ओळखीचा फायदा घेत विवाहितेवर अत्याचार! संगमनेरातील धक्कादायक घटना; व्यायामशाळेच्या प्रशिक्षकावर गुन्हा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
व्यायामशाळेत येणार्या विवाहित तरुणीला प्रेमपाशात अडकवून तिच्याशी वारंवार बळजबरीने शारीरिक संबंध ठेवणार्या व ती विवाहित असल्याचे माहिती असतानाही आळंदी येथे नेवून तिच्याशी नोंदणी विवाह आणि नंतर आई-वडिलांकडून लग्नासाठी दमदाटी, मारहाण व शिवीगाळ करण्याचा धक्कादायक प्रकार संगमनेरातून समोर आला आहे. या प्रकरणी शहरालगतच्या उपनगरात राहणार्या एका 25 वर्षीय विवाहितेने शहर पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरुन शुभम समाधान कोळी या व्यायामशाळा प्रशिक्षकासह त्याच्या आई-वडिलांवर नियंत्रणात ठेवून अत्याचार करण्यासह भारतीय न्यायसंहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाला असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. या घटनेने शहरात महिला व पुरुषांसाठी सुरु झालेल्या एकत्रित व्यायामशाळा आणि केशभूषेची ठिकाणं पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील एका उपनगरात राहणारी विवाहित तरुणी गेल्या पाच वर्षांपासून अकोले रस्त्यावरील ‘न्यूट्राफिट’ या आधुनिक व्यायामशाळेत व्यायामासाठी जात. या दरम्यान तेथे प्रशिक्षक म्हणून काम करणार्या शुभम समाधान कोळी (रा.जनतानगर) याच्याशी तिची ओळख झाली व त्यांच्यातील मैत्री बहरली. सुरुवातीला एकमेकांशी फोनवरुन संवाद सुरु झाल्यानंतर अधुनमधून भेटण्याच्या बहाण्याने रेस्टॉरंटमधील वावरही सुरु झाला. यासर्व घडामोडी घडवण्यामागे मनात हेतू बाळगून असलेल्या शुभमने प्रत्येक प्रसंगाला आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत केले.

बाहेर भेटण्यासह कधीमधी तो पीडितेच्या घरीही जावू लागला. या दरम्यान एप्रिल 2022 मध्ये त्याने पीडिता घरात एकटीच असल्याचे पाहून तिला बळजबरीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. नाहीतर तिच्या मुलीला ठार मारण्याची धमकी दिली. घडला प्रकार पीडितेने तिच्या नातेवाईकांना सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने तिला धमकावून शांत राहण्यास भाग पाडले. फेब्रुवारी 2023 मध्ये त्याने पीडितेला अचानक लग्न करण्याची मनशा सांगून तिला आळंदीला नेले व तेथील वैदीक नोंदणी कार्यालयात विवाह करुन प्रमाणपत्राची औपचारीकता पूर्ण केली. त्यानंतर त्याने विवाह झाल्याचा कांगावा करीत मुलीला जीवे ठार मारण्याची धमकीही भरली. या प्रकारानंतर त्याचा त्रास वाढत जावून नंतर तो दारुच्या नशेत पीडितेच्या घरी जावून शिवीगाळ व मारहाण करु लागला. पीडितेच्या वडिलांना मानसिक आजार असल्याने गेल्या पाच-सात महिन्यांपासून तिने गोड बोलून त्यांच्याशी अंतर राखण्याचा प्रयत्नही केला.

गेल्या मंगळवारी (ता.11) दुपारी दोनच्या सुमारास तो पीडितेच्या घरी आला व रडण्याचे नाटक करीत पुन्हा त्याने पीडितेशी शारीरिक संबंध निर्माण केले. त्यानंतर गुरुवारी (ता.13) आरोपीने फोन करुन तिला नवीन नगररोडवर बोलावले. त्यावेळी पीडित विवाहिता तेथे गेली असता आरोपीचे वडिल समाधान कोळी याने ‘तु तुझ्या मुलीला आणि नवर्याला सोडून दे, त्यांच्याशी कायदेशीर काडीमोड घे आणि माझ्या मुलाशी लग्न कर..’ असे म्हणत दमदाटी केली. त्यानंतर शनिवारी (ता.15) रात्री अकराच्या सुमारास पीडिता तिच्या घराच्या माडीवर असताना आरोपी शुभमने तिला शिवीगाळ व मारहाण करीत तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. यावेळी तेथे आलेल्या रंजना समाधान कोळी या आरोपीच्या आईनेही तिला शिवीगाळ केली.

पाच वर्षांपूर्वी व्यायामशाळेत झालेल्या ओळखीतून सुरु झालेल्या रोजच्या त्रासाला वैतागलेल्या 25 वर्षीय विवाहितेने अखेर सोमवारी (ता.17) शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी आरोपी शुभम समाधान कोळी, त्याचा बाप समाधान कोळी व आई रंजना समाधान कोळी अशा तिघांविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 64 (2)(जे)(एम), 109, 115, 351 (3), 352, 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाले असून पोलीस त्यांचा माग काढीत आहेत. या घटनेने शहरात फोफावलेल्या एकत्रित व्यायामशाळा व केशभूषेच्या ठिकाणांचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आणला आहे.

‘युनिसेक्स’ संस्कृती पुन्हा चर्चेत..
अलिकडच्या काळात सुसंस्कृत असलेल्या संगमनेरातही ‘युनिसेक्स’च्या गोंडस नावाखाली महिला व पुरुषांचा एकत्रित वावर असलेल्या व्यायामशाळा व केशभूषेची ठिकाणं हातपाय पसरीत आहेत. ही घटनाही अकोले रस्त्यावरील ‘न्यूट्राफिट’ या युनिसेक्स व्यायामशाळेत घडली असून महिलांच्या कक्षात त्यांना प्रशिक्षण देणार्या शुभम समाधान कोळी याने 25 वर्षीय विवाहित तरुणीला पाशात अडकवून तिचा शारीरिक उपभोग घेण्यासह तिच्या संसाराची माती केली आहे. ही घटना प्रत्येक संस्कृतीप्रिय व्यक्तिला चिंतन करायला लावणारी आहे.

