साईबाबा मंदिर 31 डिसेंबरला राहणार बंद! कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय

नायक वृत्तसेवा, शिर्डी
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर रोजी रात्री शिर्डीतील साई समाधी मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या सूचनेनंतर साई संस्थानने हा निर्णय घेतला आहे. याशिवाय शेजारती आणि काकड आरतीला देखील भाविकांना प्रवेश दिला जाणार नाहीये. साई संस्थानच्या या निर्णयमुळे नवीन वर्षाची सुरुवात साई बाबांच्या दर्शनाने करणार्‍या साई भक्तांचा यामुळे हिरमोड झाला आहे.

दरवर्षी 31 डिसेंबरच्या रात्री भविकानां दर्शनासाठी साई समाधी मंदिर उघडे ठेवले जात होते. मात्र राज्यात वाढत्या ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येमुळे साई समाधी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे. कोरोनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार 25 डिसेंबर, 2021 पासून राज्यात रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे 31 डिसेंबर रोजी रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत साई मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

सध्या देशासह राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वीच कोरोनाच्या नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या. त्यानुसार 25 डिसेंबरपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, याच धर्तीवर साई मंदिर भाविकांसाठी रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. याशिवाय राज्य शासनापर्यंत समाधी मंदिरातील रात्री 10.30 आणि पहाटेची 4.30 ला होणार्‍या आरतीच्यावेळी भाविकांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे देखील प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

Visits: 105 Today: 1 Total: 1110469

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *