मालदाड रोडवरील बाजार उठविल्याने ‘ठेकेदारा’चे डोके फिरले! नुकसान होत असल्याचे सांगत पालिकेला ‘दवंडी’साठी दिलेले वाहनच काढून घेतले..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड संक्रमणात गरीब नागरिकांची उपासमार होवू नये यासाठी कोणी आपल्यातला अर्धा घास त्यांच्या मुखी घालतोय, तर कोणी संक्रमित रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून आपले वाहन विक्री करुन ऑक्सिजनचा पुरवठा करतोय. राज्याच्या विविध भागातून समोर येणार्‍या या वार्ता कोविडच्या भयातही समाधानाची झुळूक देत असतांना संगमनेरातून मात्र विचित्र आणि धक्कादायक बाब समोर आली आहे. पालिका कर्मचार्‍यांनी मालदाड रोडवरील बाजार उठविल्याचा राग मनात धरुन पालिकेच्याच पैशातून पोसलेल्या आणि गलेलठ्ठ झालेल्या ठेकेदाराने चक्क पालिकेला ‘भरा आणि वापरा’ तत्त्वावर कोविड दवंडीसाठी दिलेले वाहन पालिकेच्या साऊंड सिस्टिमसह काढून घेतले आहे. हा प्रकार अत्यंत संतापजनक असून आपल्या तुंबड्या भरण्यासाठी संगमनेरकरांच्या जीवाचाच सौदा मांडणार्‍या या ठेकेदाराला पालिकेच्या यादीतून ‘बाद’ करण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र ठेकेदारांच्याच ‘हातात’ असलेली पालिका यावर काही निर्णय घेईल याबाबत साशंकताही निर्माण झाली आहे.

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्यात ‘कठोर निर्बंध’ लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात केवळ सकाळी 7 ते 11 यावेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबतच दररोज आवश्यक असलेल्या भाजीपाला व फळांसाठीही स्पष्ट आदेश बजावण्यात आले असून त्यानुसार कोणत्याही भाजी अथवा फळ विक्रेत्याला एकाचजागी बसून मालाची विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याबदल्यात दारोदारी जावून या वस्तूंची विक्री करण्याची सवलतही देण्यात आली आहे. संगमनेरातील भाजीपाला व फळ विक्रेत्यांना मात्र हे आदेश अमान्य असल्याचेच चित्र नव्याने बंदी आदेश लागू झाल्यापासूनच दिसत आहे.

शासनाचे आदेश धुडकावून आणि स्थानिक प्रशासनाच्या वारंवारच्या विनंत्या आणि आवाहनाकडे दुर्लक्ष करीत नवीन अकोल रस्त्यावरील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बी.एड्.कॉलेज परिसरात दररोज मोठा भाजी आणि फळ बाजार भरत होता. बुधवारी (ता.28) पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी बळाचा वापर करुन येथील बाजार उठवून दिला. मात्र त्यानंतर काही वेळातच येथून हुसकावलेल्या भाजी व्यापार्‍यांनी काही अंतरावरील नवीन तांबे हॉस्पिटलच्या रस्त्यावर पुन्हा पथार्‍या मांडल्या, आजही सकाळपासूनच येथे भाजी विके्रेते आणि ग्राहक अशा दोहींची मोठी गर्दी झाल्याचे विदारक दृष्य दिसत होते. यावरुन संगमनेरातील भाजी विक्रेत्यांना ना कोविडची धाक आहे, ना प्रशासनाचा असेही सिद्ध झाले.

आज (ता.29) सकाळी मात्र वेगळा आणि विचित्र प्रकार समोर आला. पालिकेच्या अतिक्रमण विभागातील काही कर्मचार्‍यांनी बी.एड्.कॉलेज परिसराप्रमाणेच मालदाड रोड भागात भरणारा भाजी बाजार उठवला व त्यांना पुन्हा येथे न बसण्याची तंबी दिली. या भागातील बाजार उठविल्याची माहिती समजताच पालिकेच्याच बाजार ठेक्यातून आजवर गलेलठ्ठ झालेल्या आणि पालिकेलाही वेळोवेळी पैशांसाठी ठेंगा दाखवणार्‍या, आणि त्यानंतरही पालिकेचा ठेका मिळवणार्‍या ठेकेदाराची घालमेल झाली. त्याने तडक मालदाड रोडवर येवून बाजार उठवून देणार्‍या पालिकेच्या कर्मचार्‍यांशी हुज्जत घातली. इथला बाजार का उठविला? आम्ही पैसे कसे गोळा करायचे? आत्तापर्यंत आमचे खूप नुकसान झाले आहे.. अशी बडबड करीत त्याने संतापही व्यक्त केला. त्याची ही कृती प्रशासनाच्या कोविड नियंत्रणाच्या प्रयत्नांनाच धक्का देणारी होती.

