संगमनेर मर्चंट्स बँकेची ऑनलाईन वार्षिक सभा उत्साहात
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर मर्चंट्स बँकेची 55 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (दि.27 मार्च) कोरोना महामारीच्या निर्बंधांमुळे ऑनलाईन पद्धतीने उत्साहाच्या आणि खेळीमेळीच्या वातावरणात माजी चेअरमन डॉ.संजय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
संस्थेची सातत्यपूर्ण प्रगती आणि भविष्याचा वेध घेणारी अचूक तंत्रज्ञान मैत्री याबद्दल अनेक सभासदांनी बँकेची मुक्तकंठाने प्रशंसा केली. मालपाणी हेल्थ क्लबच्या बँक्वेट सभागृहात शनिवारी सायंकाळी ठीक चार वाजता ऑनलाईन सभेला सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर बँकेचे विद्यमान चेअरमन राजेश मालपाणी, व्हाईस चेअरमन संतोष करवा, माजी चेअरमन डॉ.संजय मेहता, माजी व्हाईस चेअरमन ओंकार सोमाणी, श्रीगोपाल पडतानी, दिलीपकुमार पारख, सुनील दिवेकर,राजेंद्र वाकचौरे, प्रकाश राठी, सतीश लाहोटी, गुरुनाथ बाप्ते, राजेश करवा, प्रकाश कलंत्री, संदीप जाजू, ज्ञानेश्वर कर्पे, डॉ.अर्चना माळी, ज्योती पलोड, सीए.संजय राठी, सेवक प्रतिनिधी तुकाराम सांगळे, राहुल जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर सूरम, बँकेचे अंतर्गत लेखा परीक्षक सीए.जितेंद्र लाहोटी आदी उपस्थित होते.
बँकेच्या सभासदांना सभेला ऑनलाईन उपस्थित राहण्यासाठी लिंक मोबाईलवर पाठवण्यात आली होती. या लिंकचा वापर करून 1 हजार 700 हून अधिक सभासदांनी हजेरी लावली. ओंकारनाथ भंडारी, मनोज पोफळे, अनिश मणियार, कैलास सोमाणी, मनीष मणियार या सभासदांनी ऑनलाईन सभेत सहभागी होऊन काही प्रश्नांवर चर्चा केली. त्यांच्या प्रश्नांना विद्यमान चेअरमन राजेश मालपाणी, माजी चेअरमन डॉ.संजय मेहता, सीए.संजय राठी व मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर सूरम आदिंनी अभ्यासपूर्ण व समाधानकारक उत्तरे दिली. सभेच्या सुरुवातीस श्रीगणेश, श्रीलक्ष्मी व श्रीसाईबाबांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून सभेस प्रारंभ झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर सूरम यांनी उपस्थितांचे स्वागत व मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. ओंकार सोमाणी यांनी आभार मानले.