कारभार आवश्यक असतो. स्वर्गीय ओंकारनाथजींनी स्थापनेपासूनच संस्थेला आर्थिक शिस्तीचे धडे दिल्याने कर्मचारी व कामगारांसाठी स्थापन झालेल्या या संस्थेने मोठे आर्थिक यश मिळविल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. कोविडच्या काळात अडचणीत सापडलेल्या सभासदांसाठी भरीव काम केल्याबद्दल संस्थेचे चेअरमन विशाल वाजपेयी, व्हा.चेअरमन चंद्रकांत गोडसे, सचिव संजय वाकचौरे यांच्यासह संचालक मंडळाचे कौतुकही त्यांनी कले.

संस्थेचे चेअरमन विशाल वाजपेयी यांनी सभासदांच्या ऑनलाईन प्रश्नांना अभ्यासपूर्ण उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले. संस्थेच्या व सभासदांच्या हिताचे अनेक निर्णय टाळ्यांच्या गजरात एकमुखाने मंजूर करण्यात आले. मालपाणी उद्योग समूहाचे प्रमुख राजेश मालपाणी या सभेला ऑनलाईन उपस्थित होते. कोविडचे संकट असतानाही संस्थेने सभासदांना भरीव लाभांश वाटप केल्याच्या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले. मागील सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्ताचे वाचन तसेच अहवाल वाचन अनुक्रमे संजय वाकचौरे व प्रकाश शेराल यांनी केले. गणरायाच्या कृपेने लवकरच कोरोना महामारी संपुष्टात येईल व पुढील सर्वसाधारण सभा सर्वांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत होईल अशी अपेक्षा शिवाजी आहेर यांनी व्यक्त केली.

या सभेत मालपाणी समूहातील वरिष्ठ अधिकारी रमेश घोलप, शिवाजी आहेर, महिंद्र राठोड, उदय खैरनार, गणेश वीसपुते, रमेश सिनारे, बाळासाहेब हासे, रवींद्र कानडे, प्रकाश शेराल, राजेंद्र पटाट, नीलेश बाहेती, बाबासाहेब थेटे आदिंनी विविध प्रश्नांद्वारे अभ्यासपूर्ण विवेचन करीत सभासदांच्या शंकांचे निसरसन केले. मुरारी देशपांडे यांनी स्वागत व सूत्रसंचालन तर उषा मोहिते यांनी आभार मानले.