सदरच्या व्यक्तीला पालिकेच्या बाजार वसुलीचा ठेका देण्यात आलेला आहे. त्यामुळे पालिकेनेही सध्याच्या कोविडच्या काळात प्रशासकीय आदेशाची अथवा सूचनांची दवंडी देण्यासाठी एक खासगी वाहन अधिग्रहित केले आहे. सदरचे वाहन बाजार ठेका घेणार्‍या ‘या’ ठेकेदाराचेच असून त्याने ‘इंधन भरा आणि वापरा’ या तत्त्वाने ते पालिकेला वापरण्यास दिले आहे. मात्र गेल्या दहा दिवसांपासून राज्यासह जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू असल्याने व त्यातही भाजी व फळविक्रेत्यांना एकाच ठिकाणी बसून मालाची विक्री करण्यास मनाई असल्याने संबंधित ठेकेदाराची पालिकेच्या मुखी ‘वसुली’ सध्या बंद आहे. मात्र गप्प राहील तो ठेकेदार कसला. या उक्तीनुसार त्याने निर्बंध लागू असतांनाही त्यांना पायदळी तुडवित मालदाड रोडवरील भाजी बाजाराला पाठबळ देत तेथून आपली वसुली करीतच होता.

मालदाड रोड परिसर गेल्या वर्षीपासूनच शहरातील कोविड संक्रमणाचा केंद्र राहीला आहे. येथील भाजीबाजारातून परिसरात संक्रमणाचा वेग वाढल्याचेही निरीक्षण वेळोवेळी समोर आले आहे. त्यामुळे सध्याच्या काळात येथील बाजार भरणं नागरिकांच्या हिताचे नाही. असे असतांनाही त्याच्याशी काहीएक घेणंदेणं नसल्यागत केवळ आपल्या तुंबड्या भरण्यातच मश्गुल असलेल्या या ठेकेदाराने बाजार उठविणार्‍या पालिकेच्या कर्मचार्‍यांवरच आगपाखड करीत पालिकेला वापरण्यासाठी दिलेले आपल्या मालकीचे चारचाकी वाहनच काढून घेतले. विशेष म्हणजे सदरचे वाहन परस्पर ताब्यात घेतांना त्याने वाहनात असलेली पालिकेची साऊंड सिस्टिम देण्याचेही सौजन्य दाखवले नाही. या घटनेवरुन ठेकेदारांचे पालिकेतील ‘उच्चस्थान’ही अधोरेखीत झाले आहे. ठेकेदाराच्या या विचित्र कृत्याचा नागरिकांना मात्र राग आला असून नागरिकांच्या आरोग्याशी काहीच घेणं नसलेल्या अशा मुजोर ठेकेदारांना पालिकेने कायस्वरुपी हद्दपार करावे अशी मागणी होत आहे.


शहरातील वाढत्या कोविड संक्रमणाला जसे मोठे विवाह सोहळे कारणीभूत ठरले, तसे अनिर्बंध भरणारे भाजी बाजारही कारणीभूत ठरले आहेत. अशा गर्दीच्या ठिकाणांमुळे बाधित झालेल्या अनेक सामान्य नागरिकांचे आजवर जीवही गेले आहेत. त्यामुळे शासन आणि प्रशासनाने गर्दीच्या ठिकाणांसह भाजी व फळ बाजारांवर बंधने घातली आहेत. मात्र वर्षभर अव्वाच्या सव्वा कमवून आणि पालिकेला मात्र तिष्ठत ठेवणार्‍या ठेकेदारांकडून असे कृत्य व्हावे हे अत्यंत संतापजनक आहे. विशेष म्हणजे संबंधिताने दिलेले वाहन त्याने मालदाड रोडवरच ताब्यात घेतल्याने बाजार उठविण्यासाठी गेलेल्या आणि दवंडीचे काम करणार्‍या कर्मचार्‍यांना तेथून माघारी पायीच यावे लागले. ही ‘त्या’ कर्मचार्‍यांची नव्हेतर पालिकेचीच नाचक्की आहे. पालिका प्रशासन यावर काय कारवाई करते हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

Visits: 22 Today: 1 Total: 115220

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *