अन्यथा संगमनेर तालुक्यात पुन्हा ‘निर्बंध’ : जिल्हाधिकारी वाढती रुग्णसंख्या चिंताजनक; प्रशासनाने अधिक सतर्कतेने काम करण्याच्या सूचना..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
एकीकडे जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होत असतांना संगमनेर आणि पारनेर तालुक्यातील वाढते संक्रमण चिंताजनक आहे. यावर नियंत्रण मिळवून रुग्णसंख्या आटोक्यात न आल्यास पुन्हा एकदा ‘निर्बंध’ लावावे लागतील. या दोन्ही तालुक्यांची लोकसंख्या विचारात घेता दररोज समोर येणारी रुग्णवाढ कोणत्याही स्थितीत रोखावी लागेल. त्यासाठी प्रशासनाला अधिक सतर्कतेने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून विनापरवाना उपचार करणार्‍या रुग्णालयांसह घरातच उपचार देणार्‍या डॉक्टरांवरही कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी आज संगमनेर येथे दिली.


जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होत असतांना संगमनेर तालुक्यातून सातत्याने मोठ्या संख्येने रुग्ण समोर येत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी आज संगमनेर पंचायत समिती कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र क्षीरसागर, पंचायत समितीच्या सभापती सुनंदा जोर्वेकर, प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजकुमार जर्‍हाड, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश घोलप, मुख्याधिकारी राहुल वाघ, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप कचेरिया, प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल आदी उपस्थित होते.


यावेळी जिल्हाधिकारी भोसले माध्यमांशी बोलतांना पुढे म्हणाले की, कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात सातत्याने प्रयत्न सुरु असून लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. मात्र असे असतांनाही काही गावांमध्ये लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्याचे व अशा ठिकाणी कोविड नियमांचे पालन होत नसल्याचे निरीक्षण समोर आले आहे. अशी गावे तातडीने बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून विनापरवाना कोविड केअर सेंटर (सीसीसी) अथवा कोविड आरोग्य केंद्र (डीसीएचसी) चालविणारी रुग्णालये अथवा बाधित रुग्णांना परस्पर घरातच विलगीकरणात ठेवून उपचार देणार्‍या खासगी डॉक्टरांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


काही खासगी प्रयोगशाळांकडून जाणीवपूर्वक संक्रमित असल्याचे अहवाल देण्यात येत असल्याच्या काही तक्रारी आहेत. त्या अनुषंगाने स्थानिक प्रशासनाला चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून असा प्रकार समोर आल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही असा सज्जड इशारा देतांना त्यांनी कोणत्याही स्थितीत कोविडचा प्रादुर्भाव आटोकयत यायला हवा यासाठी नागरिकांना सोबत घेवून उपाययोजना करण्याच्या सूचना आजच्या आढावा बैठकीतून देण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

तब्बल दिड महिन्यानंतर संगमनेर तालुका दुसर्‍यास्थानी!
गेल्या दिड महिन्यापासून जिल्ह्यातील सर्वाधीक दैनिक रुग्ण समोर येणार्‍या संगमनेर तालुक्याला आज मोठा दिलासा मिळाला असून 18 ऑगस्टनंतर पहिल्यांदाच तालुका दुसर्‍यास्थानी पोहोचला आहे. पंधरवड्यानंतर गुरुवारी तालुक्याची रुग्णसंख्या दुहेरीत आली होती, त्यात सातत्य कायम असून आज तालुक्यातील अवघ्या 88 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे आजच्या अहवालात शहरातील अवघ्या तिघांचा समावेश असून ते सर्व रुग्ण एकाच कुंटुबातील आहेत. आजच्या रुग्णवाढीने तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 33 हजार 187 झाली आहे.


राज्याची रुग्णसंख्या नियंत्रणात येत असतांना अहमदनगर जिल्हा मात्र त्याला अपवाद ठरला आहे. जिल्ह्यातील संगमनेरसह पारनेर, श्रीगोंदा, अकोले, राहाता व पाथर्डी तालुक्यातील संक्रमण अद्यापही टिकून असल्याने या सर्व तालुक्यांमधून दररोज समोर येणार्‍या मोठ्या संख्येतील रुग्णांमुळे जिल्ह्याची स्थिती चिंताजनक बनली आहे. गेल्या महिन्याभरात संपूर्ण जिल्ह्यातून सरासरी 733 रुग्ण प्रतिदिन या गतीने 21 हजार 997 रुग्ण आढळले. त्यात वरील सहा तालुक्यातील रुग्णांची संख्या 13 हजार 387 इतकी आहे. यावरुन या तालुक्यातील वाढणार्‍या रुग्णसंख्येचा सहज अंदाज येतो. मात्र गुरुवारपासून संगमनेरसह अन्य पाच तालुक्यातील रुग्णसंख्येला काहीसा ब्रेक लागल्याने काहीसे दिलासादायक चित्र निर्माण होवू लागले आहे.


आज शासकीय प्रयोगशाळेकडून मिळालेलाएक, खासगी प्रयोगशाळेचे 41 व रॅपीड चाचणीतून समोर आलेल्या 46 अहवालातून संगमनेर तालुक्यातील 88 जणांना संक्रमण झाले. त्यात शहरातील घासबाजार परिसरातील एकाच कुटुंबातील 47 वर्षीय महिलेसह 19 वर्षीय तरुण व 17 वर्षीय मुलीचा समावेश आहे. तर ग्रामीण भागातील चिंचपूर येथील 57 वर्षीय महिलेसह 34 वर्षीय तरुण व 16 वर्षीय मुलगी, चिखली येथील 31 वर्षीय महिला, डिग्रय येथील 51 वर्षीय इसमासह 32 वर्षीय महिला, निमज येथील 45 वर्षीय महिलेसह दहा वर्षीय मुलगा, कनोली येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, खराडी येथील 50 वर्षीय महिला, मालदाड येथील 70 वर्षीय महिलेसह 51 वर्षीय इसम व 10 वर्षीय मुलगा, निळवंडे येथील 34 वर्षीय तरुण,


निमोण येथील 46 वर्षीय महिलेसह 21 वर्षीय तरुणी, कोल्हेवाडीतील 49 व 48 वर्षीय महिलांसह 36 व 30 वर्षीय तरुण, पिंपळे येथील 26 वर्षीय महिला, गुंजाळवाडीतील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, रहाणे मह्यातील 53 वर्षीय इसम, ढोलेवाडीतील 50 वर्षीय महिला, शिबलापूर येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 50 वर्षीय इसम, 35 वर्षीय महिला व 13 वर्षीय मुलगा, सुकेवाडीतील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 45, 36 व 33 वर्षीय महिला, 24 वर्षीय तरुण व 21 वर्षीय तरुणी, वडगाव पान येथील 58 व 50 वर्षीय इसमांसह 36 वर्षीय तरुण, आश्‍वी बु. येथील 34 वर्षीय महिला, वरुडी पठार येथील 53 वर्षीय इसम, कोठे येथील 69 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, समनापूर येथील 30 वर्षीय तरुण, करुले येथील 42 वर्षीय महिला,


जवळे बाळेश्‍वर येथील 55 वर्षीय इसम, वडगाव लांडगा येथील 70 व 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 40 वर्षीय तरुण व 35 वर्षीय महिला, झोळे येथील 20 वर्षीय तरुण व 19 वर्षीय तरुणी, चंदनापूरीतील 65, 40 व 38 वर्षीय महिला, आनंदवाडीतील 73 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, निमगाव बु. येथील 33 वर्षीय महिला, निमगाव खुर्द येथील 31 वर्षीय तरुण, ढवळे वस्ती येथील 24 वर्षीय महिला, पिंपरणे येथील 21 वर्षीय तरुण, राजापूर येथील 66 वर्षीय महिलेसह 55 वर्षीय इसम व 17 वर्षीय मुलगा, औरंगपूर येथील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, निमगाव जाळी येथील 65 वर्षीय महिलेसह 30 वर्षीय तरुण व तीन वर्षीय बालिका, पानोडी येथील 59 वर्षीय महिलेसह 12 वर्षीय मुलगा,


ओझर येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, रहिमपूर येथील 21 वर्षीय तरुणी, कोकणगाव येथील 50 वर्षीय इसमासह 28 वर्षीय महिला, मालुंजे येथील 60 वर्षीय महिला, मिरपूर येथील 12 वर्षीय मुलगा, जोर्वे येथील 46 वर्षीय इसम, आश्‍वी येथील 51 वर्षीय इसमासह 33 वर्षीय तरुण, 11 वर्षीय मुलगी, चार व तीन वर्षीय मुले, नांदुरी दुमाला येथील 19 वर्षीय तरुण, धांदरफळ खुर्द येथील 32 वर्षीय महिला, पिंपरी येथील 35 वर्षीय तरुणासह 30 व 27 वर्षीय महिला, खंदरमाळ येथील 24 वर्षीय तरुण व खांबा येथील 25 वर्षीय महिलेचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 33 हजार 187 झाली आहे.

Visits: 191 Today: 3 Total: 1111197

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *