संगमनेरच्या राजकारणात ‘एमआयएम’ची एन्ट्री! कथीत विकास आघाडीचे विरोधकांकडे डोळे; महायुतीचा फैसला मात्र मुंबईतूनच होणार..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरु होवूनही राजकीय निर्णयाअभावी फारशा चर्चेत नसलेल्या संगमनेर नगरपालिका निवडणुकीत आता नवा ‘ट्विस्ट’ आला आहे. त्यातून अनेकांचे अंदाज बदलणार असून शहरात राजकीय उलथापालथ घडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. यावेळची निवडणूक सत्ताधारी विरुद्ध महायुती अशी सरळ होईल असा बहुतेकांचा अंदाज असतानाच आता त्यात असदउद्दीन ओवैसी यांच्या ‘मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमीन (एमआयएम)’ या तिसर्‍या पक्षाचीही एन्ट्री झाली आहे. एकीकडे आकाराला येवू पाहणार्‍या सत्ताधारी गटाच्या कथीत शहर विकास आघाडीसह महायुतीने आपल्या संभाव्य उमेदवारांबाबत गोपनीयता बाळगलेली असताना दुसरीकडे एमआयएमकडून अचानक नगराध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवाराचे नाव समोर आल्याने वाढत्या थंडीसह शहराच्या राजकारणातील रंगतही वाढण्यास सुरुवात झाली आहे. संगमनेरच्या राजकारणात एमआयएमचा प्रवेश राजकीय गणितं बदलणारा ठरु शकतो, त्यामुळे सत्ताधार्‍यांसह महायुतीलाही आपले डावपेच बदलावे लागणार आहेत.


विविध राजकीय घडामोडी आणि न्यायप्रवीष्ट प्रकरणांमुळे खोळंबलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होवून आठवडा उलटला. या कालावधीत राज्यपातळीवरुन एकत्रित की स्वबळावर इथपासून सुरु झालेली चर्चा समन्वय समिती आणि शक्य तीथे एकत्रितपर्यंत येवून थांबली. काही ठिकाणी राजकीय स्थितीनुरुप दोन्ही बाजूच्या मित्रपक्षांनी आपापल्या पद्धतीने निवडणुकांची तयारी करुन पक्षश्रेष्ठींना स्वबळाचे अहवाल पोहोचते केले. तर, काही ठिकाणी एकत्रितपणे लढण्याचा निर्धार करुन मित्रपक्षांमधून प्रभावी उमेदवारांची नावेही समोर आणली गेली. महायुतीने स्थानिक पातळीवरील सुकाणू समित्यांना अधित्तम तीन नावांचा बंद लिफाफा पाठवण्याचे निर्देश दिले होते.


शिवाय मुख्यमंत्र्यांनी स्वतः नियुक्त केलेल्या स्वतंत्र व भाजपच्या अशा दोन सर्व्हेक्षण कंपन्यांकडून प्रत्येक मतदारसंघात सर्व्हे करुन त्याचा अहवाल प्राप्त करुन घेण्यात आला आहे. सर्व्हेक्षणातून समोर आलेली नावे आणि बंद लिफाफ्यातील नावे याचा ताळमेळ जुळवून महायुतीकडून बहुतेक ठिकाणच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार आहेत. कोणत्याही मतदारसंघात मित्रपक्षांसोबत कटुता येवू नये यासाठी सर्व घटक पक्षांची मिळून एक समन्वय समितीही स्थापन करण्यात आली असून कोणत्याही मतदारसंघात निर्माण होणारा वाद समन्वयातून सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महाविकास आघाडीकडूनही तशाच पद्धतीचा अवलंब होणार असल्याचे संकेत काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी मंगळवारच्या बैठकीतून दिले आहेत. त्यासाठी त्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या पातळीवर समन्वय समित्या स्थापन करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे राज्यात बहुतेक ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात सरळ लढती होतील असा अंदाज आहे.


संगमनेरात मात्र या अंदाजाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. भाजपच्या राज्य निवडणूक यंत्रणेने ठरवल्याप्रमाणे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आमदार अमोल खताळ यांच्या अध्यक्षतेखाली महायुतीची सुकाणू समिती स्थापना केली होती. या समितीने गेली आठ दिवस इच्छुकांच्या मुलाखती घेवून त्यातील प्रभावी ‘चार’ नावांची शिफारस वरीष्ठांकडे केली आहे. विशेष म्हणजे या चारही नावांबाबत महायुतीच्या स्थानिक पदाधिकार्‍यांमध्ये एकमत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. पक्षाच्या निर्णयानुसार तीन नावांची शिफारस करण्याची गरज असताना संगमनेरातून चार नावे पाठवली गेल्याने हा मुद्दाही आता चर्चेत आला असून कथीत शहर विकास आघाडीच्या संभाव्य नावाची कल्पना आल्यानंतर ऐनवेळी जातीचे गणितं तर जुळवले गेले नसेल? अशा शंका दबक्या आवाजात विचारल्या जात आहेत. आज सायंकाळपर्यंत त्यावरील पडदा हटण्याची शक्यता आहे.


