आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी निंजा किटचे वितरण

नायक वृत्तसेवा, संगमनेर
प्राथमिक शिक्षणाचा आनंददायी मार्ग म्हणजे निंजा किट होय. या किटचे वितरण रुरल यूथ डेव्हलपमेंट एज्युकेशन सोसायटीच्या संगमनेर कार्यालयात नुकतेच करण्यात आले.

यावेळी प्रसिद्ध औषधीशास्त्र तज्ज्ञ डॉ. अतुल आरोटे आणि बायफचे विभागीय प्रमुच जितीन साठे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच निवडक दहा दुर्गम आदिवासी शाळेतील शिक्षक प्रतिनिधी हजर होते. गेल्या दीड वर्षांपासून लॉकडाऊनमुळे शाळा सुरळीत सुरू नाहीत. अनेक दिवस शाळा बंद राहिल्याने विद्यार्थी शिक्षणापासून दुरावले आहेत. त्यामुळे शिक्षणापासून दुरावलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा करमणुकीतून आनंददायी शिक्षण मिळावे म्हणून निंजा किटची निर्मिती खास वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने करण्यात आलेली आहे. गणित, भाषा, विज्ञान हे विषय शिकण्यासाठी या किटच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना सोपे आणि सुलभ होणार आहे. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी अँड्रॉईड मोबाईल, नेटवर्क उपलब्ध नाही. त्यामुळे येथील विद्यार्थी प्राथमिक शिक्षणापासून वंचित झाले आहे. याच पार्श्वभूमीवर रुरल यूथ डेव्हलपमेंट एज्युकेशन सोसायटी संगमनेर संस्थेच्या मार्फत आनंददायी पद्धतीने शिक्षणाचा मार्ग निंजा किटच्या माध्यमाने खुला करण्यात आलेला आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष विवेक दातीर यांनी प्रात्यक्षिकासह इतर उपक्रमांबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी शिक्षक दीपक बोराडे, कैलास दातीर, लक्ष्मण पिंगळे, मधुकर बारामते, सुनील आंबरे, भास्कर सोनवणे, यादव डगळे, रामदास लांघी, मुरलीधर बारामते, रुपेश वाकचौरे उपस्थित होते.

Visits: 9 Today: 1 Total: 82836

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *