साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचा ‘सस्पेन्स’ कायम 5 जुलैला पुन्हा होणार सुनावणी; शर्यतीतील अनेकांची धाकधूक वाढली

नायक वृत्तसेवा, शिर्डी
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात साईबाबा विश्वस्त मंडळ नियुक्तीसाठी अजून दोन आठवड्यांची मुदतवाढ शासनाच्यावतीने मागितली असून दोन आठवड्यांनंतर अधिकृत विश्वस्त मंडळाची यादी सादर करणार असल्याचे शासनाच्या वकिलांनी सांगितले आहे. यामुळे सोशल मीडियावर तीनही पक्षांतील विश्वस्त पदासाठी निवड करण्यात आल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून करोडो साईभक्तांसाठी विश्वस्त पदाचा ‘सस्पेन्स’ कायम राहिला आहे. पुढील सुनावणी 5 जुलैला होणार असल्याची माहिती याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. अजिंक्य काळे यांनी दिली आहे.

साईबाबा विश्वस्त मंडळ नियुक्तीची दोन महिन्यांची मुदत मार्चमध्ये संपल्यानंतर मागील पंधरा दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने शासनास अजून दोन आठवडे मुदतवाढ दिली होती. त्याची सुनावणी 22 जून रोजी ठेवण्यात आली होती. मात्र उच्च न्यायालयात यादिवशी क्राईम बोर्ड असल्याने सुनावणीची तारीख काल बुधवारी (ता.23) ठेवली होती. यादरम्यान साई संस्थान अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त निवडीसाठी महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरू होती.

बुधवारी सायंकाळी उच्च न्यायालयात सरकारी पक्षाच्या वकिलांनी अजून दोन आठवड्यांची मुदतवाढ घेतल्याने विश्वस्त पदासाठीची चुरस वाढली असून दोन आठवड्यानंतर अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे शासनाच्यवतीने सांगण्यात आले आहे. यामुळे बुधवारपर्यंत शर्यतीत असणार्‍या अनेकांची धाकधूक वाढली आहे. त्यावर उच्च न्यायायालयाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. एम. जी. सेवलीकर यांनी सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीची नोंद घेत साईबाबा संस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळ नियुक्ती संदर्भात अधिसूचना जाहीर कारणासाठी राज्य शासनास 2 आठवड्यांची मुदतवाढ दिली. सदर प्रकरणात याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर व अ‍ॅड. अजिंक्य काळे यांनी काम पाहिले. तर शासनाच्यावतीने अ‍ॅड. डी. आर. काळे यांनी काम पाहिले. पुढील सुनावणी 5 जुलैला होणार आहे.

सोशल मीडियावरील यादी खरी?
साईसंस्थान अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार आशुतोष काळे यांची तर उपाध्यक्षपदी शिवसेनेने माजी आमदार रवींद्र मिर्लेकर यांची निवड केली. या निवडी नक्की समजल्या जात आहेत. सोशल मीडियात फिरणार्‍या विश्वस्त मंडळाच्या यादीबाबत मात्र संभ्रम कायम आहे.

Visits: 98 Today: 2 Total: 1120066

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *