‘पल्याड’ कोट्यावधीचा खर्च तर ‘अल्याड’ घाणीचे साम्राज्य! म्हाळुंगी सुशोभिकरणाचा प्रश्न; केवळ बांधकामे करुन सौंदर्य कसे वाढणार?
नायक वृत्तसेवा, संगमनेर
ठेकेदारांच्या वलयात गुरफटलेल्या संगमनेर नगरपरिषदेचे विविध किस्से नेहमीच नागरी चर्चेचा विषय ठरतात. मध्यंतरी अमरधामच्या बाबतीत ठेकेदार आणि बांधकाम विभागातील काही अधिकार्यांच्या संगनमताचा विषयही दीर्घकाळ चर्चेत होता. त्यावरुन उठलेली राळ खाली बसण्यापूर्वीच आता म्हाळुंगी नदीच्या सुशोभिकरणाचा विषय समोर आला आहे. विशेष म्हणजे जमिनीची धूप होत असल्याचा साक्षात्कार झालेल्या पालिकेने नदीपात्राच्या दुसर्या बाजूस कोट्यावधी रुपये खर्च करुन धक्का भिंत उभारण्याचे काम सुरु केले आहे, मात्र खरोखरी त्याची गरज आहे का? सदरचे काम नागरीकांच्या सुरक्षिततेसाठीच की अन्य कोणाला लाभ मिळवून देण्यासाठी असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होवू लागला आहे. विशेष म्हणजे पात्राच्या एकाबाजूच्या धक्का भिंतीचे काम यापूर्वीच झालेले असून सध्या या परिसराची कचराकुंडी झाल्याने त्यातून सुटणार्या दुर्गंधीने आसपासचे रहिवाशी अक्षरशः हैराण झाले आहेत, असे असतांना आता दुसर्या बाजूच्या भिंतीसाठीही कोट्यावधींचा खर्च केला जात असल्याने परिसरातून आश्चर्य व्यक्त होत आहे.
पालिका आणि ठेकेदारी हे सूत्र संगमनेरकरांना नवीन नाही. ठेकेदारांना पोसण्यासाठी अनेकवेळा पालिकेकडून आवश्यकता नसलेली कामेही केली जातात याची अनेक उदाहरणे आहेत. गेल्या निवडणूकीपूर्वी शहराच्या विविध भागात उद्घाटनं झालेली उद्यानं असोत किंवा त्यापूर्वी झालेली सिग्नल, पेव्हींग ब्लॉक व जलतरण तलावाची कामे असोत त्याचा सर्वसामान्य संगमनेरकरांना काहीच उपयोग झाला नाही. गेल्या काही वर्षात पालिकेने कोट्यावधींचा खर्च करुन उभी केलेली शहरातील बहुतेक उद्याने तर आज अनधिकृत कृत्यांसह अश्लिल चाळ्यांची ठिकाणं बनली आहेत. हा सगळा पैसा सर्वसामान्यांच्या घरपट्टी, नळपट्टीतून जमा झालेला आहे, मात्र पालिकेला त्याच्याशी काहीएक घेणंदेणं नसल्याचं चित्र आहे.
काही वर्षांपूर्वी म्हाळुंगी नदीच्या शहराकडील काठाला हॉटेल राज पॅलेस ते स्वामी समर्थ मंदिरापर्यंत धक्का भिंत बांधण्यात आली होती. वास्तविक म्हाळुंगी नदीला कधीतरी दोन-पाच वर्षातून एखाद्यावेळी पाणी येते. अशावेळी प्रवरानदी पुराच्या पाण्याने भरलेली असली तरच म्हाळुंगीच्या पात्रातील फुगवटा वाढत जातो. त्याचा परिणाम आसपासच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरते. त्यासाठी पालिकेने वरील भागात धक्का भिंत बांधली. या भिंतीचा आसपासच्या नागरीकांना कितपत फायदा झाला हा संशोधनाचा विषय असला तरीही असंख्य तळीरामांना मात्र ही धक्का भिंत म्हणजे ‘नरीमन पॉईंट’चा फिल देणारी ठरल्याने सूर्यास्त होताच या भिंतीवर तळीरामांचे थवे येवून विसावण्यास सुरुवात होते.
विशेष म्हणजे शहरातील बहुतेक सांडपाणीही म्हाळुंगी नदीच्या पात्रातच सोडले जात असल्याने पुराचे पाणी कधीनव्हे वाहत असले तरीही सांडपाण्याने मात्र ही नदी नेहमीच प्रवाहित असते. म्हाळुंगी नदीच्या जलस्त्रोतावर शहरासह आसपासच्या बहुतेक कूपनलिका व विहिरी अवलंबून आहेत. त्यामुळे सदरचे सांडपाणी जमीनीत जिरुन त्याच पाण्याचा उद्भव या स्त्रोतांमधून होत असल्याने सदरचे पाणी पिण्यासही अयोग्य असते. आता त्यात शहरातील काही असंवेदनशील व्यापारी, नागरीक आणि खाटकांचीही मोठी भर पडली आहे. याच धक्काभिंतीच्या आडोशाचा वापर करुन ही मंडळी म्हाळुंगीच्या काठावरच दररोज मोठ्या प्रमाणात घाण व कचरा आणून टाकते.
या घाणीत शहरातील चिकन व मटन विक्रेत्या खाटकांच्या कत्तलखान्यातील प्राण्यांचे टाकाऊ अवयवही असल्याने त्यातून प्रचंड दुर्गंधी सुटते व सायंकाळच्या वेळेस पश्चिमेकडील हवेच्या झोतात ही दुर्गंधी आसपासच्या संपूर्ण परिसरात पसरत असल्याने या भागातील नागरीकांचे जगणे असह्य झाले आहे. याबाबत काही रहिवाशांनी पालिकेकडे तक्रारीही केल्या, मात्र त्याचा काहीही उपयोग झाल्याचे आजवर ऐकिवात नाही. एकीकडे भिंत बांधून कचरा कुंडी निर्माण झालेली असतांना आणि त्याचा मोठ्या लोकसंख्येला त्रास होत असताना आता पालिकेकडून नदीच्या दुसर्या बाजूच्या धक्काभिंतीचे काम सुरु करण्यात आले आहे.
नद्यांच्या पात्रांची झीज होवू नये, पुराच्या पाण्याने काठावरील मालमत्तांचे नुकसान होवू नये यासाठी वर्षभर वाहत्या नद्यांना धक्काभिंत आवश्यकच असते, मात्र दुष्काळी पाणलोट क्षेत्र असलेल्या आणि काही वर्षात एखाद्यावेळी वाहणार्या म्हाळुंगी नदीला कोट्यावधींचा खर्च करुन दुतर्फा धक्काभिंत घालण्याची खरोखरी गरज आहे का? सुशोभिकरणाच्या नावाखाली यापूर्वी एकाबाजूला बांधलेल्या धक्काभिंतीची अवस्था आणि त्यामुळे परिसरात निर्माण झालेले घाणीचे साम्राज्य जिवंत दिसत असतानाही दुसर्या बाजूला पुन्हा धक्काभिंत घालण्याचा घाट नेमका नागरी हितासाठी की अन्य कोणाच्या फायद्यासाठी अशा दबक्या चर्चाही यानिमित्ताने शहरातून सुरु आहेत.
केवळ बांधकामे करुन शहर वैभवशाली होणार नाही, त्यासाठी नियोजन आणि त्यानुसारच विकासकामे होण्याची गरज आहे. मात्र पालिकेकडे नेमक्या नियोजनाचीच वाणवा असल्याने केवळ ठेकेदारांची भली मोठी पोटं भरण्यातच नागरी करातून जमा होणारी कोट्यावधीची रक्कम खर्च केली जात आहे. म्हाळुंगीचा गेल्या काही वर्षांचा इतिहास बघता इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करुन धक्का भिंत बांधण्याचे औचित्य काय? असा सवालही यानिमित्ताने सामान्य माणसाला पडला आहे.