दिल्लीतील आंदोलन व्यापक नसून सीमीत ः अण्णा हजारे
नायक वृत्तसेवा, नगर
शेतकर्यांच्या प्रश्नांवर दिल्लीत आंदोलनाचा इशारा देत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारच्या विरोधात पुन्हा एकदा दंड थोपटले आहेत. असे असले तरी सध्या दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन आणि कृषी कायदे मागे घेण्याची मागणी याबद्दल हजारे यांची वेगळी भूमिका आहे. केवळ कृषी कायदे मागे घेतले म्हणजे शेतकर्यांचे प्रश्न सुटतील असे नाही. दिल्लीतील आंदोलन व्यापक नसून सीमीत आहे, असे मत हजारे यांनी व्यक्त केले आहे. ही भूमिका सरकारला सध्याचे आंदोलन मोडून काढण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
विविध विषयांवर आंदोलने करणार्या अण्णा हजारे यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनातही सहभागी व्हावे, अशी मागणी होत होती. त्यासाठी दिल्लीतील शेतकर्यांचे शिष्टमंडळही राळेगणसिद्धीला येऊन गेले. सुरुवातीला हजारे यांनी या आंदोलनास पाठिंबा देत एका दिवसाचे उपोषणही केले होते. त्याच दरम्यान आपल्या जुन्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा दिल्लीत आंदोलन करण्याची घोषणाही हजारे यांनी केली. दिल्लीत आंदोलन करण्यासाठी मैदान आणि परवानगी मिळावी, यासाठी त्यांनी अर्जही केला आहे. मधल्या काळात भाजपच्या एका शिष्टमंडळाने हजारे यांची भेट घेऊन त्यांना नव्या कृषी कायद्याच्या मराठी प्रती दिल्या. दिल्लीत आंदोलन न करण्याची विनंतीही केली. मात्र, हजारे यांनी त्यांची ही विनंती धुडकावून लावली. मात्र, नव्या कृषी कायद्यांविषयी आताच काहीही बोलणार नसल्याचे त्यांनी शिष्टमंडळाला सांगितले. प्रसार माध्यमांशी बोलतानाही आता हजारे यांची हीच भूमिका आहे. हजारे दिल्लीत आंदोलन करणार असले तरी त्यांचा या आंदोलानाशी आणि विशेषत: नव्या कृषी कायद्यांशी काहीही संबंध नसेल, हेही आता स्पष्ट झाले आहे.