दुसरीकडे सत्ताधारीगटाचे नेतृत्व करणार्‍या आमदार सत्यजीत तांबे यांनी प्रचारात आघाडी घेत प्रत्येक घराच्या उंबर्‍याला पाय लावण्यास सुरुवात केली असून त्यांनी मांडलेल्या ‘जनतेचा जाहीरनामा’ संकल्पनेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सत्ताधारी गटाकडून यावेळी त्यांच्या पत्नी मैथिली तांबे आपल्या नव्या विचारांसह राजकीय पदार्पण करतील असा बहुतेकांचा अंदाज असला तरीही अधिकृतपणे त्यांच्या नावाची घोषणा झालेली नाही. विरोधकांकडून महायुतीने अतिशय गुप्त पद्धतीने चार नावांची शिफारस व्हाया लोणी मुंबईला रवाना केली आहे. त्यावरील निर्णय समोर येण्यास अजून वेळ असल्याने सत्ताधारी गट विरोधकांचा उमेदवार कोण? याच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसत आहे.


कथीत विकास आघाडी आणि महायुती या दोघांमध्ये हा खेळ सुरु असतानाच असदउद्दीन ओवैसी यांच्या ‘मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमीन (एमआयएम)’ या पक्षाने संगमनेरच्या राजकारणात ‘एन्ट्री’ केली आहे. गेल्या महिन्यात अहिल्यानगरमध्ये झालेल्या पक्षाच्या जाहीर सभेनंतर लागलीच हा अंदाज आला होता. दैनिक नायकने आपल्या मागील वृत्तात त्याचा ओझरता उल्लेखही केला होता. आता तो सत्यात उतरत असल्याचे समोर आले असून यावेळच्या निवडणुकीत एमआयएमने थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली असून या पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी माजी नगरसेवक शरीफ शेख यांच्या पत्नी तबस्सूम महंमद शरीफ शेख यांचे नाव चर्चेत आले आहे. शिवाय पक्षाकडून मुस्लिमबहुल भागात नगरसेवकपदाच्या चार जागांचीही चाचपणी सुरु असल्याची माहिती मिळत असून तेथेही उमेदवारांच्या नावाची घोषणा होवू शकते.


संगमनेरच्या राजकारणात एमआयएमच्या प्रवेशाने राजकीय गणितं बदलण्याचीही शक्यता असून कालपर्यंत दुरंगी वाटणारी लढत आता तिरंगी होणार की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. संगमनेरात मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे. मात्र यातील बहुतेक मुस्लिम मतदार माजीमंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांना मानणारा त्यांचा पारंपरिक मतदारही आहे. त्यामुळे एमआयएमच्या राजकीय प्रवेशाने या मतदारांवर फारसा प्रभाव पडेल अशी स्थिती नाही. मात्र तरुणवर्ग त्या दिशेने वळण्याची दाट शक्यता असल्याने सत्ताधारी गटालाही अधिक सजग होवून रणनीती आखावी लागणार आहे. एकंदरीत एमआयएमच्या संभाव्य प्रवेशाने सध्या घटत चाललेल्या संगमनेरच्या पार्‍यात आता नव्याने रंग भरण्यास सुरुवात केली आहे.


यापूर्वी 2016 साली झालेली संगमनेर नगरपालिकेची निवडणूक चौरंगी झाली होती. त्यावेळीही एमआयएमच्या उमेदवाराची घोषणा होईल अशा चर्चा रंगवण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात ती चर्चा फोल ठरली. गेल्या महिन्यात ओवैशींच्या या पक्षाने अहिल्यानगरमध्ये जाहीर सभा घेतली होती. त्यातून ओवैशी जिल्ह्यात पाय पसरण्यास इच्छुक असल्याचा अंदाज आला होता, संगमनेरातील त्यांच्या पक्षाच्या संभाव्य प्रवेशाच्या चर्चेने त्याला सत्याचे कोंदण चढत आहे.

Visits: 91 Today: 2 Total: 1107941

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *