संगमनेर तालुक्याला आजही मिळाला मोठा दिलासा! प्रलंबित अहवालांमुळे जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत मात्र पुन्हा होतेय वाढ..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जून महिन्याच्या पहिल्या दिवसापासून उताराला लागलेली रुग्णसंख्या आता जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आशीर्वादाने काही प्रमाणात फुगू लागली असून जिल्हावासीयांचा जीव टांगणीला लागला आहे. आजही जिल्ह्यातील 621 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. गुरुवारी अहमदनगर महापालिका क्षेत्रात अवघे चार रुग्ण समोर आलेले असतांना जिल्हा माहिती कार्यालयाकडून माध्यमांना 149 बाधितांची संख्या कळविली गेली होती, त्यावरुन यंत्रणेकडून मृतांसह बाधिंताचेही आकडे दाबले गेल्याचे उघड झाले होते. तोच कित्ता आजही गिरविल्याचे प्राप्त अहवालातून दिसत आहे. मात्र त्याचवेळी संगमनेर तालुक्याला मोठा दिलासा मिळाला असून आज शहरातील सात जणांसह एकूण 28 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुका आता 22 हजार 573 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कमी होणार्या रुग्णसंख्येने जिल्ह्यातून कोविड संक्रमणाची दुसरी लाट ओसरल्याचे दिलासादायक चित्र दाखवण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्याचवेळी गेल्या 10 जूनपासून जिल्हा रुग्णालयाने एप्रिल व मे महिन्यातील प्रचंड संक्रमणात मृत्यू पावलेल्यांच्या प्रलंबित नोंदी करण्यास सुरुवात केल्याने सध्या दररोज समोर येणार्या रुग्णसंख्येच्या तुलनेत मृतांचा आकडा घाबरवणारा ठरत असतांना आता कोविड मुक्त दाखवण्याच्या शर्यतीत बाधितांचेही आकडे दाबून ठेवल्याचे समोर येत आहे. गुरुवारी अहमदनगर महापालिका क्षेत्रातून अवघ्या चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे महापालिका आयुक्त सांगत असतांना जिल्हा रुग्णालयाने मात्र या क्षेत्रातून 149 रुग्ण समोर आल्याचे जाहीर केले होते, यावरुन ही गोष्ट सिद्ध होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येसह मृतांची संख्याही दडविली गेल्याच्या आरोपांना बळ मिळाले आहे.
एकीकडे सर्वाधिक संक्रमित असलेल्या तालुक्यातील आकडेवारी अचानक कमी झाल्याचे समोर आणल्यानंतर आता त्याच तालुक्यातील रुग्णांची संख्या अचानक वाढत असल्याचेही दिसत आहे. मात्र या सावळ्या गोंधळातही आज संगमनेरकरांना मोठा दिलासा मिळाला असून गेल्या दोन दिवसांत वधारलेली रुग्णसंख्या आज पुन्हा तिशीच्या आंत आली आहे. आज शासकीय प्रयोगशाळेचे दोन, खासगी प्रयोगशाळा व रॅपीड अँटीजेनच्या प्रत्येकी 13 अहवालातून संगमनेर तालुक्यातील 28 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शहरातील सात जणांसह अहमदनगर येथील दोघांचा समावेश आहे. त्यात शहरातील गणेश नगर येथील 40 वर्षीय महिला, शिवाजी नगरमधील 24 वर्षीय महिला व संगमनेर असा पत्ता असलेल्या 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 52 वर्षीय इसम, 27 वर्षीय तरुण आणि 55 व 46 वर्षीय महिलांचा समावेश आहे.
तालुक्याच्या ग्रामीणभागातील संक्रमणात आज घट झाल्याचे दिसून आले असून आजच्या अहवालातून तालुक्यातील दहा गावे व वाड्या-वस्त्यातून अवघे 19 रुग्ण समोर आले आहेत. त्यात ओझर खुर्द येथील 6 वर्षीय मुलगा, धांदरफळ बु. येथील 52 वर्षीय इसम, घुलेवाडीतील 30 वर्षीय महिलेसह 22 वर्षीय तरुणी, वेल्हाळे येथील 42 वर्षीय महिला, वडगाव लांडगा येथील 87 वर्षीय वयोवृद्ध नागरिक, साकूर येथील 28 वर्षीय तरुण, 26 वर्षीय महिला, सहा वर्षीय मुलगा व पाच आणि चार वर्षीय बालिका, डिग्रस येथील 48 वर्षीय इसमासह 39 वर्षीय तरुण, मोधळवाडीतील 29 वर्षीय तरुण, 29 वर्षीय महिला व 5 आणि 3 वर्षीय बालिका, कालेवाडीतील 11 वर्षीय मुलगा व वाघापूर मधील 41 वर्षीय महिलेचा समावेश आहे. याशिवाय अहमदनगरमधील 60 व 29 वर्षीय महिलेचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
आज जिल्ह्यातील रुग्णसंख्याही सहाशेहून अधिकच राहीली. शासकीय प्रयोगशाळेचे 13, खासगी प्रयोगशाळेचे 194 व रॅपीड अँटीजेनच्या 414 निष्कर्षातून जिल्ह्यातील 621 जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले. त्यात सर्वाधीक 91 रुग्ण पारनेर, अहमदनगर महापालिका क्षेत्र 81, नगर ग्रामीण व पाथर्डी प्रत्येकी 55, राहाता 44, कोपरगाव व श्रीरामपूर प्रत्येकी 35, राहुरी व श्रीगोंदा प्रत्येकी 33, शेवगाव 31, नेवासा 29, संगमनेर 28, जामखेड 20, अकोले 18, इतर जिल्ह्यातील 16, कर्जत 14 व भिंगार लष्करी परिसरातील तिघांचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 2 लाख 75 हजार 179 झाली आहे. गुरुवारपर्यंत जिल्ह्यातील 5 हजार 338 रुग्णांचा बळी गेला आहे.