संगमनेर तालुक्यातील दहा महसूली मंडलात साकूरमध्ये सर्वाधीक पाऊस! सर्वच नद्यांच्या पात्रात मोठ्या प्रमाणात नवीन वाळुची आवक झाल्याने वाळु तस्करांमध्ये सुरु झाला जल्लोश
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पर्जन्यछायेखालील परिसर म्हणून नेहमीच निसर्गाच्या अवकृपेचा सामना करणार्या संगमनेर तालुक्यावर यंदाच्या वर्षी पर्जन्याची कृपादृष्टी राहीली. तालुक्याच्या सर्वच्या सर्व दहा महसूली मंडळात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा जवळपास दुप्पट पाऊस कोसळला. त्यामुळे तालुक्यातील छोटे-मोठे तलाव, पाटबंधारे प्रकल्प ओसंडण्यासोबतच पारंपारिक जलस्त्रोतांमध्येही मुबलक पाण्याची आवक झाल्याने बळीराजा सुखावला आहे. तर गेल्या महिन्याभरापासून वाहत्या असलेल्या प्रवरेतून मोठ्या प्रमाणात नवीन वाळूची आवक झाल्याने व त्यातच निळवंडे धरणाचा दरवाजा बंद करण्यात आल्याने वाळूतस्करांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.
राज्यात मान्सूनच्या आगमनापूर्वी धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाने मान्सूनचे आगमन वेळेवर घडूनही त्यातील सातत्य बिघडवले. त्यामुळे जूनच्या सुरुवातीच्या काळात संपूर्ण राज्यात काहीसे चिंताजनक चित्र निर्माण झाले होते. मात्र धरणांचे पाणलोट वगळता काहीशा विलंबाने परतलेल्या मान्सूनने अकोले तालुक्यातील पाणलोट क्षेत्र असलेल्या लाभक्षेत्रात समाधानकारक हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. लाभक्षेत्रापाठोपाठ धरणांच्या पाणलोटातही सुमारे दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर जोरदार पुनरागम करीत वरुणराजाने धरणांचे चित्रही पालटल्याने गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही पाण्याच्या बाबतीत नगर जिल्हा समाधानी झाला आहे. तुडूंब झालेल्या धरणांतील पाण्याचे योग्य नियोजन झाल्यास पुढील वर्षभरात उत्तर नगर जिल्ह्याला पाण्याची कमतरता भासणार नाही अशी स्थिती आज आहे.
1 जून ते 6 सप्टेंबर पर्यंतच्या सरासरी पावसाचा विचार करता जिल्ह्यात सर्वदूर पावसाने सरासरी ओलांडली आहे. पर्जन्यछायेखाली असलेल्या आणि सतत अवर्षणाचा सामना करणार्या संगमनेर तालुक्यातही पावसाने सर्वत्र चैतन्य पसरवले आहे. तालुक्याच्या सर्वच्या सर्व दहा महसूली मंडलात सरासरीच्या जवळपास दुप्पट पाऊस झाला असून दुष्काळी भाग समजल्या जाणार्या पठारभागावर यंदा वरुणराजाने विशेष कृपादृष्टी राखली आहे. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यातील नद्या, नाले, ओढे, प्रवाह वाहते झाले. त्यामुळे आटलेल्या पारंपारिक जलस्त्रोतांचे पाझर सक्रीय झाल्याने विहिरी व कुपनलिकेसारख्या पारंपारिक जलसाठ्यांमधील पाण्याची पातळीही समाधानकारक झाली आहे. तालुक्यातील साठवण तलाव, लघुपाटबंधारे प्रकल्प व तालुक्याच्या सिंचन व्यवस्थेत महत्वाची भूमिका पार पाडणारी धरणंही तुडूंब झाल्याने संपूर्ण तालुका आनंदला आहे.
