कोरोना रुग्णवाढ थांबविण्यासाठी कडक ‘लॉकडाऊन’ पाळा ः थोरात ग्रामीण भागात तपासणीसह ग्राम दक्षता समित्या सक्रीय करण्याच्याही सूचना

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील वर्षी आलेले कोरोनाचे संकट रोखण्यासाठी ग्रामीण भागासह शहरात सर्वांनी अत्यंत कडक पद्धतीने अंमलबजावणी केली होती. आता कोरोनाची दुसरी लाट मोठी असून वाढणारी रुग्णसंख्या ही चिंताजनक आहे. त्यामुळे ही रुग्णवाढ थांबविण्यासाठी येत्या 30 एप्रिलपर्यंत प्रत्येकाने लॉकडाऊनचे निर्बंध अत्यंत कडक पद्धतीने पाळावे, असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

संगमनेरातील अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज येथे झालेल्या कोरोना उपाययोजनांबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, सभापती सुनंदा जोर्वेकर, डॉ.हर्षल तांबे, उपसभापती नवनाथ अरगडे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजकुमार जर्‍हाड, वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप कचेरिया, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश घोलप, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, अमृतवाहिनी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, महेश वाव्हळ आदी उपस्थित होते.

या बैठकीत पुढे बोलताना मंत्री थोरात म्हणाले, देशासह राज्यात कोरोनाची मोठी लाट आलेली आहे. पहिल्या लाटेमध्ये नागरिकांनी अत्यंत दक्षता घेतली. सध्या दुसर्‍या लाटेत वाढणारी कोरोना रुग्णसंख्या अत्यंत चिंताजनक आहे. ही रुग्णवाढ थांबविण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत प्रत्येकाने अत्यंत कडक पद्धतीने लॉकडाऊन पाळला तर कोरोणा रुग्ण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच गावोगावी ग्राम दक्षता समित्या पुन्हा एकदा सक्रीय झाल्या पाहिजे.

याचबरोबर नागरिकांनी कोणत्याही आजाराचे लक्षणे आढळली तर तातडीने वैद्यकीय अधिकार्‍यांचा सल्ला घ्या. प्रशासनाने जनतेच्या हितासाठीच लॉकडाऊन कडक करावा. होम आयसोलेशन बंद असून लक्षणे आढळणार्‍या रुग्णांचे संस्थात्मक विलगीकरणास प्राधान्य द्यावे. गावोगावी तपासणीवर भर देताना नव्याने प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी. रेमडेसिवीर औषधाच्या प्रोटोकॉलचे पालन सर्वत्र झाले पाहिजे. त्याचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी घ्यावी. ऑक्सिजनचा पुरवठाही सुरळीत होण्यासाठी आपण राज्य स्तरावरून प्रयत्न करत आहोत. आगामी पंधरा दिवस अत्यंत महत्त्वाचे असून प्रत्येकाने शासकीय नियमांचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी प्रांताधिकारी डॉ.मंगरुळे व तहसीलदार निकम यांनी तालुक्यातील सद्यपरिस्थिती सांगितली. तर डॉ.कचेरिया यांनी रेमडेसिवीर औषध वापरण्याचे प्रोटोकॉलविषयी माहिती दिली.

ऑक्सिजन रिफिलिंग करणारे राम जाजू यांच्याशी संवाद साधून संगमनेर, अकोले व परिसरातील नागरिकांसाठी शासकीय व खासगी हॉस्पिटलकरिता ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करावा अशा सूचना यावेळी महसूल मंत्र्यांनी केल्या आहेत.

Visits: 81 Today: 1 Total: 1112677

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *