तालुक्याच्या बाधित संख्येत आजही मोठी वाढ! दोघांचे बळी जाण्यासोबतच तालुक्याच्या रुग्णसंख्येत पडली 52 रुग्णांची भर
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील कोविडच्या स्थितीने भयानक स्वरुप धारण केल्याचे चित्र दिसत असून दररोज मोठ्या संख्येने रुग्ण समोर येण्याची श्रृंखला अव्याहतपणे सुरु आहे. एखाद्या दिवशी काहीसा दिलासा मिळाल्यानंतर त्याच्या दुसर्याच दिवशी रुग्णसंख्येचा मोठा धक्का बसत असल्याने संगमनेरकर अक्षरशः हादरुन गेले आहेत. रविवारी रात्री शहरातील एकासह तालुक्यातील चिखली येथील एका वयोवृद्ध महिलेचा बळी घेवून 41 रुग्णांची भर घातल्यानंतर कोविडने आजही हा सिलसिला कायम ठेवला. शासकीय व खासगी प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालातून आजही तालुक्याच्या रुग्णसंख्येत तब्बल 52 जणांची भर पडली. त्यामुळे तालुक्यातील बाधितांनी 2 हजार 54 रुग्णसंख्या गाठली आहे. आजच्या एकूण रुग्ण संख्येत संगमनेर शहरातील अवघ्या सहा रुग्णांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसात शहरातील रुग्णसंख्येत मोठी घट होत असल्याचे दिसून येत आहे. ही गोष्ट संगमनेर करांसाठी अत्यंत दिलासादायक आहे. मात्र नागरिकांनी यापुढेही शिस्त पाळण्याची नितांत गरज आहे. अन्यथा कोविडचा विषाणू कधीही शहरातील गल्लीबोळात थैमान घालू शकतो.
गेल्या 1 सप्टेंबरपासून कोविडच्या रुग्णसंख्येचे आकडे दररोज नवनवीन विक्रम करीत आहेत. त्यातच महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच कोविडने एक एक करीत बळींची संख्याही वाढती ठेवल्याने संगमनेर तालुक्यात कोविडची स्थिती भयंकर अवस्थेत पोहोचली आहे. शुक्रवारी बाधितांचे दुसरे सहस्रक पूर्ण करणार्या कोविडने रात्री उशीराने शहरातील एकासह तालुक्यातील चिखली येथील महिलेच्या मृत्युची अप्रिय वार्ता देवून संगमनेर तालुक्याला जबरी धक्का दिला.
गणेश विसर्जनाचा सुदीन असलेल्या 1 सप्टेंबररोजी शहरातील माळीवाडा परिसरात राहणार्या 70 वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान मृत्यु होण्यापासून या महिन्याची सुरुवात झाली. त्याच दिवशी सायंकाळी शहराच्या रुग्णसंख्येत 11 जणांची भर पडण्यासोबतच तालुक्यातील 31 जणांचे अहवाल संक्रमित आले. दुसर्या दिवशीही हाच सिलसिला सुरु राहीला. समनापूरचे निवृत्त पोलीस पाटील असलेल्या 62 वर्षीय इसमाचा मृत्यु होण्यासोबतच शहरातील सहा जणांसह तालुक्याच्या रुग्णसंख्येत 37 जणांची भर पडली. 3 सप्टेंबररोजी मालदाड येथील 35 वर्षीय तरुण छायाचित्रकाराच्या मृत्युने अवघा तालुका हळहळला. त्याच दिवसी तालुक्याची रुग्णसंख्या 16 ने वधारली.
