लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात हे सर्वमान्य नेतृत्व ः इंदुरीकर महाराज हरीबाबा मित्रमंडळाच्यावतीने थोरातांच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन सप्ताह


नायक वृत्तसेवा, संगमनेर
काँग्रेसमधील संघर्षामुळे अडचणीत सापडलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी कौतुक केले आहे. थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कीर्तनात इंदुरीकर महाराज बोलत होते. यावेळी विविध अध्यामिक दाखले देताना इंदुरीकर म्हणाले, ‘देवपण येण्यासाठी मोठे कष्ट सोसावे लागतात. लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात हे सर्वमान्य नेतृत्व आहे. संगमनेर तालुका व जिल्ह्यासाठी हा आपला माणूस आपला स्वाभिमान आहे’, असे इंदुरीकर महाराजांनी सांगितले.

संगमनेर तालुक्यातील हरीबाबा मित्रमंडळाच्यावतीने बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन सप्ताह आयोजित करण्यात आला. त्याची सांगता मंगळवारी (ता.7) झाली. यावेळी आमदार सत्यजीत तांबे, रणजीतसिंह देशमुख, कर्करोगतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, सीताराम राऊत, अजय फटांगरे, आयोजक तानाजी शिरतार, रमेश जेडगुले, व्यंकटेश महाराज सोनवणे, वैजयंती शिरतार, जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते. यावेळी केक कापून आमदार थोरात यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी इंदुरीकर महाराजांचे कीर्तन झाले. ते म्हणाले, अंधश्रद्धेला थारा न देता प्रत्येकाने शुद्ध आचार व शुद्ध आहार ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या फॅशनच्या नावावर चाललेले संस्कृतीचे विद्रूपीकरण अत्यंत दुर्दैवी आहे. वाढत चाललेले कॅन्सरचे प्रमाण व अपघाताचे प्रमाण ही मोठी चिंताजनक बाब आहे. चांगला आहार असेल तर माणूस निरोगी राहतो. यासाठी सेंद्रीय पद्धतीने पिकवलेल्या भाज्या आहारात जास्त घेतल्या पाहिजे. याचबरोबर अपघात टाळण्यासाठी व्यसन करू नये, त्याचबरोबर वेगाची मर्यादा राखावी आणि सर्वात महत्त्वाचे मोबाईलवर बोलणेही टाळले पाहिजे. यावेळी चुकीच्या पद्धतीने चाललेल्या विविध बाबी लक्षात आणून देत चांगल्या सवयी, चांगली संस्कृती ,चांगला आहार यावर उपस्थितांना प्रबोधन केले.

यावेळी आमदार सत्यजीत तांबे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याप्रमाणे समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांनी संगमनेरचे नाव राज्य पातळीवर नेले आहे. सात दिवस चाललेल्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी वेल्हाळे, मालदाड, घुलेवाडी यांसह परिसरातील भावी भक्तगण दररोज मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Visits: 5 Today: 1 Total: 23128

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *