काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा जय श्रीराम ‘आत्मीय’ की ‘राजकीय’? प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे शुभेच्छा फलक; ‘हायकमांड’चा निर्णय चुकल्याचे दिशादर्शक..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सोमवारी अयोध्येत पार पडलेल्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने देशभरातील वातावरण राममय झाले होते. प्रभू श्रीराम प्रत्येक हिंदू धर्मियाच्या आस्थेचा विषय असल्याने सोमवारचा दिवस सर्वत्र दिवाळीप्रमाणे साजरा झाला. देशातील सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र काँग्रेससह बहुतेक विरोधी पक्षांनी आस्थेच्या या सोहळ्याला राजकीय संबोधून उपस्थित राहण्यास नकार दिला. त्यामुळे देशभरातील काँग्रेसचे नेते या सोहळ्यापासून दूर राहतील असे वाटत असताना राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बसस्थानकासह अमृत उद्योग समूहाच्या सर्वच आस्थापनांवर लावलेले ‘प्राणप्रतिष्ठा सोहळ्या’चे शुभेच्छा फलक लक्ष्यवेधी ठरले. मात्र त्याचवेळी या सोहळ्यानिमित्त संपूर्ण शहर विद्युत रोषणाई आणि दीपोत्सवाने न्हाऊन निघाले असताना थोरात-तांबे यांच्या निवासस्थानांसह ‘त्या’ सर्व आस्थापना अंधारात दडलेल्या दिसून आल्या. त्यामुळे थोरातांनी फलकातून दिलेला जय श्रीरामचा नारा आत्मीय की राजकीय अशीही चर्चा संपूर्ण शहरात रंगली आहे.
अयोध्येतील प्रभू श्रीराम जन्मभूमीच्या जागेसाठी गेल्या पाचशे वर्षांपासून हिंदू धर्मियांचा सुरु असलेला संघर्ष सोमवारच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने पूर्ण झाला. देशात २२ जानेवारीचा दिवस दिवाळीप्रमाणे साजरा करावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध साधूसंतांनी केले होते. प्रभू श्रीराम हा प्रत्येक हिंदू धर्मियाच्या आस्थेचा विषय असल्याने सोमवारचा दिवस ऐतिहासिक ठरणार हे निश्चित होते. मात्र तो ओळखण्यात संभ्रमावस्थेतील विरोधकांची चूक झाली आणि भाजपने आखलेल्या राजकीय चक्रव्यूहात विरोधक अलगत अडकले. प्राणप्रतिष्ठेचा दिवस जसा समीप येत गेला, तशी विरोधकांची चूक अधिक गडद होवू लागली. त्यामुळे अनेक विरोधी पक्षांमध्ये अंतर्गत संभ्रम वाढून मतपेढी वाचवण्याची धडपडही सुरु झाली.
सुरुवातीला हा सोहळा म्हणजे अयोध्या, उत्तरप्रदेश आणि आसपासच्या राज्यांपर्यंतच मर्यादित राहील असाच विरोधकांचा कयास होता. मात्र तो फोल ठरला आणि केवळ भारतच नव्हेतर अमेरिका, इंग्लड, ऑस्ट्रेलिया, जपान, दुबई, रशिया यांसारख्या असंख्य देशातही तो मोठ्या भक्तिभावाने साजरा झाला. काँग्रेससारख्या सर्वात जुन्या राजकीय पक्षाच्या ‘हायकमांड’ला मात्र या सोहळ्याचे मर्म आणि त्याचा राजकीय परिणामच उमगला नाही. या निर्णयाशी जमिनीस्तरापर्यंतचे नेते सहमत आहेत का? याचाच विचार न झाल्याने हायकमांडचा निर्णय निमंत्रण नाकारणार्या पक्षातील अनेकांना अडचणीचाच ठरला. पक्षाच्या या निर्णयाने अल्पसंख्यांक मतपेढी राखता येणं शक्य असलं तरीही त्यातून बहुसंख्य समाज दुखावला जावून त्याचे विपरित राजकीय परिणामच अधिक होण्याची दाट शक्यता निवडणुका लढवणार्या नेत्यांना झाली.
त्यामुळे रविवारपासूनच समाज माध्यमात हायकमांडने निमंत्रण नाकारलेल्या पक्षातील नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छा संदेश देण्यास सुरुवात केली. पूर्वीपासून राजकीय ‘संशय’ असलेले नाशिक पदवीधरचे प्रतिनिधी, आमदार सत्यजीत तांबे यांच्या एका समर्थकाने तर राज्य सरकारने सोमवारी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी आपल्याच नेत्याच्या प्रयत्नाचे फळ असल्याचा संदेश फिरवला. सोमवार उजेडताच बसस्थानकापासून ते अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत ‘अमृत उद्योग’च्या आस्थापनांच्या बाह्यबाजूस ‘अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामचंद्रांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा. प्रभू श्रीरामांना वंदन आणि रामभक्तांचे अभिनंदन.!, आनंद सोहळा साजरा करुया, चला बंधुभाव जपूया!’ अशा आशयाच्या मजकुरासह खालील बाजूस लोकनेते बाळासाहेब थोरात मित्रमंडळाचे नाव टाकण्यात आलेले व माजी मंत्री थोरात यांच्यासह माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, विद्यमान आमदार सत्यजीत तांबे व थोरात यांच्या उत्तराधिकारी डॉ. जयश्री थोरात यांची छायाचित्रे असलेले असंख्य फलक प्रत्येकासाठी लक्ष्यवेधी ठरले.
दैनिक नायकच्या टीमने दुपारच्यावेळी या सर्व फलकांची छायाचित्रे घेतल्यानंतर थोरात-तांबे यांच्या नावाने फलकांवरुन दिला गेलेला ‘जय श्रीराम’चा नारा आत्मीय की राजकीय याचीही पडताळणी केली. श्रीराम जन्मभूमीचे आंदोलन भाजप आणि त्यांच्या संलग्न संस्था, संघटनांनी केल्याने या सोहळ्यावर त्याची छाप असणं स्वाभाविक आहे. परंतु म्हणून श्रीराम फक्त त्या पक्षाच्याच लोकांचा होवू शकत नाही. काँग्रेसचे प्रवक्ते आणि गाढे अभ्यासक आचार्य प्रमोद कृष्णम् यांनी सोहळ्यापूर्वीच पक्षाचा निर्णय दुर्दैवी असल्याचे सांगत चूक लक्षात आणून दिली होती. काँग्रेसचा निर्णय मोदी अथवा भाजप विरोधी नव्हेतर सनातन आणि श्रीराम विरोधी ठरेल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या या विधानाचाही काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर प्रभाव पडला.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात निरपेक्ष विचारांचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या शुभेच्छा अनेकांना अनपेक्षित होत्या. प्रत्यक्षात यावेळी त्यांनीही जनमताचा विचार करुन फलकांच्या माध्यमातून का असेना ‘जय श्रीराम’चा नारा दिला असावा. त्यांचे हे फलक येणार्या कालावधीतील राजकारणावर परिणाम करणारे ठरतात की राजकारणालाच आपल्याकडे खेचणारे याबाबत मात्र आता औत्सुक्य निर्माण झाले आहे. त्यातूनच माजी मंत्री थोरात यांचा जय श्रीरामचा नारा आत्मीय की राजकीय अशीही चर्चा सध्या शहरात रंगली आहे.
सोमवारी देशभरात दिवाळी साजरी झाली. सार्वजनिक कार्यक्रमांसह घरोघरी दीपोत्सव साजरा झाल्याने संपूर्ण देश राममय झाला होता. शासनाच्या आदेशाने शहरातील सर्व शासकीय कार्यालयांसह अनेक खासगी आस्थापना, संस्था, बँकां व नागरीकांनी आपल्या इमारतींवर विद्युत रोषणाई केली होती. घरोघरी दीपोत्सव साजरा होवून फटाक्यांची जोरदार आतिषबाजीही झाली. मात्र अमृत उद्योग समूहाच्या कोणत्याही इमारतीसह माजी मंत्री थोरात व माजी आमदार डॉ. तांबे यांच्या निवासस्थानांवर ना विद्युत रोषणाई दिसून आली, ना दीपोत्सवाचा दीप. त्यामुळे सोमवारी फलकातून त्यांनी दिलेला जय श्रीरामचा नारा ‘आत्मीय’ की ‘राजकीय’ याबाबत मात्र उत्सुकता निर्माण झाली आहे.