4 सप्टेंबररोजी कोविडने दुसर्यांदा रुग्णसंख्येचा विक्रम नोंदवितांना शहरातील 18 जणांसह तालुक्याच्या रुग्णसंख्येत तब्बल 80 रुग्णांची भर घातली. तर 5 सप्टेंबररोजी पुन्हा एकाचा बळी गेला. चंदनापूरी येथील 39 वर्षीय तरुणाची श्वासाशी सुरु असलेली लढाई थांबली आणि संगमनेर तालुका पुन्हा एकदा दहशतीखाली आला. त्याच दिवशी रात्री 66 जणांचे अहवालही पॉझिटिव्ह आल्याने एकीकडे रुग्णसंख्या वाढण्यासोबत दुसरीकडे बळींच्या संख्येतही भर पडत राहीली. कालच्या रविवारी तर कोविडने संगमनेरकरांना जोरदार धक्का देत शहरातील गिरीराज नगरमध्ये राहणार्या 59 वर्षीय इसमासह चिखलीतील वयोवृद्ध महिलेचा बळी घेत तालुक्याच्या रुग्णसंख्येत 41 रुग्णांची भरही घातली. त्यामुळे रविवारीच तालुक्याने बाधितांचे दुसरे सहस्रक ओलांडून 2 हजार 2 इतकी विशाल रुग्णसंख्या गाठली होती.
आज बाधित आढळलेल्या एकूण 52 रुग्णांमध्ये संगमनेर शहरातील अवघ्या सहा जणांचा समावेश असून शहरातील गजबजलेल्या कोष्टीगल्ली परिसरात कोविडचा प्रवेश झाला आहे. यात कोष्टी गल्लीतील 45 वर्षीय तरुणासह 40 वर्षीय महिला, पंपिंग स्टेशन परिसरातील 34 वर्षीय तरुण, बाजारपेठेतील 55 वर्षीय महिला, रंगारगल्लीतील 58 वर्षीय इसम व माळीवाडा परिसरातील 27 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. आज प्रशासनाने केलेल्या रॅपिड अँटीजेन चाचणीतून तालुक्यातील कौठे बुद्रुक येथील 36 व 25 वर्षीय तरुणासह 22 वर्षीय महिला व 14 वर्षीय बालिकेचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.
यासोबतच शासकीय प्रयोगशाळेतून प्राप्त झालेल्या 48 अहवालातून तालुक्यातील चंदनापुरी येथील 65, 52 व 49 वर्षीय इसम, 60, 38 व 16 वर्षीय महिला, तसेच 14 व पाच वर्षीय बालके, पिंपळगाव देपा येथील 37 वर्षीय तरुण, घुलेवाडी येथील 70 व 50 वर्षीय इसमासह 26 व 27 वर्षीय तरुण, 55 वर्षीय महिला व नऊ वर्षीय बालक, राजापूर येथील 51 वर्षीय इसम, कुरकुटवाडी येथील 60 वर्षीय महिला, मांडवे बुद्रुक येथील 48 वर्षीय इसम, साकुर मधील 60 व 42 वर्षीय इसम, मंगळापुर मधील 60, 62 व 38 वर्षीय महिला तसेच 42 वर्षीय तरुण, नान्नज दुमाला येथील 29 वर्षीय तरुण, पेमगिरी येथील 29 वर्षीय तरुणासह 21 वर्षीय महिला.
कासारा दुमाला येथील तेवीस वर्षीय महिला, बोटा येथील अकरा वर्षीय बालक, सुकेवाडीतील 26 वर्षीय तरुण, अंभोरे येथील 17 वर्षीय तरुणी, तालुक्यातील चिंचपूर येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 65 व 22 वर्षीय महिला, तसेच 27 वर्षीय तरुण, आंबी दुमाला येथील 47, 24 व 21 वर्षीय महिला, 31 वर्षीय तरुण व केवळ आठ महिन्यांची बालिका, सावरगाव तळ येथील 48 वर्षीय इसमाचे अहवाल पॉझिटिव आले आहेत. आजच्या बावन्न रूग्ण संख्येत संगमनेर शहरातील अवघ्या सहा रुग्णांचा समावेश असून उर्वरित 46 अहवाल ग्रामीण भागातील आहेत. आजच्या रूग्ण संख्येत 52 रुग्णांची भर पडल्याने संगमनेर तालुक्यातील बाधितांचा आकडा 2 हजार 54 वर पोहोचला आहे.