एसटीने घडवली अठ्ठावीस हजार प्रवाशांना पंढरीची वारी! पंधरा दिवस सुरु होत्या फेर्या; एकोणतीस लाखांचे घसघशीत उत्पन्न..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
आषाढ महिना म्हटलं की ग्यानबा-तुकारामाचा गजर करीत लाखों वारकर्यांची पंढरपूर वारी डोळ्यासमोर उभी राहते. देहू, आळंदीसह राज्याच्या कानाकोपर्यातून पंढरीच्या दिशेने जाणार्या शेकडों दिंड्यांमुळे हा महिना पांडूरंगाच्या भक्तिरसाने अक्षरशः चिंब झालेला असतो. या कालावधीत पायी वारी करणार्यांसह महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करीत विठुरायाचे दर्शन घेणार्यांची संख्याही खूप मोठी असते. त्यासाठी महामंडळाकडून विशेष योजनाही राबविल्या जात असतात. यंदाही महामंडळाच्या संगमनेर आगाराने सवलतीस पात्र असलेल्यांसह सामान्य प्रवाशांसाठी 25 अतिरीक्त बसेसची व्यवस्था केली होती. त्याचा पुरेपूर लाभ घेत गेल्या पंधरवड्यात संगमनेर तालुक्यातील तब्बल 28 हजारांहून अधिक भाविकांनी सुरक्षित प्रवास करीत विठुरायाचे दर्शन घेतले. या कालावधीत विठुमाऊलीने महामंडळालाही मालामाल केले असून तब्बल 29 लाखांहून अधिक रुपयांचे घसघशीत उत्पन्नही मिळाले आहे.
सतत तोट्यात असणार्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महिला सन्मान योजनेतंर्गत महिलांसाठी 50 टक्के सवलतीच्या दरात प्रवास उपलब्ध करुन दिल्यानंतर एसटीचे रुपडेच पालटले. गेल्या वर्षभराच्या कालावधीत या योजनेचा लाभ घेत लाखों महिलांनी एसटीलाच पसंदी दिल्याने महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणार्या प्रवाशांची संख्याही लक्षणीय पद्धतीने वाढली आहे. त्यासोबतच महामंडळाकडून 75 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठांना ‘अमृत’ योजनेतंर्गत मोफत तर 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी निम्म्या तिकिटांत प्रवासाची सवलत दिलेली असल्याने या वर्गाकडून प्रवासासाठी महामंडळाच्या बसेसचा वापर वाढला आहे. त्यामुळे कधीकाळी तोट्यात असणार्या महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारल्याने वेगवेगळ्या योजनांमधून अधिकाधिक प्रवाशांना आपल्याकडे आकर्षिक करणार्या योजना राबविण्यात येत आहेत.
याच सूत्रानुसार महामंडळाने 7 ते 21 जुलै या कालावधीत ‘पंढरपूर यात्रा’ ही विशेष योजना राबवली होती. या योजनेसाठी संगमनेर आगारातील 25 बसेसही उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे अशा योजनांमध्ये यापूर्वी सवलतीच्या दरांमध्ये प्रवास करणार्यांचा समावेश नसायचा. मात्र वाढत्या प्रवाशी संख्येच्या कारणाने उत्साह संचारलेल्या महामंडळाने यावेळी महिला व ज्येष्ठ नागरिकांसह अमृत योजनेत पूर्णतः मोफत प्रवास असलेल्या वृद्ध प्रवाशांनाही या योजनेत सामावून घेतले. विशेष म्हणजे पंढरपूर यात्रा योजनेत ज्या गावातून 40 अथवा त्याहून अधिक प्रवाशी यात्रेला जावू इच्छितात त्यांच्यासाठी थेट त्यांच्या गावातून बसेस सोडण्यात आल्या. या योजनेचा संगमनेर तालुक्यातील भाविकांनी पुरेपूर लाभ घेतल्याचे दिसून आले आहे.
गेल्या 15 दिवसांत संगमनेर आगारातून संगमनेर ते पंढरपूर अशा एकूण 168 फेर्या मारण्यात आल्या. त्यातून 42 हजार किलोमीटरचा प्रवास करीत तब्बल 28 हजार 489 भाविकांना पांडूरंगाचे दर्शन घडवण्यात आले. त्यात 4 हजार 919 सामान्य, 5 हजार 454 महिला सन्मान योजनेतील, 5 हजार 413 ज्येष्ठ नागरिक, 2 हजार 10 लहान मुले व 10 हजार 693 अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेतील प्रवाशांचा समावेश होता. याचाच अर्थ या कालावधीत 4 हजार 919 प्रवाशांनी प्रवासाचे पूर्ण, 12 हजार 877 प्रवाशांनी अर्ध्या तिकिटावर तर, तब्बल 10 हजार 693 प्रवाशांनी मोफत प्रवास करीत पांडूरंगाचे दर्शन घेतले.
पंधरा दिवस चाललेल्या या योजनेत महामंडळाच्या संगमनेर आगारातून दररोज सरासरी 1 हजार 900 प्रवाशांनी प्रवास केला व महामंडळाला रोज 1 लाख 95 हजार 292 रुपये असे एकूण सवलतीच्या दरात 17 लाख 10 हजार 431 तर, कोणत्याही सवलतीशिवाय 12 लाख 18 हजार 950 रुपये असे एकूण 29 लाख 29 हजार 381 रुपयांचे घसघशीत उत्पन्नही मिळवून दिले. या कालावधीत उपलब्ध असलेल्या बसेसचा वापर होवूनही संगमनेर आगाराचे प्रमुख प्रशांत गुंड यांनी नियमित प्रवाशांना कोणतीही अडचण भासू दिली नाही. त्यामुळे महामंडळाच्या बसेसमधून पंढरीची वारी करणार्यांसह नियमित प्रवास करणार्यांनीही संगमनेर आगारातील अधिकारी, कर्मचारी, चालक व वाहकांचे कौतुक केले आहे.
जिल्ह्यातील व्यस्त असलेल्या बसआगारांमध्ये समावेश असलेल्या संगमनेर बसस्थानकातून दररोज 60 बसेस सुटतात. त्याद्वारे 328 फेर्यांद्वारे अतिदुर्गमभागासह लांबचा प्रवास करणार्यांना सुरक्षित प्रवास घडवला जातो. महामंडळाच्या बसेसद्वारा रोज शहरात हजारों विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी येतात आणि संध्याकाळी आपल्या घरी परतात. त्यातून संगमनेर आगाराला दररोज सुमारे सहा लाखांचे उत्पन्नही मिळते. यंदा शासनाने पंढरपूर यात्रेसाठी उपलब्ध बसेसमधूनच 25 बस उपलब्ध करण्याचे फर्मान काढले होते. त्यामुळे अन्य फेर्या प्रभावित होण्याची शक्यता असतानाही आगारप्रमुखांनी केलेल्या अचुक नियोजनामुळे प्रवाशांची गैरसोय झाली नाही.