जूनपासून आजपर्यंत संगमनेर तालुक्यातील दहा महसूली मंडलातील साकूरमध्ये सर्वाधिक 626.6 मिलीमीटर (241.8 टक्के) पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल शिबलापूर मंडलात 562.6 मिलीमीटर (217.1 टक्के), आश्वी मंडल 553.3 मिलीमीटर (213.5 टक्के), पिंपरणे मंडल 545.3 मिलीमीटर (210.5 टक्के), धांदरफळ मंडल 507.6 मिलीमीटर (195.9 टक्के), घारगाव मंडल 505.4 मिलीमीटर (195.1 टक्के), डोळासणे मंडल 487.4 मिलीमीटर (188.1 टक्के), तळेगाव मंडल 440.3 मिलीमीटर (169.9 टक्के), समनापूर मंडल 437.7 मिलीमीटर (168.9 टक्के) तर संगमनेर महसूल मंडलात सर्वात कमी म्हणजे 430.5 मिलीमीटर (166.2 टक्के) पावसाची नोंद झाली आहे.
यंदा तालुक्यात सर्वदूर पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने सर्वत्र आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे. त्यात वर्षभर पाणी पुरवठा करणार्या धरणांसह सर्वच साठवण तलाव तुडूंब झाल्याने यंदाचे वर्ष पाण्याचे समृद्ध वर्ष ठरणार आहे. त्यासाठी धरणातील पाण्याचे योग्य नियोजन झाल्यास पुढील वर्षी धरणात नवीन पाण्याची आवक होईस्तोवर संगमनेर तालुक्याचा पाणीप्रश्न सुटला आहे.
नद्या, ओढे, नाले वाहिल्याने धरणे भरली आणि विविध पारंपारिक जलस्त्रोतही पुन्हा जीवंत झाले, त्यामुळे बळीराजाच्या चेहर्यावर हास्य फुलणे स्वाभाविक आहे. संगमनेर तालुक्यात मात्र आणखी एका घटकाच्या उत्साहाला मोठे भरते आले असून गेल्या दोन दिवसांपासून नदीपात्रालगतच जल्लोष सुरू असल्याचे काही दाखले हाती आले आहेत. संगमनेर तालुक्यातून मुळा, प्रवरा, आढळा, म्हाळुंगी व कच या नद्या प्रवाहित आहेत. गेल्या चार महिन्यात वारंवार या नद्या कमी-अधिक प्रवाह घेवून वाहत्या राहिल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात नवीन वाळूची आवक झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वाळूतस्करांच्या नद्यांच्या पात्राभोवती घिरट्या वाढल्या आहेत.
त्यातच आता भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोटातील पावसाने पूर्णतः उघडीप घेतल्याने भंडारदर्यापाठोपाठ निळवंडे धरणाचे दरवाजेही बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे वाळूतस्करांनी जल्लोष करायला सुरुवात केली असून पुरामुळे अडगळीत टाकलेले फावडे, टोकर्या व चाळण्या पुन्हा एकदा बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. नद्यांमधील पाण्याची पातळी कमी होताच ठिकठिकाणी गौणखनिजावर दरोडे घालण्याची तयारी सुरु असून आज सकाळी प्रवरा नदीपात्रात वाळूतस्करांची गर्दीही पाहण्यात आली आहे. तर म्हाळुंगी नदीपात्रातून गाढवांचे जथ्येच्या जथ्ये वाळूचे ओझे घेवून धावताना दिसू लागले आहेत.
तालुक्यातील वाळूतस्करी, त्यातून गुंडगिरी आणि अमाप पैसा असे सूत्र गेल्या काही दिवसांमध्ये अधिक ठळक झाले आहे. राजकीय आशीर्वादासह यंत्रणेतील काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचार्यांना हाताशी धरुन पूर्वी मर्यादित स्वरुपात असलेल्या या बेकायदा धंद्याने आज व्यापक स्वरुप धारण करताना तालुक्यातील प्रत्येक छोट्या-मोठ्या नद्यांच्या पात्रात वाळूतस्करांच्या टोळ्या निर्माण केल्या आहेत. शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडवून हा उद्योग आता पुन्हा एकदा गतीमान होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.