‘माझं वर्षभराचं मानधन राज्यासाठी देणार!’ ः थोरात कॉँग्रेसचे 53 आमदारही महिनाभराचं मानधन देणार

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आपलं वर्षभराचं मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याची घोषणा काँग्रेस नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज केली आहे. त्याचबरोबर मोफत लसीकरणाबाबत महाविकास आघाडीचं एकमत असल्याचंही त्यांनी सांगितलं. आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लसीकरणाबद्दल बोलताना महसूल मंत्री थोरात म्हणाले, आम्ही लसीकरणाबाबत आग्रही आहोत. मात्र लसीकरणासाठी येणारा खर्च मोठा आहे. म्हणूनच माझं वर्षभराचं मानधन राज्यासाठी देणार आहे. यासोबतच कॉँग्रेसचे 53 आमदार आपलं महिन्याभराचं मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

तसेच मोफत लसीकरणाबाबत महाविकास आघाडीचं एकमत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचसोबत मोफत लसीकरणासाठी सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे दोघेही आग्रही असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. देशभरात 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात होत आहे. मात्र राज्यात मात्र लसींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्यानं 1 मेपासून राज्यात लसीकरण सुरु होणार नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल सांगितलं. राज्यात 18 ते 44 या वयोगटातील 5 कोटी 71 लाख लोकसंख्या असून, या सर्वांचे मोफत लसीकरण करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केली. या वयोगटासाठी 1 मेपासून लसीकरण करण्याची तयारी राज्याने केली होती. मात्र, राज्याकडे लशींचा पुरेसा साठा नसल्याने या वयोगटाचे लसीकरण लांबणीवर टाकण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. मोफत लस सरकारी रुग्णालये किंवा आरोग्य केंद्रांवरच उपलब्ध होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Visits: 98 Today: 1 Total: 1103458

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *