बँकेने लिलावासाठी ठेवलेले सोन्याचे दागिने निघाले बेन्टेक्सचे नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील धक्कादायक प्रकार उघडकीस

नायक वृत्तसेवा, शेवगाव
सोने तारण ठेवून नगर अर्बन बँकेकडून घेण्यात आलेल्या कर्जाची संबंधितांनी परतफेड केली नाही. त्यामुळे बँकने या सोन्याचा रितसर लिलाव ठेवला. लिलावापूर्वी तपासणीला सुरुवात होताच, पहिल्या पाच पिशव्यांत सोन्याऐवजी बेन्टेक्सचे दागिने असल्याचे आढळून आले. त्यामुळे लिलावासाठी आलेले सराफ व्यावसायिक निघून गेले. मात्र, यातून बँकेत कोट्यावधी रुपयांचा सोने तारण घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील हा प्रकार आहे.

दरम्यान, या बँकेच्या पुण्यातील आणि नगरमधीलल काही शाखांमधील बोगस कर्ज प्रकरणे यापूर्वीच उघड झाली असून काही प्रकरणांत गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. त्यात आता आणखी कोट्यवधी रुपयांच्या कर्ज प्रकरणाची भर पडली आहे. शेवगाव शाखेत सोने तारण ठेवून कर्ज घेतलेल्या कर्जदारांनी परतफेड केली नाही. त्यामुळे त्या सोन्याचा लिलाव ठेवण्यात आला होता. अशा 364 पिशव्या लिलावासाठी आणल्या होत्या. यावर संबंधित कर्जदारांनी कोट्यावधी रुपयांचे कर्ज घेतलेले आहे. लिलाव प्रक्रिया सुरू होताच पिशव्या उघडून सोन्याची तपासणी करण्यात आली. त्यातील पहिल्या पाच पिशव्यांमध्ये नकली सोन्याचे दागिने असल्याचे आढळून आले. त्यामुळे इतर दागिन्यांचीही अशी परिस्थिती असल्याचा संशय घेऊन लिलावात बोली लावण्यासाठी आलेले सराफ निघून गेले.

यातून बँकेतील आणखी मोठा गैरव्यवहार उघडकीस येणार आहे. बँकेकडून याचा पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकाराची माहिती मिळताच बँकेतील गैरव्यवहारांसंबंधी सातत्याने पाठपुरावा करणारे बँकेचे माजी संचालाक राजेंद्र गांधी, अनिल गट्टाणी, भैवनाथ वाकळे, पोपट लोढा तेथे दाखल झाले. त्यांनी यासंबंधी प्रशासकाला जाब विचारला. मात्र, प्रशासक महेंद्रकुमार रेखी हे समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. पूर्वी या बँकेवर माजी केंद्रीय मंत्री दिवंगत दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ होते. बँकेच्या गैरकारभारासंबंधी सातत्याने तक्रारी झाल्यानंतर चौकशीनंतर संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आणि प्रशासकाकडे कारभार सोपविण्यात आला. मात्र, जुनी प्रकरणे अद्यापही उघडकीस येत आहेत.

यासंबंधी राजेंद्र गांधी यांनी सांगितले की, ‘शेवगाव शाखा बनावट सोनेतारण प्रकरणी 2018 मध्येच गुन्हा दाखल होणे आवश्यक होते. मात्र, त्यासाठी एवढी वर्षे टाळाटाळ करण्यात आली आहे. हा विलंब बँकेला, सभासदांना व ठेवीदारांच्या हिताला घातक ठरला आहे. बँकेचे अधिकृत मूल्याकंन करणारे अभिजीत घुले यांनी बँकेवर प्रशासक आल्यानंतर बँकेला पत्र दिले की त्याच्या नावाने झालेले मूल्यांकन अहवाल त्यांनी दिलेले नाहीत व यात बँकेची फसवणूक झालेली आहे. अशी तब्बल 17 बोगस कर्जप्रकरणे आहेत.’

Visits: 12 Today: 1 Total: 114827

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *