पारनेर आगाराच्या कर्मचार्याची संगमनेर आगाराच्या बसवर दगडफेक! ‘संगमनेर-नगर’ बसवर केली दगडफेक; तोफखाना पोलिसांकडून आरोपीला अटक..
नायक वृत्तसेवा, अहमदनगर
गेल्या चार महिन्यांपासून सुरु असलेला राज्य परिवहन महामंडळाचा संप कोणत्याही निष्कर्षाशिवाय अद्यापही सुरुच आहे. या दरम्यान राज्य सरकारकडून वेळोवेळी देण्यात आलेले कारवाईचे इशारे आणि प्रत्यक्ष कारवाईमुळे राज्यातील काही जिल्ह्यातील आगारांमध्ये पूर्ण क्षमतेने तर बहुतेक आगारांमध्ये तुरळक प्रमाणात कर्मचारी कामावर परतले आहेत. अशा कर्मचार्यांकडून राज्यात काही प्रमाणात प्रवाशी वाहतुक सुरु करण्यात आली आहे. मात्र त्यात अडथळे निर्माण करण्यासाठी अशा बसेसवर दगडफेकीच्या घटनाही सातत्याने समोर येत आहेत. अशीच घटना बुधवारी नगर शहरातूनही समोर आली असून त्यात संगमनेर आगाराच्या ‘संगमनेर-नगर’ या बसचे नुकसान झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात तोफखाना पोलिसांनी अटक केलेला आरोपी चक्क परिवहन महामंडळाच्याच सेवेत असून तो पारनेर आगारात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. संपाबाबत अद्यापही कोणता तोडगा निघत नसल्याने नैराश्यातून त्याने हे कृत्य केल्याची शक्यता असून पोलीस त्याबाबत तपास करीत आहेत.
याबाबत तोफखाना पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी (ता.23) संगमनेर आगाराची ‘संगमनेर-नगर’ ही प्रवाशांनी भरलेली बस घेवून चालक दत्तात्रय गंगाधर गिरी (रा.गणेशनगर, संगमनेर) हे नगरच्या तारकपूर बसस्थानकाच्या जवळ पोहोचले असता कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या बसच्या दिशेने दगड भिरकावला. यावेळी चालक गिरी आणि त्या अनोळखी इसमाची नजरानजरही झाली. या दगडाने बसच्या पुढील भागातील काच फुटून ती जागीच निखळली. त्यामुळे चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी करुन याबाबत तारकपूर आगाराला माहिती कळविली. त्यांच्या सूचनेवरुन काही वेळातच तोफखाना पोलिसांचे पथक घटनास्थळी हजर झाले. यावेळी चालकाने पाहिलेल्या इसमाची माहिती त्यांनी पोलिसांनी दिली.
त्यावरुन तोफखाना पोलिसांनी संशयीताचा शोध घेतला असता तो पारनेरचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली. त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक गेले असता सदरची व्यक्ति चक्क राज्य परिवहन महामंडळाच्या पारनेर आगारातच सेवेत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. याप्रकरणी आरोपी म्हणून एस. टी. महामंडळाचाच कर्मचारी असलेल्या मनोज ठ्ठिल वैरागर याला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या चार महिन्यांपासून कर्मचार्यांचा संप सुरु असूनही त्यावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नसल्याने त्यातून निर्माण झालेल्या नैराश्यातून सदर कर्मचार्याने हा प्रकार केला असण्याची शक्यता आहे. पोलिसही त्यादृष्टीने तपास करीत आहेत. महामंडळाच्याच कर्मचार्याकडून बसवर दगडफेक करण्याच्या या प्रकाराने मात्र संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे.
राज्य सरकारच्या विविध इशार्यांनंतरही राज्य परिवहन महामंडळातील 75 टक्क्यांहून अधिक कर्मचारी अद्यापही कामावर परतण्यास तयार नाहीत. कारवाईला घाबरुन राज्यातील जे कर्मचारी कामावर परतले आहेत त्यांच्या माध्यमातून महामंडळाने अंशतः प्रवाशी सेवाही सुरु केल्या आहेत. जिल्ह्यातील तीन ते चार आगारात बहुतेक तर उर्वरीत आगारातील तुरळक कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातून काही प्रमाणात अंतर्गत व आंतरजिल्हा प्रवाशी वाहतुक सुरु करण्यात आली आहे. अशा बसेसवर गेल्या काही दिवसांत दगडफेकीच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र या घटनांमागे महामंडळाच्या कर्मचार्यांचा हात असण्याची शक्यता बुधवारच्या घटनेने समोर आणली असून यापूर्वी जिल्ह्यात झालेल्या अशा घटनांच्या तपासालाही या घटनेने दिशा दिली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील अकरा आगारांपैकी तीन ते चार आगारातील कर्मचारी मोठ्या संख्येने तर उर्वरीत आठ आगारांतील कर्मचारी काही प्रमाणात कामावर परतले आहेत. त्यामुळे गेल्या मोठ्या कालावधीपासून बंद असलेली एस.टी.ची प्रवासी सेवा काही प्रमाणात सुरु झाली आहे. मात्र संप मोडून कर्मचार्यांचे कामावर परतणे काही कर्मचार्यांना सहन होत नसल्याने त्या रागातूनच आपल्याच बसेसवर दगड फेकून दहशत निर्माण करण्याचे प्रकार घडत असल्याचे तारकपूर परिसरातील या प्रकाराने समोर आणले आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात अशाप्रकारच्या अर्धाडझनहून अधिक घटना घडल्या आहेत. तारकपूरच्या घटनेत महामंडळाचा कर्मचारीच असल्याचे समोर आल्याने आता उर्वरीत घटनांच्या तपासालाही दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.